शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०२४

कुत्र्यांचा राजा


मागचे चार-पाच वर्ष अजय साताऱ्याहून पुण्याला येण्याचा प्रयत्न करत होता. अर्थात त्याने बऱ्याच ठिकाणी कंपन्यांमध्ये अर्ज देखील केले होते. पण कुठूनच सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेरीस त्याचे नशीब फळफळले. पिंपरी-चिंचवड मधल्या एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये त्याला मुलाखतीसाठी बोलवण्यात आले. आणि मुलाखत झाल्यानंतर दोनच दिवसांमध्ये नेमणुकीचा ईमेल देखील आला. त्या दिवशी तो खूप आनंदात होता. अर्थात त्याने ही आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी मलाच सगळ्यात पहिल्यांदा फोन केला होता.

एक महिन्याचा नोटीस पिरियड संपल्यानंतर आपल्या बायको आणि मुलासह त्याने पुण्याला शिफ्ट होण्याचे ठरवले. काही नातेवाईकांच्या मदतीने त्याने इथेच शहरांमध्ये एक भाड्याने फ्लॅट देखील बघितला. तो पुण्यात येण्याची आम्ही चार-पाच वर्षांपासून प्रतीक्षा करत होतो. आणि अखेरीस तो आलाच. सामानाची साताऱ्याहून येणारी गाडी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान येथे पोहोचली. घरातील सर्व सामान लावण्यासाठी मी देखील त्याच्या घरी गाडी येण्याच्या अगोदरच पोहोचलो होतो. सामानाच्या ट्रकमधून आम्ही सर्व सामान उतरवून घेतले. आणि घरामध्ये ठिकठिकाणी व्यवस्थित लावून दिले. हे सर्व होईस्तोवर रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. मलाही झोपेची गुंगी यायला लागली होती. शिवाय सकाळी लवकर देखील उठायचे होते. म्हणून ठरवलेली कार्यपूर्ती झाल्यानंतर मी अजयचा निरोप घेऊन आपल्या स्कुटीने परतीच्या मार्गाला लागलो. 

मला अजूनही आठवते स्कुटीला किक मारण्याच्या आधी मी घड्याळात पाहिले होते. रात्रीचे बरोबर अकरा वाजून ४६ मिनिट झाले होते. अजय मला सोडवायला खाली आला होता. मी त्याला बाय केले आणि आपल्या घराच्या दिशेने निघालो. दहा ते बारा किलोमीटरवरच माझे घर होते. म्हणजे यावेळेस जाण्यासाठी १५ ते २० मिनिटे पुरेशी होती. या गणिताने मी बारा-सव्वाबाराच्या सुमारास घरी पोहोचेल, असा अंदाज देखील मला आला.

बिल्डिंगमधून बाहेर पडलो, मुख्य रस्त्याला लागलो आणि गाडी ५० च्या वेगाने रस्त्यांवरून धावायला लागली. संध्याकाळच्या सुमारास रहदारीने तुडुंब भरलेले रस्ते यावेळेस पूर्णपणे सामसूम झालेले दिसले. अधेमधे रस्त्यावरची टवाळी करणारी मुले आणि त्यांचा गोंगाट दिसायचा. बाकी दुकाने तर बंद झाली होती. या रस्त्यावरून मी यापूर्वी बऱ्याचदा प्रवास केला होता. परंतु अशी बंद झालेली दुकाने त्या दिवशी पहिल्यांदाच पाहत होतो. संध्याकाळी या रस्त्याने आलो तेव्हा गर्दीतून वाट काढत काढत अजयच्या घरापर्यंत पोहोचलो होतो. परंतु जाताना रात्रीची ती स्मशानशांतता अनुभवत मार्गक्रमण होतो करत होतो. कोकणे चौकात पोहोचलो आणि तिथून उजव्या बाजूला वळण घेतले व गाडी सुसाट वेगाने पिंपळे गुरवच्या दिशेने धावायला लागली. रस्त्यावरील पथदीप रस्ता दाखवायला सक्षम होते. अधमधे एखादा पथदीप लुकलुकताना दिसायचा. बाकी त्याखाली असणारे रस्ते पूर्णतः निर्मनुष्य होते. आपले शहर रात्री किती शांतपणे झोपते याचा अनुभव त्या दिवशी मी पहिल्यांदाच घेतला. कधीकधी या शांततेची आणि निर्मनुष्यतेची देखील भीती वाटायला लागते. मला ती थोडीशी वाटत देखील होती, काहीशी जाणवत होती. परंतु त्याचा फार बाऊ केला नाही. रस्त्यावरची डावीकडची लेन पकडून मी सुसाट वेगाने चाललो होतो.

ठराविक अंतरावर कुत्र्यांच्या छोट्या छोट्या झुंडी दिसायच्या. त्यांचे आवाज त्यादिवशी काहीशी निराळेच भासत होते. जणूकाही भुंकण्याऐवजी ते मानवी आवाजात माझ्याशी बोलत असावेत, असं वाटत होतं. रस्त्यावरील कुत्र्यांची संख्या तशी बऱ्यापैकी होती. शहरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कुत्री आहेत, हे त्यादिवशी पहिल्यांदाच जाणवलं. यातील कोणीही माझ्या गाडीच्या मागे लागले नाही किंवा माझ्यावर भुंकले देखील नाही. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक मला तेव्हा जाणवत होती. एका चौकाच्या अलीकडे काही कुत्री पुढच्या दोन पायांवर बसून आपली मान त्या पायांवर ठेवून मला कुर्निसात करत असल्याची जाणवली. हा भास असावा का? हाही प्रश्न मनाला चाटून गेला. काहीसं वेगळं दृश्य त्या दिवशी दिसल्याने मनात स्मित हास्य उमटलं. पण ते स्मितहास्य होतं की भयहास्य हे मला आजही निश्चित आठवत नाही. जसं जसं पुढे गेत गेलो तसतसं कुत्र्यांची संख्या वाढतच होती. आणि सर्व माझ्यात दिशेने आशाळभूतपणे पाहत होते. त्या रस्त्यावर चाललेली माझी ती एकमेव गाडी होती म्हणूनच असं होत असावं… हे मीच मला समजावलं. मग कुत्र्यांना या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांची सवय नव्हती का? हाही प्रश्न पडून गेला. एवढी सगळी कुत्री माझ्यावर चालून आली तर मला काय करता येईल? या प्रश्नाने मनात धस्स झाले. गाडीचा वेग हळूहळू कमी होत गेला. मी मनात भीती घेऊन चाललो होतो का?..... कदाचित होय…. ही भीती कुत्र्यांची नव्हती…. मग कशाची होती? मला प्रश्नाचे उत्तर सापडले नाही.

पुढच्या चौकातून उजव्या बाजूला वळायचे होते. त्याच्या अलीकडेच रस्त्याच्या डाव्या बाजूला कुत्र्यांची भली मोठी झुंड पुढचे दोनही पाय खाली करून मला नमस्कार करत होते. आजूबाजूला एकही मनुष्य दिसला नाही. सर्व कुत्र्यांच्या नजरा माझ्या दिशेने लागल्या होत्या. मी नकळतपणे त्यांच्या नजरेमुळे संमोहित झालो होतो. एव्हाना गाडीचा वेग शून्य पर्यंत पोहोचला होता. आणि अखेरीस मी माझी स्कुटी थांबवली. तिला एका स्टॅन्डवर लावली. आणि कुत्र्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल कमालीचा आदर आणि उत्सुकता देखील होती. काही कुत्र्यांच्या शेपट्या लडीवाळपणे हलत होत्या तर काही आपल्या तोंडातील जीभ हलवून त्यातून लाळ टाकत होते. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. किंबहुना काहीतरी सांगायचं होतं. पण त्यांना माझी आणि मला त्यांची भाषा समजणार होती का?.... तर नाहीच. परंतु मनुष्याच्या चेहरा बरच काही सांगून जातो. त्यातून माझा चेहरा त्यांनी ओळखला असावा, असेही मला वाटलं. कुत्र्यांनी संमोहित केलेला मी हळूहळू त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो. निश्चित किती कुत्री होती हे सांगता येणार नाही. किमान २० ते २५ तरी असतील.

मी त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांच्यातील म्होरक्या रस्त्याच्या कडेला जाऊन उतारावरून खाली चालू लागला. त्याच्यामागे बाकीची कुत्री देखील डौलाने चालू लागली. मी देखील त्यांचाच कित्ता गिरवला. थोड्या अंतरावर शहरातली काँक्रीटची जंगलं हळूहळू कमी झालेली दिसली. शहरांमध्ये आज समाविष्ट झालेली ही शहरी गावं एकेकाळी ग्रामीण वस्त्या होत्या. येथे देखील बागायती-जिरायती शेती केली जात होती. पण त्यावर आता काँक्रीटची जंगलं उभी राहिली. इमारती बांधल्या गेल्या. आणि त्या पाऊलखुणा नष्ट होत गेल्या. तरी देखील अजूनही या भागात बरीचशी शेती शिल्लक असलेली दिसली. मधला पूर्ण पट्टा शेतातील विविध पिकांनी भरलेला वाटत होता. अर्थात अंधारातल्या त्या आकृत्यांवरून मी हा अनुमान लावला. बऱ्याच दूरवर जिथे शेती संपते तिथून पुढे पुन्हा काँक्रीटची जंगलं दिसत होती. त्यातील विद्युतदिवे टीमटीमताना दिसले. मधल्या भागात नक्की काय पेरलेले होते, याचा अंदाज मात्र आला नाही. त्या भल्या मोठ्या शेतीच्या एका कडेकडेने कुत्र्यांची ती भली मोठी रांग चालू लागली. तेव्हा ना मी त्यांच्या मधोमध आलो होतो. पुढच्या बाजूला दहा ते पंधरा आणि मागच्या बाजूला तेवढीच कुत्री घेऊन आमची ही वारी शेतातल्या त्या काळोखामध्ये निघालेली  होती. थोड्याच अंतरावर शहराचे शहर पण नाहीसे झाल्याचे वाटले. दोन्ही बाजूंना शेतीच शेती. मध्ये एखादं झोपडं अर्थात बंद पडलेलं दिसायचं. मी नक्की कोणत्या शक्तीच्या जोरावर त्या कुत्र्यांमधून चाललो होतो, हे मला आजही सांगता येणार नाही. परंतु अज्ञाताच्या शोधार्थ असलेला तो प्रवास असावा असं त्याक्षणी मला आतमधून जाणवत होतं. अगदी थोड्याच वेळात शेताच्या मधोमध असणाऱ्या एका दुमजली खोपट्यापाशी कुत्र्यांची ती वारी आणि मधोमध चालणारा मी येऊन पोहोचलो. त्या खोपट्याच्या खालच्या भागात चहूबाजूंनी पत्रे लावलेले होते. आणि एका कोपऱ्यातून वर जाण्यासाठी अगदीच मोडकळीस आलेल्या जिना होता. वरचा भाग देखील दोन्ही बाजूंनी पत्र्याने तर पुढे आणि मागे विविध प्रकारच्या ठिगळांनी सजवलेला दिसून आला. या ठिगळांच्या मधोमध एक पडीक दरवाजा होता. त्या दुमजली खोपट्यापाशी आल्यानंतर माझ्या पुढे चालणारी कुत्री थांबून गेली. मी हळूहळू पुढे आलो माझ्यापुढे केवळ कुत्र्यांचा म्होरक्या उभा होता. मी त्याच्याजवळ पोहोचल्यावर त्याने लगेचच जिना चढायला सुरुवात केली. जवळपास दहा पायऱ्या चढून आम्ही वरच्या मजल्यावर पोहोचलो. वरील दरवाजा बंद होता. त्याला दोन कड्या लावलेल्या होत्या. मी म्होरक्याकडे बघितले. त्याच्या डोळ्यातील आर्तता मला काहीतरी सांगत होती. अर्थात या प्रश्नाचे उत्तर मला देखील समजले. मी दरवाज्याच्या ज्या दिशेने पाहिले आणि मधली कडी उघडली. मग वरची कडी देखील काढली आणि दरवाजा आतमध्ये ढकलला. त्याच्या बिजागरांचा एक विचित्र आवाज त्या शांततेमध्ये भयावहता आणून गेला. गंजलेल्या बिजागरांचा दरवाजा उघडल्यावर तो आतल्या बाजूने झुकलेला दिसला. त्याचा पुढे मागे होण्याचा आवाज अजूनही हळूहळू तसाच चालू होता.

दरवाजा उघडल्यानंतर समोरच्या खिडकीतून अतिशय मंदचा प्रकाश माझ्यावर पडला. डाव्या बाजूला एक तीन कप्पे असणारी मांडणी होती. त्या लाकडी मांडणीचे पाय कुजल्यासारखे दिसत होते. अर्थात रात्रीच्या त्या मंद प्रकाशात मला इतकच दिसून आलं. सर्वात वरच्या भागात पोत्याखाली काहीतरी लपवलेलं होतं. कुत्र्यांचा तो म्होरक्या माझ्या शेजारीच उभा होता. त्याची नजर मांडणीच्या सर्वात वरच्या भागात असणाऱ्या त्या पोत्यावर होती. मी त्याच्याकडे पाहिले. त्याने आपली जीभ बाहेर काढलेली होती. त्यातून लाळ देखील टपकताना दिसली. मी पुन्हा मांडणीकडे पाहिले व त्यावरील पोते खाली खेचले. लगोलग मांडणी खाली पडली आणि त्यावर असणार ते देखील खाली पडलं. मोठा आवाज झाला. अर्थात तो आवाज आजूबाजूला कोणीही ऐकलेला नसेल. कारण तिथल्या परिसरात कोणी नव्हतंच. नक्की काय पडलं, हे पाहण्यासाठी मी दोन पावले पुढे टाकली. तो एक मृतदेह होता….  कुजलेला परंतु चेहरा मात्र अजूनही व्यवस्थित दिसत होता. असं दृश्य मी याहीपूर्वी कधीच माझ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं. कपाळावर घामाचे बिंदू तयार व्हायला लागले होते. मी डोळे विस्फारून ते दृश्य पाहत होतो. कुत्र्यांच्या म्होरक्याची नजर त्या मृतदेहाच्या दिशेने रोखलेली दिसली. आवाज झाल्याझाल्या खाली वाट पाहणारी सर्व कुत्री वेगाने पायऱ्या चढून त्या खोलीच्या आत येऊन ठेपली. मी मात्र दोन पावले मागे करत करत खोलीच्या बाहेर आलो. सर्वच कुत्र्यांची नजर त्या मृतदेहाच्या दिशेने रोखलेली होती. यानंतर अगदी क्षणातच सर्व त्यावर तुटून पडले. मघाशी कपाळावर जमा झालेले घामबिंदू आता शरीरावर वेगाने पडू लागले होते. भयाची शिरसरी अगदी पायापासून मेंदूपर्यंत वेगाने प्रवास करू लागली. मी कसेबसे स्वतःला सावरले. झपाझप पावले टाकत पायऱ्यांनी खाली उतरलो. तोंडातून शब्दही फुटत नव्हता. आल्या पायवाटेने माघारी चालू लागलो. ही तीच वाट होती का? हे मला माहित नाही. परंतु पळत पळत पुन्हा काँक्रीटच्या जंगलापाशी आलो, पदपथ आणि पथदीपावरील दिवे पुन्हा स्पष्ट दिसायला लागले. तेव्हा पुन्हा माणसात आल्याची जाणीव झाली.. कुत्र्यांच्या त्या विश्वापासून काहीच लांब आलो होतो. माझी गाडी अजूनही तिथेच होती. अगदीच ५० फुटांच्या अंतराव असताना पुढे काय झाले, हे मला माहित नाही.

सकाळी जाग आली तेव्हा मी हॉलमधल्या सोफ्यावर झोपलेलो होतो. बायको शेजारी खुर्चीवर बसलेली होती. कदाचित ती मी उठण्याची वाट पाहत असावी. तिच्या चेहऱ्यावर देखील प्रश्नचिन्ह होते.

“रात्री किती वाजता आलात?”, तिने विचारले.

“माहित नाही”, केवळ एवढेच बोलू शकलो.

“चावी तर माझ्याकडे होती मग तुम्ही दरवाजा कसा उघडला?”, तिच्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला. पण मला ते अजूनही सापडलेले नाही. 

 

- बाबुराव रामजी  



बुधवार, २० मार्च, २०२४

कोथिंबीर

दुपारची वामकुक्षी त्यादिवशी फारच काळ लांबली. झोपेतून जाग आली तेव्हा घड्याळामध्ये पाहिले, संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. घड्याळातल्या त्या काट्यांमुळेच खाडकन डोळे उघडले. सकाळी बाहेर जाताना यांनी बजावून सांगितले होते संध्याकाळी कोथिंबिरीच्या वड्या करायच्या आहेत बरं का. मी देखील त्यांना निश्चितपणे ‘नक्की नक्की’ म्हणून सांगितले होते. पण कोथिंबीर तर संपली होती. संध्याकाळच्या बाजारातून ती आणावी असा विचार करूनच दुपारच्या झोपेच्या स्वाधीन झाले होते.
बाजार सुरू होऊन बराच वेळ झाला होता. लवकरात लवकर चांगली कोथिंबीरची जुडी मिळावी म्हणून पटकन आवरती झाले. बाजाराची पिशवी घेऊन पायऱ्या उतरायला लागले. गुरुवारच्या या बाजारात तशी बऱ्यापैकी गर्दी असते. शिवाय भाज्या देखील ताज्या मिळतात. म्हणून हा बाजार सहसा मी कधी चुकवत नाही. एक शेतकरी बाई दर आठवड्याला कोथिंबिरीच्या ताज्या जुड्या घेऊन येत असते. आजही ती आली असावी, असा कयास मी बांधला. तिची नेहमीची जागा ठरलेली होती. बाजाराच्या दिशेने चालू लागल्यावर मी त्याच दिशेने टक लावून पाहत होते. जवळ पोहोचले तेव्हा ती बाई अजूनही तिथे भाज्या विकताना दिसली. त्यामुळे जीव भांड्यात पडला. झपझप पावले टाकत तिच्यापर्यंत आले. एव्हाना बाजारात अन्यत्र बऱ्यापैकी गर्दी झालेली होती. आणि सगळीकडे नुसता गोंगाट चालू झालेला होता. भाजीवालीजवळ पोहोचले तेव्हा तिच्यासमोरील कोथिंबिरीच्या सर्व जुड्या संपलेल्या दिसल्या. त्यामुळे निराशेची एक लकीर माझ्या चेहऱ्यावर नकळतपणे उमटली असावी. भाजीवालीच्या समोर हातात कोथिंबीरची जुडी घेतलेली एक वृद्ध आजी उभी असलेली दिसली. नऊवारी साडी, डोक्यावर ठळक-कुंकू, सावळ्यापेक्षा अधिक गडद रंग आणि उभा व केविलवाना चेहरा अशा अवतारात ती भाजीवालीशी बोलत होती.
“बारा रुपयांना द्या की हो ताई….. शेवटचीच जुडी तर आहे.”,ती गयावया करत भाजीवालीशी हुज्जत घालत होती.
“अहो आजी…. सगळ्याच जुड्या मघापासून वीस रुपयांना विकलेल्या आहेत. त्याच्यापेक्षा एक रुपयादेखील कमी होणार नाही”, भाजीवाली आपल्या बोलण्याची आणि किमतीशी ठाम होती.
“जाऊ द्या अर्धी जुडी तर द्या.”
“नाही ओ आज्जी, पूर्ण घ्यायची तर घ्या नाहीतर राहू द्या इथेच.”
भाजीवालीच्या या बोलण्याने ती काय समजायचे ते समजून गेली. बारा रुपयांचीच नाणी तिच्याकडे शिल्लक होती. त्यात तिला कोथिंबिरीची ती जुडी घ्यायचीच होती. पण भाजीवाली काय सोडायला तयार नव्हती. मी त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. त्यांचं संभाषण पूर्ण होण्याची वाट पाहत होते. कदाचित त्याचा निकाल सकारात्मकदृष्ट्या माझ्या बाजूने लागेल की काय, अशी आशा मला लागलेली होती. कोथिंबीरीची ती शेवटची जुडी अजूनही त्या आजीच्याच हातामध्ये होती.
“घ्यायची नसेल तर खाली ठेवा…”, भाजीवालीने आजींना सांगितले. एवढी हुज्जत घालून देखील तिचा नाईलाज होता. बऱ्याच निराशेने तिने ती जुडी भाजीवाली समोर ठेवून दिली. आणि तशीच उभी राहिली. तिने जुडी खाली ठेवता क्षणीच मी ती उचलून घेतली आणि विचारले,
“कशी दिली?”
“वीस रुपये”, भाजीवालीचे तात्काळ उत्तर आले.
अगदी दोन-तीन तासांपूर्वीच शेतातून काढलेली ती ताजी जुडी होती. तिच्यासाठी २० रुपये देणे म्हणजे माझ्या करता काहीच नव्हते. मी तात्काळ वीस रुपये काढले आणि भाजीवालीला देऊन टाकले. जुडी घेतली आणि पिशवीत ठेवली. ही सर्व करत असताना ती आजी तिथेच उभी होती. तिची नजर अजूनही कोथिंबीरच्या त्या जुडीवरच होती. एका केविलवाण्या नजरेने ती माझ्याकडे देखील बघताना मला वाटले.
कोथिंबीरची ताजी जुडी मिळाल्याचे समाधान मला होतेच, पण त्याच जुडीसाठी भाजीवालीशी हुज्जत घालणाऱ्या आज्जीशी मला कीव देखील वाटली. मी परतीचा रस्ता धरला. चालत असताना ती आजी माझ्याकडेच मागून बघत आहे की काय असे अचानक वाटून गेले. थोडं पुढं आल्यावर सहजच म्हणून मागे वळून पाहिले. आजीने भाजीवालीचा नाद सोडला होता आणि ती माझ्यात दिशेने हळूहळू पुढे येताना दिसली.
‘विचित्रच आहे…’, असं मनाशीच बोलून मी घराच्या दिशेने चालू लागले.
पाच मिनिटांनी इमारतीच्या गेटमधून आत मध्ये आले. तेव्हा देखील ती आजी माझ्याच मागे मागे येताना दिसली. मी आत आल्यावर सुरक्षारक्षकाने गेट लावून घेतले. मी लिफ्टपाशी पोहोचले तोवर ती गेटपाशी आलेली नव्हती. लिफ्ट आली आणि मी सातव्या मजलाचे बटन दाबले. घरामध्ये पोहोचेपर्यंत जवळपास सात वाजायला आले होते. किल्लीने दार उघडले आणि आतमध्ये आले तेव्हा कुठे हायसे वाटले.
बेडरूमच्या खिडकीतून इमारतीचे मुख्य गेट दिसते. मगाशी माझा पाठलाग करणारी ती आजी आता कुठे आहे, याची मला देखील उत्सुकता लागली होती. पटकन बेडरूम मध्ये गेले आणि खिडकीतून मेनगेट कडे कटाक्ष टाकला. ती आजी आमच्या सुरक्षारक्षकाची काहीतरी हुज्जत घालताना दिसत होती. त्याच्या हातवाऱ्यांवरून तो तिला इथून निघून जायला सांगत होता. पण मघाशी पाहिलेला तिचा तो केविलवाना चेहरा अजूनही तसाच दिसून आला. एका कोथिंबीरीच्या जुडीसाठी ती माझ्या मागोमाग का आली असावी? खरोखर गहन प्रश्न होता. तिच्याशी बोलायला हवे होते का? याचे उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला. पण नंतर सोडून दिले. असतात अशी विक्षिप्त माणसे या जगात, म्हणून मीच माझी समजूत घातली.
बरोबर सातच्या सुमारास घराची बेल वाजली. आमची स्वयंपाकिन सुमन दारात उभी होती. तिला सकाळीच आज संध्याकाळी कोथिंबीरची वडी करायची आहे, असे बजावून सांगितले होते. त्यामुळे आल्याआल्याच तिने विचारले,
“आणली का कोथिंबीर मावशी?”
“हो बाई…. मोठ्या मुश्किलीने मिळाली आज!”, मी आनंदाने उतरले.
“कुठं आहे?”, तिने विचारले.
“ती बघ…. किचनच्या ओट्यावर पिशवी ठेवली आहे.”
सुमनला किचनच्या ओट्यावर भाजीची ती पांढरी पिशवी दिसली. तिने पिशवी उघडून पाहिली आणि म्हणाली,
“मावशी…. यात तर काहीच नाहीये!”.
“अगं नीट बघ… आपल्या नेहमीच्या पिशवीमध्ये आहे.”
“तीच तर पिशवी पाहते आहे… काहीच नाहीये त्याच्यात!”
मला आश्चर्याचा धक्का बसला. मी किचनमध्ये आले आणि पिशवी हातात घेतली. खरोखर त्या पिशवीमध्ये काहीच नव्हते. अगदी कोणती भाजी ठेवली होती की नाही, याचे निशाण देखील नव्हते.
ती रिकामी पिशवी पाहून काळजात धस्स झाले. कदाचित एखादा ठोका चुकला असावा.
मी झपाझप पावले टाकत बेडरूमच्या खिडकीपाशी पोहोचले. खिडकी उघडून पुन्हा मेन गेटकडे बघितले. ती आजी तिथे नव्हती. सुरक्षा रक्षक शांतपणे आपल्या खुर्चीवर बसला होता… मोबाईल बघत.

- बाबुराव रामजी





सोमवार, ५ डिसेंबर, २०२२

हिरवी नंबर प्लेट

"आमच्या येथे नंबर प्लेट्सची कामे केली जातील." असा दुकानावरचा फलक पाहून तो थोडासा हसला. त्याने आपली गाडी पार्क केली आणि तो आत मध्ये घुसला. दुकान मालकाने त्याला पाहताच तात्काळ विचारले, 

"बोला." 

"गाडीची नंबर प्लेट बदलून घ्यायची होती." - तो. 

हे ऐकताच दुकान मालकाने समोरच्या भिंतीवर लावलेली नंबर प्लेटची निरनिराळी डिझाईन्स त्याला दाखवत विचारले, 

"यातील कोणत्या प्रकारची डिझाईन तुम्हाला पाहिजे?"

त्याने त्या सर्व डिझाईन्सवर एकदा नजर टाकली. पण हवे ते डिझाईन त्याला मिळाले नाही. मग तो बोलू पुढे लागला, 

"असं कुठलच डिझाईन नको आहे. मला गाडीची नंबर प्लेट हिरव्या रंगाची करायचीय." 

"तुमची गाडी इलेक्ट्रिक आहे का?", दुकान मालकाच्या या प्रश्नावर त्याने नकारार्थी मान डोलवली. 

"नाही हो आपली पेट्रोल गाडी आहे. पण माझ्या गाडीला हिरव्या रंगाची नंबर प्लेट खूप सुंदर दिसेल. ती बघा माझी गाडी तिथे बाहेर लावली आहे आणि तिच्यावर पोपटी हिरव्या रंगाचे वेगवेगळे पट्टे पण मी मारलेत! त्याला शोभणारी नंबर प्लेट पाहिजे. आजकाल बऱ्याच हिरव्या नंबर प्लेट मी पाहिल्यात. किती सुंदर दिसतात ना!" 

त्याच्या या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे दुकानदाराला समजले नाही. तो इतकेच म्हणायला,

"आम्हाला नाही बनवता येणार. कारण हिरवी सोडून आम्ही सगळ्या रंगाची नंबरप्लेट बनवतो!" 



शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

मुळे गुरुजी स्कूल

यंदाच्या दिवाळीत गावी गेल्यानंतरही बराच निवांत होतो. दिवाळी संपवून एक आठवडा झाला. पण मी माझी सुट्टी वाढवून घेतली होती. अशाच एका सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे राऊत काकांसोबत मॉर्निंग वॉकला हमरस्त्याने निघालो होतो. थोड्याच वेळामध्ये आमच्या शेजारून एक पिवळ्या रंगाची स्कूलबस वेगाने धुरळा उडवत गेली. मी सहजच त्यावरील नाव बघितले, 'मुळे गुरुजी इंटरनॅशनल स्कूल'.

मुळे गुरुजी नाव ऐकल्यावर थोडासा चमकलोच. या नावाची शाळा आपल्या परिसरामध्ये आहे, हे पहिल्यांदाच पाहण्यात आलं. त्यामुळे राऊत काकांना मी उत्सुकतेने विचारले,
"काका, ही मुळे गुरुजी इंटरनॅशनल स्कूल कुठे आहे?"
"आपल्या शेजारच्याच गावात.", ते उत्तरले.
"म्हणजे मुळे गुरुजींच्याच गावामध्ये?"
"हो, त्यांच्याच मुलाने त्याच्या काही इतर सहकाऱ्यांच्या मदतीने चालू केली आहे. तीन-चार वर्षे झाली या गोष्टीला."
मला काहीसे आश्चर्य वाटले. मुळे गुरुजींचा मुलगा अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखा होता. माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी वयाने मोठा असावा. गुरुजींच्या बुद्धिमत्तेची झलक त्यांच्या मुलाच्या वागण्यामध्ये बिलकुल दिसत नसे. त्याने ही इंग्रजी इंटरनॅशनल शाळा काढल्याचे त्यामुळेच मला आश्चर्य वाटले. मी भूतकाळात हरवलो.
मुळे गुरुजी म्हणजे आमच्या आजूबाजूच्या गावांमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. मराठी भाषेचे गाढे अभ्यासक आणि प्रचारक. आज माझं माझ्या भाषेवर जे प्रभुत्व आहे ते केवळ त्यांच्यामुळेच. केवळ मीच नाही तर आमच्या बरोबरच्या अनेक पिढ्या मुळे गुरुजींनी घडविल्या. परिसरातील विद्यार्थ्यांचे भाषाशुद्धी करण्याचं सर्वात मोठे श्रेय त्यांनाच. ते मराठी भाषेचे विद्यावाचस्पतीच होते जणू! आमच्या सर्वांच्या तोंडून 'मपलं-तुपलं' ची भाषा काढून काढून 'माझं-तुझं' त्यांनी रूळवलं. भाषेचे अलंकार आम्हाला शिकवले. कोणता शब्द कुठे कसा वापरायचा? हे त्यांच्यामुळेच आम्हाला समजलं. आज कुणाशी बोलताना वाक्प्रचार आणि म्हणीचा वापर आम्ही करतो तोही मुळे गुरुजींच्या शिक्षणाचीच देणगी आहे. आमची आजी देखील कोणाला पत्र पाठवायचं असल्यास मी ते पत्र लिहिल्यानंतर सर्वप्रथम मुळे गुरुजींना दाखवून आणायला लावायची. केवळ तीचाच नाही तर गावातील जवळपास सर्वच कुटुंबांचा मुळे गुरुजींवर व त्यांच्या भाषेवर अतिशय दृढ विश्वास होता. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, ही त्यांची मनोमन इच्छा होती. एखादी नवी भाषा शिकायची असल्यास आधी आपल्याला आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व असायला हवे, हा विचार त्यांच्यामुळेच माझ्यामध्ये रुजला. आजही माझे इंग्रजीवर जे प्रभुत्व आहे ते केवळ याच मातृभाषेतील शिक्षणामुळे. आजही अनेकदा बालपणाच्या गप्पा होतात तेव्हा मुळे गुरुजींचा विषय निघत नाही, असं कधीच होत नाही. एक आदर्श भाषा शिक्षक कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मुळे गुरुजी ओळखले जात असत.
पण आज पाहिलेल्या त्या पिवळ्या बसवरील 'मुळे गुरुजी इंटरनॅशनल स्कूल' या नावाने मला अतिशय वाईट वाटून गेले. मराठी भाषेच्या वाचस्पतीच्या मुलानेच एखादी भरपूर पैसे कमावणारी इंग्रजी शाळा काढावी व शिक्षणाचा व्यवसाय करावा, हीच गोष्ट मला रुचली नाही. त्यादिवशी दिवसभर मी हाच विचार करत होतो.
व्यक्तींचे विचार चांगले असतात. परंतु विचारांचा वारसा जपला पाहिजे आणि हा वारसा पुढच्या पिढींपर्यंत नेला पाहिजे. विचार जपणारेच खरे वारसदार होय बाकी रक्ताची नाती फक्त नावाचा वापर करतात. हा धडा त्यादिवशी कायमस्वरूपी माझ्या मनामध्ये कोरला गेला. अजूनही असं वाटतंय की, मुळे गुरुजींच्या नावाने मराठीसाठी काहीतरी भरीव व्यासपीठ तयार करून द्यावं!



रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

मॉन्टेसरी स्कुलमधील एक दिवस!

आमच्या एका सख्या मित्राची मुलगी जवळच्या मॉन्टेसरी स्कूलमध्ये छोटा शिशु अर्थात "ज्युनिअर केजी"मध्ये शिकते. तो तिला रोज दुपारी साडेबारा वाजता नियमितपणे आणायला येत असतो. अर्थात वर्क फ्रॉम होम असल्यामुळेच! एक दिवशी त्याला यायला जमणार नव्हतं. म्हणून त्याने मला फोन करून तिला शाळेतून घरी न्यायला सांगितलं. ही शाळा माझ्या घरापासून जेमतेम अर्धा किलोमीटरवर आहे. त्यामुळे मी लगेचच तयार झालो. 

दुपारी बरोबर बारा वाजून २५ मिनिटांनी मी शाळेच्या प्रवेशद्वारावर हजर होतो. माझ्यासारखे अन्य बरेच जण आपल्या मुलांना घेण्यासाठी त्या प्रवेशद्वाराभोवती गर्दी करून उभे होते. मी देखील त्याच गर्दीमध्ये सामील झालो. पाच मिनिटांनी शाळा सुटणार होती. आतमध्ये मुलांची चुळबूळ चालू असल्याचे जाणवले. पलीकडेच एका कोपऱ्यामध्ये एका पालकांचे शिक्षकांशी तावातावाने संभाषण चालू असल्याचे मला दिसले. आपल्या पाल्याच्या अर्थात मुलाच्या प्रगतीवरून सदर पालक शिक्षकांना झापत होता. 

"हे बघा मॅडम माझ्या मुलीला बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकवलेल्या नाहीयेत.", असं सांगताना त्या पालकांचा सूर अतिशय रागावलेला दिसत होता. 

"पण काही गोष्टी तुम्ही देखील घरी घ्यायला हव्यात, असे आम्हाला वाटतं.", शिक्षकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. 

"मग तुम्हाला आम्ही फी कशासाठी देतोय? माझ्या मुलाला सर्व काही यायलाच हवं. जर ते त्यालाही आलं नाही तर उरलेली फी मी देणार नाही!" 

त्यांचं संभाषण ऐकून मला धक्काच बसला. ज्युनिअर केजीमध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलाला सर्व काही आले पाहिजे. त्यासाठी पाहिजे तेवढी फी मी द्यायला तयार आहे. हा दृष्टिकोन वाचून ऐकून मी हादरूनच गेलो! शिवाय जुन्या काळात मी अनुभवलेलं शिक्षक-पालक संभाषण आणि आत्ताचं शिक्षक-पालक संभाषण यामध्ये जमीन-आसमानापेक्षा अधिक फरक जाणवत होता. पालकांच्या आपल्या मुलाकडून आणि शिक्षकाकडून किती भयावह अपेक्षा आहेत, याची प्रचिती त्यादिवशी आली. प्रत्येकाला आपल्या मुलाने स्पर्धेत पहिले आले पाहिजे, असं वाटू लागलय. त्यासाठी पाहिजे तेवढे पैसे मोजायला आम्ही तयार आहोत, ही त्यांची भावना झाली आहे. अशा अभूतपूर्व पेचप्रसंगातून आपण पुढच्या पिढ्या कशा घडवणार आहोत? हा अतिशय मोठा प्रश्न आहे.



शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

नेहमीच कुत्रं

सकाळी सातच्या सुमारास म्हणजे जेव्हा गाड्यांविना रस्ते रिकामे असतात त्या काळात रस्त्यांवर रिकामटेकड्या कुत्र्यांचं साम्राज्य असतं. एखादी चार चाकी गाडी दिसली की त्याच्यामागे काही मीटर अंतरापर्यंत भुंकत जायचं आणि जणू काही मीच गाडी पळवून लावली आहे, या अविर्भावात परत मागे फिरायचं. असा रस्त्यावरील अनेक कुत्र्यांचा उद्योग असतो!

माझ्या ऑफिसची वेळ बदलल्यामुळे सकाळी सात वाजताच मला घरून निघावे लागत असे. त्यामुळे रस्त्यावर ट्राफिक लागत नव्हती. पण गाडीच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यांचा त्रास मात्र व्हायला सुरुवात झाली. इमारतीतून बाहेर पडलं की, हमरस्त्यावर एक पांढऱ्या रंगाचं कुत्रं नेहमी माझ्या कारच्या मागे लागायचं. मी त्याचं काय घोडं मारलं होतं? हे त्यालाच ठाऊक. गाडी मुख्य रस्त्याला लागली की अगदी शंभर मीटर अंतरावर हे कुत्रं रस्त्याच्या डाव्या बाजूला एका फूटपाथवर बसून असायचं. त्याला गाडीचा आवाज आला की कान टवकारायचं आणि गाडी जवळ आली की जोरजोराने भुंकत गाडीबरोबर पळत राहायचं. हा त्याचा नेहमीचा उद्योग बनला होता. कदाचित त्याला ही गाडी कोण चालवतं, त्या मनुष्याचा अर्थात माझा चेहरा देखील माहित नसावा! पण नित्यनेमाने त्याचा भुंकण्याचा व गाडीमागे पळण्याचा उद्योग मी अनुभवू लागलो. सुरुवातीला दोन दिवस थोडसं घाबरायला झालं होतं. हे कुत्रं माझ्या गाडीच्या खाली तर येणार नाही ना? याची भीती वाटत होती. परंतु नंतर मला पण त्याची सवय व्हायला लागली. संध्याकाळी ऑफिस वरून परतताना मात्र त्याचं दर्शन व्हायचं नाही. त्यावेळेस रस्त्यावर रहदारी देखील खूप मोठ्या प्रमाणात असायची. त्यामुळे कदाचित ते कुठेतरी दुसरीकडे हुंदडायला किंवा आराम करायला जात असावं. सकाळच्या प्रहरी मात्र त्याचा भुंकण्याचा शिरस्ता काही बंद व्हायचा नाव घेत नव्हता.
एक दिवस मला सकाळी ते कुत्रं दिसलच नाही अर्थात ते नेहमीच्या ठिकाणी नव्हतं. थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या पलीकडून उजव्या बाजूला असणाऱ्या बिल्डिंगच्या परिसरातील कुत्रीबरोबर त्याची मौजमस्ती चाललेली मला दिसली! त्यामुळेच आज मला आणि माझ्या गाडीला त्याचे दर्शन झाले नाही. दुसऱ्या दिवसापासून ते नियमितपणे सकाळी गाडीच्या मागे पडण्याचे काम बजावू लागले. एक दिवस तर त्याने आणखी तीन-चार कुत्री गोळा केली होती. विशेष म्हणजे त्या दिवशी ते तिघे चौघे जण देखील भुंकत भुंकत माझ्या गाडीच्या मागे पळायला लागले! माझी गाडी अनेक दिवसांपासून कुत्र्यांसाठी उत्सव मूर्ती झाली होती. नेहमीचीच गाडी असली तरी ते कुत्रं भुंकण्याचं काही सोडत नव्हतं. यामागे त्याचं काय प्रयोजन असावं? हे मला कधीच समजले नाही.

इतक्या दिवसांमध्ये त्याला माझ्या गाडीचा नंबर देखील पाठ झाला असावा, असं मला वाटतं. रविवारच्या दिवशी ते माझ्या गाडीला 'मिस' करत असावं, असं देखील वाटून गेलं! एक दिवस थोडा वेगळा उजाडला. त्यादिवशी देखील ते कुत्रं मला नेहमीच्या जागेवर दिसले नाही त्याच्याबरोबर असलेली अन्य कुत्री तिथे बागडत होती. पण माझी नजर त्याच नेहमीच्या कुत्र्याला शोधू लागली. थोडं पुढे अंतरावर गेल्यावर उजव्या बाजूच्या बिल्डिंग समोर देखील बघितले. तिथे देखील ते नव्हतं. फुटपाथचा रस्ता संपला आणि पूल सुरू झाला. एका अर्थाने त्या कुत्र्याची हद्द संपली होती. पण थोड्याच अंतरावर मला ते दृश्य दिसले. पलीकडच्या बाजूने फुटपाथला लागून ते कुत्रं निपचित पडून होतं. कदाचित कोणत्यातरी वाहनाने त्याला धडक दिली असावी. त्याने तोंडाचा 'आ' वासलेला होता आणि डोळे उघडे होते. त्या दिवशी माझ्या गाडीने नेहमीचा सकाळचा सोबती गमावला होता.

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

तीन पायांची शर्यत - बाळ फोंडके

विज्ञानकथा या बऱ्याचदा कल्पकतेच्या आधारावर रचल्या गेल्या असल्या तरी त्या विज्ञानाला धरूनच असतात, हे या कथांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. बाळ फोंडके हे त्यांच्या विविध कथासंग्रहातून विज्ञाननिष्ठ लेखक म्हणून परिचयात आहेत. 

या कथासंग्रहामध्ये देखील ते आपला विज्ञाननिष्ठ बाणा सोडत नाहीत. विशेष म्हणजे या पूर्ण कथासंग्रहातील कथा या गर्भाशय आणि मातृत्व या दोनच गोष्टींविषयी भाष्य करताना दिसतात. एक हाडाचा वैज्ञानिक उत्तम साहित्यिक असतो तेव्हा अशा कथा तयार होतात, असे बाळ फोंडके यांच्याबद्दल म्हणता येईल. प्रत्येक कथेचे बीज हे मातृत्व संकल्पनेभोवती तयार झालेला आहे. मातृत्व म्हणजे नव्या जीवाला जन्म देणं. जेव्हा एखादा नवा जीव या विश्वामध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेस तयार झालेले वैज्ञानिक गुंते व त्यातून निर्माण होणारे भावनिक गुंते या कथांमधून आपल्याला समोर येतात आणि त्यातून विज्ञानाची किमया देखील पक्की लक्षात येते. एकेकाळी जेव्हा विज्ञान प्रगत नव्हतं तेव्हा स्त्रियांना मातृत्वाविषयी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. पण प्रगतीच्या नव्या द्वारांनी अनेक अडचणींवर मात केली. त्यातून आई होण्यासाठी स्त्रीला येणाऱ्या अडथळ्यांवर विज्ञानाने उपाय सुचवले. पण यातून सामाजिक आणि भावनिक समस्या देखील तयार होत गेल्या. हा एकच गाभा असला तरी प्रत्येक कथेचे बीज हे निरनिराळे आहे. किमान स्त्रियांना तरी ते विशेष भावेल, याची आशा वाटते. 



रातराणीचे रहस्य

महाराष्ट्रातील रहस्यकथाकारांच्या परंपरेत गुरुनाथ नाईक हे एक अग्रणी आणि अत्यंत लोकप्रिय नाव आहे. ७०, ८० आणि ९० च्या दशकात त्यांनी रहस्यकथा वा...