बुधवार, २ मार्च, २०२२

चकवा

दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मध्यरात्र होत आली तरीदेखील पावसाच्या वेगामध्ये जराही फरक पडलेला जाणवत नव्हता. रात्री अकरा वाजता त्याने नाशिक फाटा सोडला. आपल्या कारने त्याने नाशिकच्या दिशेने प्रवास चालू केला होता. बायको त्याला रात्रीचा प्रवास करू देत नसे. त्यातल्या त्यात एकट्याने तर मुळीच नाही. पण तिला न सांगताच त्याने गाडी नाशिकच्या दिशेने वळवली होती. प्रवास सुरू झाल्यानंतर पंधरा मिनिटांमध्ये तिचा त्याला फोन आला. तेव्हा तिला समजले की तो एकटाच नाशिककडे निघालेला आहे. रात्रीचा आणि पावसातला प्रवास असल्यामुळे ती अजूनच काळजीमध्ये पडली. पण पर्याय नव्हता. त्याला सकाळीच आठ वाजता नाशिकमध्ये एक मीटिंग होती. म्हणून आजच नाशिकमध्ये पोहोचणे गरजेचे होते. 

नाशिकला कॉलेज रोडच्या टोकाला असणाऱ्या वडिलोपार्जित जागेत तो राहत होता. आज त्या घरात दोघेच नवरा बायको राहत असत. मुलाला साताऱ्यात कुठल्यातरी बोर्डिंग स्कूलला घातले होते. कामाच्या निमित्ताने त्याच्या नेहमीच पुण्यामध्ये वाऱ्या असायच्या. जवळपास प्रत्येक वेळेस ती त्याच्यासोबत असायची. पण वडिलांच्या आजारपणामुळे या वेळेस तिला त्याच्यासोबत यायला जमले नाही. म्हणून ती काळजी करु लागली होती. मी पाच तासांमध्ये सुखरूप पोहोचेल, असा त्याने तिला शब्द दिला व फोन ठेवला. 

रस्त्यावर तशी फारशी गर्दी नव्हतीच. अधुन-मधुन एखादे वाहन नजरेस पडायचे. मागील एक वर्षापासून सर्वांचेच 'वर्क फ्रॉम होम' सुरू झाल्यानंतर ही वर्दळ कमीच झाली होती. शिवाय कोविडची दुसरी लाट कमी झाली होती पण प्रादुर्भाव अजूनही असल्याने लोक बाहेर पडायचे टाळत होते. तो मात्र बिनधास्त होता. ऑनलाईन मीटिंग करण्याऐवजी समोरासमोर प्रत्यक्ष बोलण्यामध्ये त्याला जास्त इंटरेस्ट वाटायचा. म्हणूनच आपल्या कामासाठी तो पाच-पाच तास देखील ड्रायव्हिंग करत होता.

गाडी चालवताना रेडिओवर किशोर-लताची गाणी त्याने लावलेली होती. दर प्रवासामध्ये तो रेडिओ ऐकत ड्रायविंग करायचा. पण जसजशी गाडी पुण्यापासून लांब जायला लागली तस-तशी रेडिओची रेंज देखील कमी झाली. नंतर फारच खरखर आवाज यायला लागला. मग त्याने रेडिओ बंद करून टाकला. 

आता गाडीमध्ये कशाचाही आवाज येत नव्हता. इंजिनचा संथपणे येणारा आवाज, गाडीवर पावसाचे पडणारे थेंब आणि वायफरची सातत्याने वाजणारी धून... हाच आवाज त्याच्या कानावर पडत होता. त्याने घड्याळामध्ये पाहिले...  बारा वाजून पंचवीस मिनिटे झाली होती. या ८५ मिनिटांमध्ये त्याने ८५ किलोमीटरचे अंतर पार केले होते. ज्या आळेफाट्यामध्ये सातत्याने रहदारी असते ते गाव शांतपणे झोपलेले त्याने बघितले. एखाद दुसरी गाडी रस्त्यावरून प्रवास करत होती. आळेफाटा संपला की रस्त्याची ट्राफिक कमी होते, हा त्याचा नेहमीचा अनुभव होता. रस्त्यावर ट्राफिक तर नव्हतीच. पण आता एखादी गाडी दिसणे देखील दुरापास्त झाले होते. पावसामुळे त्याला गाडीचा वेग देखील अधिक वाढवता येत नव्हता. झोपेची गुंगी चढायला लागली होती. अधिक विचार करणे हा झोपेच्या गुंगीवरचा त्याला उपाय वाटायचा. काही कटू, काही गोड आठवणी त्याला आठवायला लागल्या. 

मागच्याच आठवड्यामध्ये त्रंबकेश्वरला गेलो होतो तेव्हा बायकोने त्याची गंमत केली होती. त्याचं वजन मागच्या दोन वर्षांमध्ये ८५ किलोवर पोहोचले होतं. जेव्हा ८५ किलोच्या देहाचा हा पाय क्लचवर पडत असेल तेव्हा त्याला बिचार्‍याला काय वाटत असेल! असं ती गंमतीने म्हणाली होती. तेव्हापासून त्याने क्लचवर पाय दिला की, आपल्या ८५ किलो देहाची आठवण व्हायची. तसं पाहिलं तर दोघांचाही जन्म ८५ सालातलाच! पण तिचं वजन त्याच्या निम्म्या वजनाइतकच होतं. म्हणून आता त्याने वजन कमी करायचं मनावर घेतलं होतं. 

बायको नाशिकला वाट पाहत असेल, कदाचित ती जेवली देखील नसेल असं वाटल्यामुळे त्याच्या मनात चलबिचल झाली. रस्त्याच्या कडेला लावलेल्या मैलाचा दगड दिसून आला. नाशिक अजूनही ८५ किलोमीटर अंतरावर होतं. फार फार तर दोन तासांमध्ये घरी पोहोचू, असा अंदाज त्यांने बांधला. संगमनेर जवळ येत होतं. आता रस्त्याला दोन तीन गाड्या दिसायला देखील लागल्या. 


हिवरगाव पावसा टोलनाका जवळ आला होता. टोलगेटची अलिकडे लावलेली पाटी त्याला दिसली. दूरवरुन पावसात चमकणारे लाल दिवे टोलनाका जवळ आल्याचे दर्शवीत होते. त्याने वेग कमी केला. टोलनाक्याच्या प्रत्येक बूथमध्ये जवळपास एक गाडी तरी होतीच. त्याने कारच्या एका लेनमध्ये आपली गाडी घुसवली. पुढे जाईपर्यंत आधीची गाडी निघून गेली होती. त्याचा थेट नंबर लागला. बूथपाशी आल्यावर त्याने काच खाली घेतली. टोल जमा करणाऱ्याने बाहेर हात काढला व म्हणाला, 

"८५ रुपये द्या." 

मग त्याने शंभरची नोट काढली आणि टोल भरण्यासाठी दिली. 

"साहेब पुढच्या महिन्यापासून डबल टोल भरावा लागेल. फास्टटॅग लावून घ्या.", असं म्हणत त्याने सुट्टे पैसे दिले. पण ते घेत असताना 'मला मला माहित आहे... मला नको शिकवू!' असे काहीसे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर होते. त्यांने मिळालेले सुट्टे पैसे शेजारच्या कप्प्यामध्ये ठेवले. कप्पा बंद केला व गाडी सुरु केली. 

टोलनाका ओलांडून पुढे आल्यावर परत पावसाचे थेंब गाडीवर वेगाने पडायला लागले. वायपर पुन्हा सुरू झाला आणि गाडी नाशिकच्या दिशेने प्रवास करू लागली. झोपेची गुंगी वाढत असल्याने डोकं गरगरायला लागलं होतं. पण लवकरात लवकर घरी पोहोचण्याचे उद्दीष्ट लक्षात ठेवून तो वेगाने गाडी चालवायला लागला. विचारचक्र थांबलेले होतं. त्याची नजर आता फक्त समोरच्या रस्त्यावर होती. रस्त्यावर पडणारे पावसाचे थेंब हेडलाईटमुळे चमकत होते. त्यातच तो गुंतून गेला आणि समोर पुन्हा टोल नाक्याचे गेट दिसायला लागले. हा टोलनाका नक्की कुठला? असा प्रश्न त्याला पडला. तो गोंधळून गेला. आत्ताच तर टोल दिला ना, मग परत टोलनाका कसा आला? उत्तर मात्र सापडले नाही. 

त्याने गाडीचा वेग कमी केला आणि डावीकडून दुसऱ्या बूथमध्ये गाडी नेली. समोरची गाडी निघून गेली होती. आता याचाच थेट नंबर लागला. गाडी थांबली व खिडकीची काच त्याने खाली घेतली. टोल बूथवरील कर्मचाऱ्यांने हात बाहेर काढला आणि सांगितले, 

"साहेब ८५ रुपये द्या." 

तो अजूनही गोंधळलेला होता. त्याने शेजारचा कप्पा उघडला. पण त्यामध्ये मगाशी दिलेले सुट्टे पैसे व टोलची पावती देखील नव्हती! हा त्याच्यासाठी एक धक्का होता. त्याने शंभरची नोट काढली व टोल भरण्यासाठी दिली. पावती काढत असताना टोल कर्मचाऱ्याने त्याला सांगितले, 

"साहेब फास्ट टॅग लावून घ्या, पुढच्या महिन्यापासून टोल डबल होणार आहे!" 

तो फक्त ऐकत होता. यावेळेस त्याच्या मनातले हावभाव मात्र निराळेच होते. त्याने गुपचूप सुट्टे पैसे घेतले. टोलची पावती घेतली आणि शेजारच्या कप्प्यामध्ये ठेवली. गाडी सुरु झाली आणि परत पावसाचे थेंब गाडीवर वेगाने आदळू लागले. 

तो काहीसं सुन्न झाल्यासारखा गाडी चालवू लागला. दुभाजकाच्या पलीकडून एखाद दुसरी गाडी विरुद्ध दिशेने जात होती. त्याचा प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला की त्याला आपणच गाडी चालवत असल्याची जाणीव व्हायची. रस्त्याकडे एकटक बघत तो गाडी चालवत होता. दोनच मिनिटात पुन्हा टोलनाक्याचे गेट समोर दिसायला लागले. तोच पावसामध्ये दिसणारा लाल रंगाचा दिवा पुन्हा चमकू लागला. प्रत्येक टोल बूथवर जवळपास एक गाडी उभी होती. त्याच्या काळजात धस्स झाले. यापूर्वी दोन वेळा टोल दिला होता. तरीदेखील परत तिसऱ्यांदा टोल नाका आला! त्याचा गाडीचा वेग अचानक मंदावला. तो आजूबाजूला पाहू लागला. हा तोच टोलनाका होता जिथे त्याने यापूर्वी दोनदा टोल दिला होता. परत त्याने गाडी डावीकडून दुसऱ्या टोलबुथमधे नेली. समोरची गाडी निघून गेली आणि पुन्हा याचा नंबर लागला. एव्हाना एक्सलेटरवर असणारा त्याचा पाय काहीसा थरथरू लागला होता. नक्की चाललंय काय? या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळत नव्हते. टोलबुथपाशी गाडी थांबली व त्याने काच खाली घेतली. पुन्हा तोच टोलनाक्यावरचा कर्मचारी त्याच्याकडे बघत होता. त्याने हात बाहेर काढला आणि बोलला. 

"साहेब ८५ रुपये द्या." 

हा मात्र सुन्न होऊन त्या कर्मचाऱ्याकडे बघत होता. नकळतपणे त्याने खिशातून शंभर रुपये काढले व टोलसाठी दिले. टोल कर्मचाऱ्याने संगणकामध्ये एन्ट्री केली आणि पावती फाडून ह्याच्याकडे दिली व म्हणाला, 

"साहेब पुढच्या महिन्यापासून टोल डबल होणार आहे, फास्ट टॅग लावून घ्या." 

पुन्हा तीच वाक्ये त्याच्या कानावर आदळत होती. मेंदू बधिर व्हायला लागला होता. तो एकटक समोरच्या रस्त्याकडे बघत होता. तेवढ्यात त्याच्या मागून आलेल्या गाडीने जोरदार हॉर्न वाजवला. तो भानावर आला व त्याने गाडी चालू केली. 

पाऊस अजूनही त्याच वेगाने बरसत होता. गाडीवर पडणाऱ्या थेंबांची तीव्रता देखील तीच होती. रस्ते देखील त्याच वेगाने पाण्याचे प्रवाह बाहेर फेकत होते आणि तो मात्र सुन्नपणे गाडी चालवत होता. असंच चालू राहिलं तर तो नाशिकला कधी पोहोचणार? प्रश्न विचित्र होता आणि उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हतं. तो एखादं स्वप्न तर पाहत नाही ना, याची खात्री देखील त्याने स्वतःला चिमटा घेऊन केली. पण अजूनही तो वास्तवातील जगातच वावरत होता. मात्र परिस्थिती त्याला वास्तवापासून दूर नेणार होती. यातून बाहेर पडायचं असं एकच उद्दिष्ट मनात ठेवून त्याने गाडीचा वेग वाढवला एक्सलेटरवरचा पाय त्याने मागेच घेतला नाही. गाडी वेगाने पावसातील तो रस्ता तुडवत पुढे जाऊ लागली. तिचा वेग वाढत होता आणि स्पीडोमीटरचा काटा ८० आणि ९० च्या बरोबर मधे येऊन थांबलेला होता. ही गाडीच्या वेगाची सर्वोच्च मर्यादा होती! कदाचित गाडीला ती मर्यादा ओलांडायची नव्हती! पावसाचे थेंब वेगाने समोरच्या काचेवर आदळत होते आणि त्याची गाडी ८५ च्या वेगाने पावसाचे थेंब अंगावर झेलत त्या रस्त्यावरून प्रवास करत होती. 

अन्यत्र दिसणाऱ्या गाड्या आता मात्र लुप्त झाल्या होत्या. तो थरथरत्या हाताने स्टेरिंग पकडून बसलेला होता. पायांची देखील वेगळी स्थिती नव्हती. मन बधीर झालं होतं. या चक्रातून त्याला बाहेर पडायचं होतं. परंतु कदाचित नियतीला ही गोष्ट मान्य नव्हती. रस्त्यावर आलेल्या एका अडथळ्याला गाडी जोरदार धडकली व दोन तीन गिरके घेत खाली पडली. भयंकर मोठा आवाज झाला. त्याचे शरीर बधीर झाले होते आणि मेंदू सुन्न... हळू हळू मेंदूवरील गुंगी वाढत गेली आणि त्याला काहीच कळेनासं झालं. तो शुद्धीतून बाहेर आला तेव्हा एका गादीवर सरळ झोपलेला होता. पापण्या उघडायला देखील त्याला बरेच कष्ट पडले. अगदी ताठ स्थिती मध्येच त्या गादीवर तो पडलेला होता. त्याचं शरीर अवघडलेल्या स्थितीमध्ये होतं. कदाचित तो याच स्थितीमध्ये बरेच दिवस पडलेला असावा, असं त्याला जाणवत होतं. डाव्या बाजूने व मागच्या बाजूला अर्थात डोक्याच्या बाजूला त्याला कुठल्याश्या मशीनमधून बीप-बीप असा आवाज येत होता. असा आवाज त्याने यापूर्वी हॉस्पिटलमध्ये ऐकलेला वाटला. मान अवघडल्यासारखी झाली होती. तरीही त्यांने मान वळवून उजव्या बाजूला पाहिले. 

एका लोखंडी खांबाला पॅड अडकवलेले होते. त्यावर गिचमिड्या अक्षरांमध्ये बरंच काही लिहिलेलं त्याला दिसलं. त्याच्या वरच्या बाजूला लिहिलेलं होतं... दिवस ८५ वा! त्याच्याच खालच्या बाजूस एका हॉस्पिटलचे नाव लिहिलेलं होतं. म्हणजेच तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता तर! काही प्रश्नांची उत्तरं त्याला मिळायला लागली. तब्बल ८५ दिवस तो या हॉस्पिटलमध्ये असाच पडलेला होता! मग त्याने मान वरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. मघापासून येणारा बीपचा आवाज त्याला त्रासदायक वाटायला लागला होता. मागे लावलेली मशीन्स त्याला नीटशी दिसत नव्हती. तरीही अंग थोडसं उचलून त्याने वरच्या दिशेने मागे बघितले. एका मशीनवर डिस्प्ले स्क्रीनवर त्याच्या हृदयाचे ठोके दिसत होते आणि आकडा होता... ८५!

मंगळवार, १ मार्च, २०२२

नावाची गंमत

आतमध्ये खेळायला जाण्यासाठी गेटवर मुलांच्या नावाची 'एंट्री' करायची होती. त्यादिवशी प्रवेशद्वारावर बरीच गर्दी झालेली होती. थोड्याच वेळात आमचा नंबर आला. मी माझ्या मुलीचे नाव सांगितले... ज्ञानेश्वरी. नाव लिहीणाऱ्या त्या मुलीने पेन उचलला आणि लिहायला लागली. इंग्रजीमध्ये लिहायचा अट्टाहास असल्यामुळे तिला काही स्पेलिंग सुचेना. दोन-तीन सेकंद विचार करून तिने पुन्हा माझ्याकडे बघितले आणि विचारले, "स्पेलिंग सांगा..."



मी स्पेलिंग सांगायला सुरुवात केली, "dnya...."
यावर तिने मला मधेच थांबत विचारले, "d वरून सुरू होते का स्पेलिंग?"
मी स्मितहास्य करतच उत्तरलो, "हो".
तिला पूर्ण स्पेलिंग सांगितले. तरीही काही समजले नाही. मग मीच पेन हातात घेतला आणि त्या कागदावर स्पेलिंग लिहून काढले... Dnyaneshwary.
तिने मी लिहिलेले नाव बघितले आणि म्हणाली, "अच्छा! धनेश्वरी नाव आहे काय!"
यावर मला हसू आवरेना. 'ज्ञ' अक्षराला मराठी मध्ये काय स्पेलिंग असतं, हे अजूनही बऱ्याच जणांना माहित नाही. त्यातीलच एक हे उदाहरण होतं. माझ्या मुलीच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये बारा अक्षरे येतात. त्यामुळे इंग्रजीतलं हे नाव बरेच मोठे होतं. अर्थात यामुळे ते लिहायलाही अडचण होत असते. पण, त्यामुळे आपण नाव तर बदलू नाही शकत!
आम्ही आमच्या ज्ञानेश्वरीला घरी नावाने 'ज्ञानू' म्हणतो. शेजारची एक मुलगी नुकतीच तिची मैत्रीण झाली होती आणि त्यानंतर काही दिवसातच ज्ञानेश्वरीचा वाढदिवस आला. त्यादिवशी शेजारच्या तिच्या मैत्रिणीने तिला गिफ्ट आणून दिले. अर्थात इंटरनॅशनल इंग्रजी शाळेमध्ये ती शिकत असल्यामुळे तिने त्या गिफ्टवर इंग्रजीतच लिहिले होते,
"Dear Nano!"
ते वाचून आम्ही टाटांच्या एका गाडीलाच जन्म दिला आहे की काय, असं वाटून गेलं!

कोथिंबीर

दुपारची वामकुक्षी त्यादिवशी फारच काळ लांबली. झोपेतून जाग आली तेव्हा घड्याळामध्ये पाहिले, संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. घड्याळातल्या त्य...