शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

एका मेलेल्या भाषेची गोष्ट!

(इसवी सन २१४८ मधली ही गोष्ट आहे. आज ही गोष्ट मी मराठीमध्ये लिहीत असलो तरी यात असलेले संवाद भविष्यकालीन इंग्रजी भाषेतील आहेत. ते आजच्या वाचकांना समजावेत म्हणून मराठीमध्ये भाषांतरित केलेले आहेत!)


बऱ्याच दिवसांपासून ल्युसी आपल्या आजोबांच्या अर्थात टॉमच्या मागे लागली होती. तिने आपलं मूळ गाव कधीच पाहिलं नव्हतं. किंबहुना टॉम देखील आपल्या मूळ गावी अनेक वर्षांतून कधीतरी फेरफटका मारायचे. शहरातल्या गजबजलेल्या वातावरणाची सवय झाल्यामुळे त्यांना देखील गावाची फारशी ओढ राहिलेली नव्हती. परंतु ल्युसी मात्र आपल्या गावाला जायला फार उत्सुक होती आणि अखेरीस तिने आपल्या ग्रँडपाला घेऊन गावी जाण्याची योजना आखलीच.
आपल्या हायपर सोनिक कारने त्यांचा केवळ वीस मिनिटांचा प्रवास होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांची कार गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाशेजारी उतरली. अशा कार ह्या परिसरामध्ये नेहमीच येत असत. गाव ही संकल्पना जवळपास नष्ट झाल्यात जमा होती. आजूबाजूला रोबोटिक शेती असली तरी लोकांचे भले मोठे अत्याधुनिक बंगले दिसून येत होते. पडीक जमीन कुठेच उरलेली नव्हती. शेतकरी ही संकल्पना देखील राहिली नव्हती. शेतांमध्ये काम करण्यासाठी पूर्णतया रोबोट राबताना दिसत होते.
गावातील सर्व बंगल्यांच्या मागील बाजूस एक छोटेखानी जीर्ण झालेला पडीक बंगला होता. याच ठिकाणी टॉमचा जन्म झाला होता. पण मागच्या कित्येक वर्षांमध्ये त्यांनी त्याच्या घराकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. घराची चावी देखील त्याच्याकडे नव्हती. त्यामुळे कुलूप तोडूनच घरामध्ये जावे लागणार होते. दरवाजासमोर पोहोचल्यानंतर जवळच पडलेल्या एका दगडाने त्याने कुलूप तोडून काढले.
घरामध्ये सर्वत्र कोळ्यांची निर्विवाद सत्ता दिसून आली. सर्वत्र त्यांनी जाळी टाकलेली होती. आत आल्यावर ल्युसी त्या घराकडे उत्सुकतेने बघत होती. कोपरान कोपरा न्याहाळत होती. मागच्या अनेक दशकांमध्ये नामशेष झालेल्या वस्तू तिला तिथे नजरेस पडल्या. वरच्या माळ्यावरील एका कोपऱ्यामध्ये एक लोखंडी पेटी देखील त्यांना दिसून आली. या पेटीमध्ये काय असावे? याची उत्सुकता ल्युसीला होतीच. तिला जुन्या काळातील चावीवाले कुलूप लावलेले होते. ते अतिशय जीर्ण झाल्यामुळे टॉमने ते दोन-तीन ठोश्यातच उघडले. तिच्यावरील धूळ खाली पडली व आतमध्ये जीर्ण झालेल्या अनेक वस्तू दिसून आल्या. यात वीस ते पंचवीस छापील पुस्तके देखील होती.


ल्युसीने त्यातील पहिले पुस्तक हातात घेतले. त्यावरील धूळ बाजूला सारली. तिला न उमजणाऱ्या एका लिपीतील ते छापील पुस्तक होते. तिने त्याची पाने चाळायला सुरुवात केली. सर्व पुस्तक त्याच अगम्य लिपीमध्ये लिहिलेले तिला दिसले. आतील भाषा न समजल्याने तिने टॉमकडे बघितले व विचारले,
"आजोबा ही कोणती भाषा आहे?"
यावर टॉमने तिच्या हातातून पुस्तक आपल्या हातात घेतले व तो देखील चालू लागला.
"बेबी ही शंभर वर्षांपूर्वी आपल्या परिसरात बोलली जाणारी एक भाषा होती. तिला मराठी असे म्हणत होते."
मग ल्युसीने विचारले, "हे कशाचे पुस्तक आहे?"
यावर टॉम मंदसा हसला आणि म्हणाला, "बाळा मला देखील हे वाचता येणार नाही. माझ्या आजोबांना मात्र ही भाषा ज्ञात होती. आज ही भाषा जाणणारे अतिशय कमी लोक आपल्या देशामध्ये उरलेले आहेत."
त्या भाषेच्या लिपीचा वळणदारपणा ल्युसीला विशेष भावला. काहीतरी सुंदरसं या भाषेमध्ये लिहिलं असावं, असं तिला वाटून गेलं. एक एक पान ती चाळत होती. त्या पानांचा जीर्णपणा पुस्तकाच्या प्राचीनतेचा पुरावा देत होता. टॉम देखील तिच्याकडे कौतुकाने बघत होता.
"ही भाषा आता कोणालाच माहित नाही का?" ल्युसीने विचारले.
यावर टॉमच्या चेहऱ्यावर खंतमिश्रित हसू तिला दिसले.
"नाही बाळा ही भाषा जाणणारे आज केवळ बोटांवर मोजण्याइतके लोक अस्तित्वात आहेत. ते देखील जुनी कागदपत्रे वाचण्यासाठी ही भाषा शिकलेत."
ल्युसीच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव टॉमला देखील समजत होते. ती या भाषेविषयी जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुक होती. तिने काही विचारण्याआधीच टॉमने सांगायला सुरुवात केली.
"काही दिवसांपूर्वी मी इंटरनेटवर एक लेख वाचला होता. त्यामध्ये आपल्या परिसरात एकेकाळी बोलल्या जाणाऱ्या या भाषेविषयी बरीच माहिती मला समजली. या भाषेमध्ये जसे आपल्या इंग्रजीमध्ये २६ अक्षरे असतात तशी ४८ अक्षरे होती आणि विशेष म्हणजे आपल्या भाषेतील a e i o u यासारख्या पाच स्वरांप्रमाणे १४ स्वर या भाषेमध्ये होते!"
टॉमने दिलेली ही माहिती ऐकताच ल्युसीच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक भाव उमटले व तिने लगेच प्रतिप्रश्न केला,
"मग ही इतकी समृद्ध भाषा नष्ट कशी झाली?"
टॉमसाठी हा प्रश्न अपेक्षित होताच. शिवाय त्याने वाचलेल्या लेखांमध्ये देखील ही माहिती सविस्तरपणे दिलेली होती.
"तीनशे वर्षांपूर्वी युरोपातील इंग्लंड नावाच्या देशाचे आपल्या देशावर राज्य होते. त्यांचीच भाषा म्हणजे इंग्रजी होय. जी आज आपण बोलतो आहोत. इंग्रज भारत सोडून गेले तरी त्यांनी आपली भाषा या देशामध्ये अस्तित्वात ठेवली. इंग्लंड बरोबरच अमेरिकेसारखे देश देखील ही भाषा बोलत होते आणि प्रगत देखील होत होते. त्याकाळी इंटरनेटवर प्रामुख्याने इंग्रजी भाषेचे राज्य होतं. म्हणून भारतीय लोकांनी हळूहळू ही भाषा आत्मसात करायचं ठरवलं. इतकं की ते त्यांच्या भाषाही विसरून गेले. भारतीय भाषांमधील शाळा कमी होत गेल्या. प्रत्येक भारतीयाला इंग्रजीमध्ये पारंगत होऊन भरपूर पैसे कमवायचे होते. अमेरिकेत स्थायिक व्हायचं होतं. म्हणून त्यांनी इंग्रजी शाळेबरोबरच इंग्रजी भाषा घरी देखील आत्मसात करायला सुरुवात केली. म्हणून मराठी सारखी भारतीय भाषा हळूहळू आपल्या घरांमधून हद्दपार होऊ लागली आणि अनेक दशकांनंतर तिचा अस्तित्व देखील संपल्यातच जमा झालं. आपल्या पूर्वजांनी मराठी भाषा सोडून इंग्रजीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आणि आपला भाषिक वारसा पुढील पिढ्यांमध्ये हस्तांतरित करण्याचे त्यांनी सोडून दिले. प्रत्येकाला केवळ इंग्रजी भाषेचेच ज्ञान त्यांनी दिले. म्हणून मराठी भाषा देखील कालांतराने नाश पावत गेली. पुढे काळ बदलला. जपानी, चिनी, रशियन, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश लोक मोठे होऊ लागले. त्यांचा देखील इंग्रजी इतकाच दबदबा तयार झाला. आज भारतीय लोक इंग्रजीच्या बरोबरच या भाषा देखील शिकतात आणि त्या देशांमध्ये स्थायिक होतात."
ल्युसीच्या चेहऱ्यावर आता टॉमला काळजीची छटा देखील दिसून यायला लागली होती. तिने पुढे विचारले,
"आजोबा त्या काळात आपले लोक असे का वागले असतील?"
"बाळा तसं पाहिलं तर आपल्या भारतीय लोकांना हजारो वर्षांपासून गुलामीची सवयच झालेली आहे. हजारो वर्ष गुलामगिरीमध्ये घालवल्यानंतर ही सवय सुटणार तरी कशी? स्वतःच अस्तित्व तयार करण्याऐवजी आपले पूर्वज दुसऱ्यांचा कित्ता मिळवण्यामध्ये समाधान मानू लागले. याच कारणास्तव आपली संस्कृती आणि भाषा देखील कालांतराने नष्ट झाली. त्याचाच परिपाक म्हणून आज आपण सांस्कृतिक आणि भाषिक गुलामगिरीमध्ये जगत आहोत. अर्थात आपल्या भोवतीच्या सर्व लोकांना ते पटते आहे. म्हणून आपल्यालाही ते पटवून घ्यायचे आहे!"
ल्युसीच्या मेंदूमध्ये विचारांचे काहूर माजायला सुरुवात झाली होती. आपले पूर्वज इतके मूर्ख होते का? या प्रश्नाचे उत्तर संधीग्धपणे तिच्या मनात तयार झाले होते. तिने पुढे विचारले,
"मग तत्कालीन राजकीय पुढार्‍यांनी आपली भाषा वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत का?"
तिच्या या प्रश्नावर टॉमच्या चेहऱ्यावर कुत्सित हसू दिसून आले व तो बोलला,
"तत्कालीन भारतीय राजकारण हे अतिशय वेगळे होते. राजकारणी स्वार्थी म्हणूनच जगत असत. जिकडे पैसा आणि सत्ता त्यांचीच री ओढण्याचे काम ते करत होते. त्या काळातील सरकारांनी इंग्रजी शाळांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आणि सरकारी अर्थात मराठी शाळा कशा बंद पडतील, याकडे व्यवस्थित लक्ष दिले. म्हणूनच इंग्रजी शिक्षण म्हणजेच दर्जेदार शिक्षण असा समज सगळीकडे पसरत गेला. इंग्रजी शाळा काढणाऱ्यांकडून राजकारण्यांना पैसा मिळतच होता. मग आपल्या भाषेचे काहीही होवो, याच्याशी त्यांना काहीच घेणेदेणे नव्हते. अनेक राजकीय पक्ष मराठी या मुद्द्यावर स्थापन झाले. पण कालांतराने त्यांनी देखील आपल्या भाषेला दूर करून त्यांच्या दृष्टीने लाभदायक असणारे मुद्दे हातात घेतले. याच राजकारण्यांची मुले देखील मोठमोठ्या इंग्रजी शाळांमधून शिकून राजकारणात आली. नंतर त्यांनी हळूहळू सगळीकडेच इंग्रजीचा अवलंब करण्यास प्रारंभ केला. आम्ही आमची भाषा टिकवण्यासाठी काहीतरी करतो आहोत, हे दाखवण्यासाठी त्यांनी शहरांमधील दुकानांच्या पाट्या मराठीत केल्या. परंतु हा केवळ दिखावा होता. लोकांना मूर्ख बनवण्याची कामे राजकारण्यांनी केली आणि स्वतःच्या स्वार्थापायी आपल्या भाषांच्या प्रगतीचे मार्ग तोडून टाकले. म्हणूनच आज आपण इंग्रजी बोलणारे 'इंग्रज' आहोत."
ल्युसीला समजलेला हा इतिहास धक्कादायक असाच होता. आज चीन, जपान, रशिया सारखे देश तसेच अनेक युरोपियन देशदेखील आपल्या भाषा समृद्ध करताना तिला दिसत होते. पण आपण मात्र इंग्रजीच्या गुलामगिरीत अडकून पडलो होतो. आपल्या समृद्ध भाषा नष्ट झाल्या होत्या. त्यांना काडीचीही किंमत उरलेली नव्हती. त्यादिवशी तिला प्रथमच आपल्या पूर्वजांचा भयंकर राग आला. पण काय करावे हे सुचत नव्हते आणि एके दिवशी इंटरनेटवर तिच्या वाचनात एक लेख आला. कोणी एकेकाळी व्यवहारातून नष्ट झालेली हिब्रू भाषा इस्त्राईलवासीयांनी पुन्हा स्वप्रयत्नाने व्यवहारात आणली होती. ल्युसीसाठी ही एक प्रेरणा ठरणार होती!

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

दि व्हॉल्ट ऑफ विष्णू

आज कित्येक वर्षानंतर ३०० पानी कादंबरी सलग वाचून संपवली! अश्विन सांघी यांनी लिहिलेली 'दि व्हॉल्ट ऑफ विष्णू' ही कादंबरी म्हणजे एक प्राचीन आणि सद्य परिस्थितीशी मेळ घालणारी थरारक रहस्य कादंबरी आहे. 

दीड हजार वर्षांपूर्वी चिनी प्रवासी ह्यूएन त्संग याने भारताला भेट दिली होती. त्याच्या प्रवासाचे चित्रण व त्याला अनुसरणाऱ्या सद्यपरिस्थितीचे कथानक असा मेळ घालणारी ही कादंबरी आहे. भारत आणि चीन या २१ व्या शतकामध्ये वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. शिवाय दोघेही सख्खे शेजारी असल्यामुळे स्पर्धा देखील प्रत्येक पातळीवर आपल्याला पाहायला मिळते. चार वर्षांपूर्वी चीनने भारताच्या डोकलाम येथे भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावर बराच गदारोळ देखील उठला. याच पार्श्वभूमीचा वापर करून लेखकाने भारत आणि चीन प्राचीन संबंधांपासून आज असलेल्या संबंधांपर्यंतचा लेखाजोखा या रहस्य कादंबरीमधून मांडलेला आहे. ह्यूएन त्संगचा प्रवास आणि आजच्या भारत व चीन मधील घडामोडी हे दोन्ही प्रसंग समांतर पद्धतीने या पुस्तकात रेखाटण्यात आलेले आहेत. 

ह्यूएन त्संगचा प्रवास हा अतिशय रोमांचकारी, अवघड आणि विविध साहसं व नशिबाने भरलेला जाणवतो. आपल्या लेखणीने लेखक आपल्याला दीड हजार वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातो. विशेष म्हणजे या प्रवास वर्णनात वापरलेली स्थळांची सर्व नावे तत्कालीन आहेत. यातूनच प्राचीन भारतातील बौद्ध संस्कृतीची घट्ट पकड देखील आपल्याला ध्यानात येते. तत्कालीन बौद्धमय भारत कसा होता, हे देखील अनुभवयास मिळते. सुरुवातीलाच या चिनी प्रवाशाच्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग स्थळांसहित नकाशामध्ये दाखविण्यात आलेला आहे. कदाचित तो नकाशा नसता तर कादंबरीतील वर्णन सुरस वाटले नसते. 

काही वर्षांपूर्वी तमिळ भाषेमध्ये अभिनेत 'एल्लम अरीवू' (हिंदी भाषांतरित-चेन्नई टु चायना) हा चित्रपट बनविला होता. बोधिधर्म या बौद्ध भिक्खूच्या चीन प्रवासावर आधारित या चित्रपटाचे कथानक होते. याच बोधिधर्मचा प्रवास व कर्तुत्व देखील कादंबरीमध्ये वाचायला मिळते. यात अनेक पात्रे आहेत, शेकडो घटना आहेत. परंतु त्यांचा मेळ अतिशय उत्तमरीत्या लेखकाने बसविल्याचा दिसतो. अतिशय शांतपणे व एकाग्र चित्ताने ती वाचल्यास त्याचे थरारकनाट्य व रहस्यभेद हे वाचनाची खरीखुरी अनुभूती देतात. तीन-चार ठिकाणी झालेले रहस्यभेद हे अनपेक्षित वाटून जातात, यातच लेखकाचे यश सामावलेले आहे!



बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

काबुल कंदाहरच्या कथा - प्रतिभा रानडे

सातत्याने अस्थिरतेच्या छायेत राहणारा देश म्हणजे अफगाणिस्तान होय. फार वर्षांपूर्वी हा देश असा नव्हताच. सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचा अफगाणिस्तान आणि आत्ताचा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मागील काही वर्षांपासून तो दहशतवाद आणि तालिबान या दोन नावांमुळे अधिक ओळखला जातो. याच कारणास्तव अन्य जगाला येथील माणसांबद्दल तसेच राहणीमानाबद्दल विशेष कुतूहल वाटत आलेलं आहे. याच कुतूहलापोटी प्रतिभा रानडे यांनी लिहिलेले 'काबुल कंदाहरच्या कथा' हे पुस्तक वाचायला घेतलं. 



लेखिका स्वतः अफगाणिस्तानमध्ये अनेक वर्षे राहिलेल्या आहेत. त्यांनी या देशामध्ये अनुभवलेले समाजजीवन विविध छोट्या छोट्या कथांमधून या पुस्तकांमध्ये चितारल्याचे दिसते. ज्याद्वारे अफगाणिस्तान मधील तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब आपल्याला पाहता येते. काही कथा या काल्पनिक देखील आहेत. परंतु अफगाणी संस्कृतीच्या माहिती सांगणाऱ्या आहेत. त्या वाचत असताना आपण अफगाणिस्तानमध्ये अप्रत्यक्षपणे वावरत राहतो. भारतातील सोमनाथ मंदिराची १७ वेळा लूट करणाऱ्या मोहम्मद घोरी यावर देखील एक सुंदर कथा या पुस्तकांमध्ये वाचता येते. शिवाय मोहम्मद घोरीच्या लूट प्रसंगावर कादंबरी लिहिण्यासाठी लेखिकेने बरेच संशोधन देखील केले होते. परंतु सदर कादंबरी पूर्णत्वास गेली नाही. एकंदरीत कादंबरीची संकल्पना मात्र उत्तम वाटली. अनेकांच्या औत्सुक्याचा विषय असणाऱ्या अफगाणी जीवन शैलीची ओळख करून देणारे हे पुस्तक वाचनीय असेच आहे.

- बाबुराव रामजी

कोथिंबीर

दुपारची वामकुक्षी त्यादिवशी फारच काळ लांबली. झोपेतून जाग आली तेव्हा घड्याळामध्ये पाहिले, संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. घड्याळातल्या त्य...