बुधवार, २० मार्च, २०२४

कोथिंबीर

दुपारची वामकुक्षी त्यादिवशी फारच काळ लांबली. झोपेतून जाग आली तेव्हा घड्याळामध्ये पाहिले, संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. घड्याळातल्या त्या काट्यांमुळेच खाडकन डोळे उघडले. सकाळी बाहेर जाताना यांनी बजावून सांगितले होते संध्याकाळी कोथिंबिरीच्या वड्या करायच्या आहेत बरं का. मी देखील त्यांना निश्चितपणे ‘नक्की नक्की’ म्हणून सांगितले होते. पण कोथिंबीर तर संपली होती. संध्याकाळच्या बाजारातून ती आणावी असा विचार करूनच दुपारच्या झोपेच्या स्वाधीन झाले होते.
बाजार सुरू होऊन बराच वेळ झाला होता. लवकरात लवकर चांगली कोथिंबीरची जुडी मिळावी म्हणून पटकन आवरती झाले. बाजाराची पिशवी घेऊन पायऱ्या उतरायला लागले. गुरुवारच्या या बाजारात तशी बऱ्यापैकी गर्दी असते. शिवाय भाज्या देखील ताज्या मिळतात. म्हणून हा बाजार सहसा मी कधी चुकवत नाही. एक शेतकरी बाई दर आठवड्याला कोथिंबिरीच्या ताज्या जुड्या घेऊन येत असते. आजही ती आली असावी, असा कयास मी बांधला. तिची नेहमीची जागा ठरलेली होती. बाजाराच्या दिशेने चालू लागल्यावर मी त्याच दिशेने टक लावून पाहत होते. जवळ पोहोचले तेव्हा ती बाई अजूनही तिथे भाज्या विकताना दिसली. त्यामुळे जीव भांड्यात पडला. झपझप पावले टाकत तिच्यापर्यंत आले. एव्हाना बाजारात अन्यत्र बऱ्यापैकी गर्दी झालेली होती. आणि सगळीकडे नुसता गोंगाट चालू झालेला होता. भाजीवालीजवळ पोहोचले तेव्हा तिच्यासमोरील कोथिंबिरीच्या सर्व जुड्या संपलेल्या दिसल्या. त्यामुळे निराशेची एक लकीर माझ्या चेहऱ्यावर नकळतपणे उमटली असावी. भाजीवालीच्या समोर हातात कोथिंबीरची जुडी घेतलेली एक वृद्ध आजी उभी असलेली दिसली. नऊवारी साडी, डोक्यावर ठळक-कुंकू, सावळ्यापेक्षा अधिक गडद रंग आणि उभा व केविलवाना चेहरा अशा अवतारात ती भाजीवालीशी बोलत होती.
“बारा रुपयांना द्या की हो ताई….. शेवटचीच जुडी तर आहे.”,ती गयावया करत भाजीवालीशी हुज्जत घालत होती.
“अहो आजी…. सगळ्याच जुड्या मघापासून वीस रुपयांना विकलेल्या आहेत. त्याच्यापेक्षा एक रुपयादेखील कमी होणार नाही”, भाजीवाली आपल्या बोलण्याची आणि किमतीशी ठाम होती.
“जाऊ द्या अर्धी जुडी तर द्या.”
“नाही ओ आज्जी, पूर्ण घ्यायची तर घ्या नाहीतर राहू द्या इथेच.”
भाजीवालीच्या या बोलण्याने ती काय समजायचे ते समजून गेली. बारा रुपयांचीच नाणी तिच्याकडे शिल्लक होती. त्यात तिला कोथिंबिरीची ती जुडी घ्यायचीच होती. पण भाजीवाली काय सोडायला तयार नव्हती. मी त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. त्यांचं संभाषण पूर्ण होण्याची वाट पाहत होते. कदाचित त्याचा निकाल सकारात्मकदृष्ट्या माझ्या बाजूने लागेल की काय, अशी आशा मला लागलेली होती. कोथिंबीरीची ती शेवटची जुडी अजूनही त्या आजीच्याच हातामध्ये होती.
“घ्यायची नसेल तर खाली ठेवा…”, भाजीवालीने आजींना सांगितले. एवढी हुज्जत घालून देखील तिचा नाईलाज होता. बऱ्याच निराशेने तिने ती जुडी भाजीवाली समोर ठेवून दिली. आणि तशीच उभी राहिली. तिने जुडी खाली ठेवता क्षणीच मी ती उचलून घेतली आणि विचारले,
“कशी दिली?”
“वीस रुपये”, भाजीवालीचे तात्काळ उत्तर आले.
अगदी दोन-तीन तासांपूर्वीच शेतातून काढलेली ती ताजी जुडी होती. तिच्यासाठी २० रुपये देणे म्हणजे माझ्या करता काहीच नव्हते. मी तात्काळ वीस रुपये काढले आणि भाजीवालीला देऊन टाकले. जुडी घेतली आणि पिशवीत ठेवली. ही सर्व करत असताना ती आजी तिथेच उभी होती. तिची नजर अजूनही कोथिंबीरच्या त्या जुडीवरच होती. एका केविलवाण्या नजरेने ती माझ्याकडे देखील बघताना मला वाटले.
कोथिंबीरची ताजी जुडी मिळाल्याचे समाधान मला होतेच, पण त्याच जुडीसाठी भाजीवालीशी हुज्जत घालणाऱ्या आज्जीशी मला कीव देखील वाटली. मी परतीचा रस्ता धरला. चालत असताना ती आजी माझ्याकडेच मागून बघत आहे की काय असे अचानक वाटून गेले. थोडं पुढं आल्यावर सहजच म्हणून मागे वळून पाहिले. आजीने भाजीवालीचा नाद सोडला होता आणि ती माझ्यात दिशेने हळूहळू पुढे येताना दिसली.
‘विचित्रच आहे…’, असं मनाशीच बोलून मी घराच्या दिशेने चालू लागले.
पाच मिनिटांनी इमारतीच्या गेटमधून आत मध्ये आले. तेव्हा देखील ती आजी माझ्याच मागे मागे येताना दिसली. मी आत आल्यावर सुरक्षारक्षकाने गेट लावून घेतले. मी लिफ्टपाशी पोहोचले तोवर ती गेटपाशी आलेली नव्हती. लिफ्ट आली आणि मी सातव्या मजलाचे बटन दाबले. घरामध्ये पोहोचेपर्यंत जवळपास सात वाजायला आले होते. किल्लीने दार उघडले आणि आतमध्ये आले तेव्हा कुठे हायसे वाटले.
बेडरूमच्या खिडकीतून इमारतीचे मुख्य गेट दिसते. मगाशी माझा पाठलाग करणारी ती आजी आता कुठे आहे, याची मला देखील उत्सुकता लागली होती. पटकन बेडरूम मध्ये गेले आणि खिडकीतून मेनगेट कडे कटाक्ष टाकला. ती आजी आमच्या सुरक्षारक्षकाची काहीतरी हुज्जत घालताना दिसत होती. त्याच्या हातवाऱ्यांवरून तो तिला इथून निघून जायला सांगत होता. पण मघाशी पाहिलेला तिचा तो केविलवाना चेहरा अजूनही तसाच दिसून आला. एका कोथिंबीरीच्या जुडीसाठी ती माझ्या मागोमाग का आली असावी? खरोखर गहन प्रश्न होता. तिच्याशी बोलायला हवे होते का? याचे उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला. पण नंतर सोडून दिले. असतात अशी विक्षिप्त माणसे या जगात, म्हणून मीच माझी समजूत घातली.
बरोबर सातच्या सुमारास घराची बेल वाजली. आमची स्वयंपाकिन सुमन दारात उभी होती. तिला सकाळीच आज संध्याकाळी कोथिंबीरची वडी करायची आहे, असे बजावून सांगितले होते. त्यामुळे आल्याआल्याच तिने विचारले,
“आणली का कोथिंबीर मावशी?”
“हो बाई…. मोठ्या मुश्किलीने मिळाली आज!”, मी आनंदाने उतरले.
“कुठं आहे?”, तिने विचारले.
“ती बघ…. किचनच्या ओट्यावर पिशवी ठेवली आहे.”
सुमनला किचनच्या ओट्यावर भाजीची ती पांढरी पिशवी दिसली. तिने पिशवी उघडून पाहिली आणि म्हणाली,
“मावशी…. यात तर काहीच नाहीये!”.
“अगं नीट बघ… आपल्या नेहमीच्या पिशवीमध्ये आहे.”
“तीच तर पिशवी पाहते आहे… काहीच नाहीये त्याच्यात!”
मला आश्चर्याचा धक्का बसला. मी किचनमध्ये आले आणि पिशवी हातात घेतली. खरोखर त्या पिशवीमध्ये काहीच नव्हते. अगदी कोणती भाजी ठेवली होती की नाही, याचे निशाण देखील नव्हते.
ती रिकामी पिशवी पाहून काळजात धस्स झाले. कदाचित एखादा ठोका चुकला असावा.
मी झपाझप पावले टाकत बेडरूमच्या खिडकीपाशी पोहोचले. खिडकी उघडून पुन्हा मेन गेटकडे बघितले. ती आजी तिथे नव्हती. सुरक्षा रक्षक शांतपणे आपल्या खुर्चीवर बसला होता… मोबाईल बघत.

- बाबुराव रामजी





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कोथिंबीर

दुपारची वामकुक्षी त्यादिवशी फारच काळ लांबली. झोपेतून जाग आली तेव्हा घड्याळामध्ये पाहिले, संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. घड्याळातल्या त्य...