शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

पुस्तक चाळणारा मी!

ट्रेन यायला अजून बराच अवकाश होता. किंबहुना नेहमीच्या अनुभवाप्रमाणे ही ट्रेन दर दिवशी अर्ध्या तासाने का होईना उशिरा येत असते. मोबाईल ॲप्लिकेशन उघडून त्यामध्ये ट्रेनचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यातच ती चाळीस मिनिटे उशिरा येणार असल्याचे दिसत होते. मग स्टेशनवर येरझाऱ्या घालण्यापेक्षा शांतपणे शेजारी ठेवलेल्या बाकड्यावर जाऊन बसलो. सात-आठ जण तरी बसतील असा लांब बाकडा तिथे ठेवलेला होता. माझ्या आधी तीन-चार लोक तिथे सामान खाली ठेवून बसले होते. कदाचित ते सुद्धा याच ट्रेनची वाट बघत असावेत. मी देखील सामान खाली ठेवले आणि बाकड्यावर ठाण मांडून बसलो. 

माझ्या शेजारी एक चार-पाच वर्षांची मुलगी ट्रेन प्लॅटफॉर्मवरील ती गर्दी न्याहाळत बसलेली होती. तिच्या पलीकडचे चार-पाच जण मान खाली करून मोबाईलमध्ये तोंड घालून बसलेले दिसले. अर्ध्या तासामध्ये किमान तीन-चार तरी कथा वाचून होतील, असा विचार करून मी बॅगेतून एक कथासंग्रह काढला आणि वाचायला लागलो. दोन मिनिटे अशीच गेली असतील. शेजारची मुलगी थोडा वेळ माझ्याकडे टक लावून बघत असल्यासारखी वाटली. मी तिच्याकडे सहज ओझरती नजर टाकली. त्यावर तिने स्मितहास्य केले व विचारले, 

'काका तुमची कोणती परीक्षा आहे का?' 

मला तिच्या या प्रश्नाची हसू आले आणि मी म्हणालो, 

'नाही ग...  पण असं का विचारतेस?' 

यावर ती उत्तरली, 'मग तुम्ही पुस्तक का वाचत बसला आहात?' 

तिचा तो प्रश्न खरोखर विचार करण्याजोगा होता. आज-काल वाचण्यापेक्षा मोबाईल मध्ये डोकं घालून बोटं फिरवत बसणं, हा आज रिकाम्या वेळेत करण्यात येणारा सर्वात मोठा उद्योग आहे. त्या मुलीच्या शेजारचे सर्वजण मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसलेले होते. मी मात्र त्या स्थितीत नव्हतो. शिवाय आजकाल परीक्षा असल्याशिवाय कोणी पुस्तक उघडत नाही, हे तिचं निरीक्षण देखील योग्यच होतं. वाचन संस्कृती कोणत्या दिशेने चालली आहे? या प्रश्नाचे उत्तर मात्र मी मनातल्या मनात मलाच दिले. पण मला त्या मुलीला उत्तर देणे भाग होते. 

मी म्हणालो, 'बाळा, हे पुस्तकच माझा मोबाईल आहे आणि मी त्याला मोबाईल समजूनच चाळत असतो. यातूनच मला नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळतात.' यावर तिने फक्त स्मितहास्य केले.  


 

कोथिंबीर

दुपारची वामकुक्षी त्यादिवशी फारच काळ लांबली. झोपेतून जाग आली तेव्हा घड्याळामध्ये पाहिले, संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. घड्याळातल्या त्य...