मागचे चार-पाच वर्ष अजय साताऱ्याहून पुण्याला येण्याचा प्रयत्न करत होता. अर्थात त्याने बऱ्याच ठिकाणी कंपन्यांमध्ये अर्ज देखील केले होते. पण कुठूनच सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. अखेरीस त्याचे नशीब फळफळले. पिंपरी-चिंचवड मधल्या एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये त्याला मुलाखतीसाठी बोलवण्यात आले. आणि मुलाखत झाल्यानंतर दोनच दिवसांमध्ये नेमणुकीचा ईमेल देखील आला. त्या दिवशी तो खूप आनंदात होता. अर्थात त्याने ही आनंदाची गोष्ट सांगण्यासाठी मलाच सगळ्यात पहिल्यांदा फोन केला होता.
एक महिन्याचा नोटीस पिरियड संपल्यानंतर आपल्या बायको आणि मुलासह त्याने पुण्याला शिफ्ट होण्याचे ठरवले. काही नातेवाईकांच्या मदतीने त्याने इथेच शहरांमध्ये एक भाड्याने फ्लॅट देखील बघितला. तो पुण्यात येण्याची आम्ही चार-पाच वर्षांपासून प्रतीक्षा करत होतो. आणि अखेरीस तो आलाच. सामानाची साताऱ्याहून येणारी गाडी संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान येथे पोहोचली. घरातील सर्व सामान लावण्यासाठी मी देखील त्याच्या घरी गाडी येण्याच्या अगोदरच पोहोचलो होतो. सामानाच्या ट्रकमधून आम्ही सर्व सामान उतरवून घेतले. आणि घरामध्ये ठिकठिकाणी व्यवस्थित लावून दिले. हे सर्व होईस्तोवर रात्रीचे साडेअकरा वाजून गेले होते. मलाही झोपेची गुंगी यायला लागली होती. शिवाय सकाळी लवकर देखील उठायचे होते. म्हणून ठरवलेली कार्यपूर्ती झाल्यानंतर मी अजयचा निरोप घेऊन आपल्या स्कुटीने परतीच्या मार्गाला लागलो.
मला अजूनही आठवते स्कुटीला किक मारण्याच्या आधी मी घड्याळात पाहिले होते. रात्रीचे बरोबर अकरा वाजून ४६ मिनिट झाले होते. अजय मला सोडवायला खाली आला होता. मी त्याला बाय केले आणि आपल्या घराच्या दिशेने निघालो. दहा ते बारा किलोमीटरवरच माझे घर होते. म्हणजे यावेळेस जाण्यासाठी १५ ते २० मिनिटे पुरेशी होती. या गणिताने मी बारा-सव्वाबाराच्या सुमारास घरी पोहोचेल, असा अंदाज देखील मला आला.
बिल्डिंगमधून बाहेर पडलो, मुख्य रस्त्याला लागलो आणि गाडी ५० च्या वेगाने रस्त्यांवरून धावायला लागली. संध्याकाळच्या सुमारास रहदारीने तुडुंब भरलेले रस्ते यावेळेस पूर्णपणे सामसूम झालेले दिसले. अधेमधे रस्त्यावरची टवाळी करणारी मुले आणि त्यांचा गोंगाट दिसायचा. बाकी दुकाने तर बंद झाली होती. या रस्त्यावरून मी यापूर्वी बऱ्याचदा प्रवास केला होता. परंतु अशी बंद झालेली दुकाने त्या दिवशी पहिल्यांदाच पाहत होतो. संध्याकाळी या रस्त्याने आलो तेव्हा गर्दीतून वाट काढत काढत अजयच्या घरापर्यंत पोहोचलो होतो. परंतु जाताना रात्रीची ती स्मशानशांतता अनुभवत मार्गक्रमण होतो करत होतो. कोकणे चौकात पोहोचलो आणि तिथून उजव्या बाजूला वळण घेतले व गाडी सुसाट वेगाने पिंपळे गुरवच्या दिशेने धावायला लागली. रस्त्यावरील पथदीप रस्ता दाखवायला सक्षम होते. अधमधे एखादा पथदीप लुकलुकताना दिसायचा. बाकी त्याखाली असणारे रस्ते पूर्णतः निर्मनुष्य होते. आपले शहर रात्री किती शांतपणे झोपते याचा अनुभव त्या दिवशी मी पहिल्यांदाच घेतला. कधीकधी या शांततेची आणि निर्मनुष्यतेची देखील भीती वाटायला लागते. मला ती थोडीशी वाटत देखील होती, काहीशी जाणवत होती. परंतु त्याचा फार बाऊ केला नाही. रस्त्यावरची डावीकडची लेन पकडून मी सुसाट वेगाने चाललो होतो.
ठराविक अंतरावर कुत्र्यांच्या छोट्या छोट्या झुंडी दिसायच्या. त्यांचे आवाज त्यादिवशी काहीशी निराळेच भासत होते. जणूकाही भुंकण्याऐवजी ते मानवी आवाजात माझ्याशी बोलत असावेत, असं वाटत होतं. रस्त्यावरील कुत्र्यांची संख्या तशी बऱ्यापैकी होती. शहरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात कुत्री आहेत, हे त्यादिवशी पहिल्यांदाच जाणवलं. यातील कोणीही माझ्या गाडीच्या मागे लागले नाही किंवा माझ्यावर भुंकले देखील नाही. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक मला तेव्हा जाणवत होती. एका चौकाच्या अलीकडे काही कुत्री पुढच्या दोन पायांवर बसून आपली मान त्या पायांवर ठेवून मला कुर्निसात करत असल्याची जाणवली. हा भास असावा का? हाही प्रश्न मनाला चाटून गेला. काहीसं वेगळं दृश्य त्या दिवशी दिसल्याने मनात स्मित हास्य उमटलं. पण ते स्मितहास्य होतं की भयहास्य हे मला आजही निश्चित आठवत नाही. जसं जसं पुढे गेत गेलो तसतसं कुत्र्यांची संख्या वाढतच होती. आणि सर्व माझ्यात दिशेने आशाळभूतपणे पाहत होते. त्या रस्त्यावर चाललेली माझी ती एकमेव गाडी होती म्हणूनच असं होत असावं… हे मीच मला समजावलं. मग कुत्र्यांना या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांची सवय नव्हती का? हाही प्रश्न पडून गेला. एवढी सगळी कुत्री माझ्यावर चालून आली तर मला काय करता येईल? या प्रश्नाने मनात धस्स झाले. गाडीचा वेग हळूहळू कमी होत गेला. मी मनात भीती घेऊन चाललो होतो का?..... कदाचित होय…. ही भीती कुत्र्यांची नव्हती…. मग कशाची होती? मला प्रश्नाचे उत्तर सापडले नाही.
पुढच्या चौकातून उजव्या बाजूला वळायचे होते. त्याच्या अलीकडेच रस्त्याच्या डाव्या बाजूला कुत्र्यांची भली मोठी झुंड पुढचे दोनही पाय खाली करून मला नमस्कार करत होते. आजूबाजूला एकही मनुष्य दिसला नाही. सर्व कुत्र्यांच्या नजरा माझ्या दिशेने लागल्या होत्या. मी नकळतपणे त्यांच्या नजरेमुळे संमोहित झालो होतो. एव्हाना गाडीचा वेग शून्य पर्यंत पोहोचला होता. आणि अखेरीस मी माझी स्कुटी थांबवली. तिला एका स्टॅन्डवर लावली. आणि कुत्र्यांच्या समोर जाऊन उभा राहिलो. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल कमालीचा आदर आणि उत्सुकता देखील होती. काही कुत्र्यांच्या शेपट्या लडीवाळपणे हलत होत्या तर काही आपल्या तोंडातील जीभ हलवून त्यातून लाळ टाकत होते. त्यांना माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. किंबहुना काहीतरी सांगायचं होतं. पण त्यांना माझी आणि मला त्यांची भाषा समजणार होती का?.... तर नाहीच. परंतु मनुष्याच्या चेहरा बरच काही सांगून जातो. त्यातून माझा चेहरा त्यांनी ओळखला असावा, असेही मला वाटलं. कुत्र्यांनी संमोहित केलेला मी हळूहळू त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो. निश्चित किती कुत्री होती हे सांगता येणार नाही. किमान २० ते २५ तरी असतील.
मी त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांच्यातील म्होरक्या रस्त्याच्या कडेला जाऊन उतारावरून खाली चालू लागला. त्याच्यामागे बाकीची कुत्री देखील डौलाने चालू लागली. मी देखील त्यांचाच कित्ता गिरवला. थोड्या अंतरावर शहरातली काँक्रीटची जंगलं हळूहळू कमी झालेली दिसली. शहरांमध्ये आज समाविष्ट झालेली ही शहरी गावं एकेकाळी ग्रामीण वस्त्या होत्या. येथे देखील बागायती-जिरायती शेती केली जात होती. पण त्यावर आता काँक्रीटची जंगलं उभी राहिली. इमारती बांधल्या गेल्या. आणि त्या पाऊलखुणा नष्ट होत गेल्या. तरी देखील अजूनही या भागात बरीचशी शेती शिल्लक असलेली दिसली. मधला पूर्ण पट्टा शेतातील विविध पिकांनी भरलेला वाटत होता. अर्थात अंधारातल्या त्या आकृत्यांवरून मी हा अनुमान लावला. बऱ्याच दूरवर जिथे शेती संपते तिथून पुढे पुन्हा काँक्रीटची जंगलं दिसत होती. त्यातील विद्युतदिवे टीमटीमताना दिसले. मधल्या भागात नक्की काय पेरलेले होते, याचा अंदाज मात्र आला नाही. त्या भल्या मोठ्या शेतीच्या एका कडेकडेने कुत्र्यांची ती भली मोठी रांग चालू लागली. तेव्हा ना मी त्यांच्या मधोमध आलो होतो. पुढच्या बाजूला दहा ते पंधरा आणि मागच्या बाजूला तेवढीच कुत्री घेऊन आमची ही वारी शेतातल्या त्या काळोखामध्ये निघालेली होती. थोड्याच अंतरावर शहराचे शहर पण नाहीसे झाल्याचे वाटले. दोन्ही बाजूंना शेतीच शेती. मध्ये एखादं झोपडं अर्थात बंद पडलेलं दिसायचं. मी नक्की कोणत्या शक्तीच्या जोरावर त्या कुत्र्यांमधून चाललो होतो, हे मला आजही सांगता येणार नाही. परंतु अज्ञाताच्या शोधार्थ असलेला तो प्रवास असावा असं त्याक्षणी मला आतमधून जाणवत होतं. अगदी थोड्याच वेळात शेताच्या मधोमध असणाऱ्या एका दुमजली खोपट्यापाशी कुत्र्यांची ती वारी आणि मधोमध चालणारा मी येऊन पोहोचलो. त्या खोपट्याच्या खालच्या भागात चहूबाजूंनी पत्रे लावलेले होते. आणि एका कोपऱ्यातून वर जाण्यासाठी अगदीच मोडकळीस आलेल्या जिना होता. वरचा भाग देखील दोन्ही बाजूंनी पत्र्याने तर पुढे आणि मागे विविध प्रकारच्या ठिगळांनी सजवलेला दिसून आला. या ठिगळांच्या मधोमध एक पडीक दरवाजा होता. त्या दुमजली खोपट्यापाशी आल्यानंतर माझ्या पुढे चालणारी कुत्री थांबून गेली. मी हळूहळू पुढे आलो माझ्यापुढे केवळ कुत्र्यांचा म्होरक्या उभा होता. मी त्याच्याजवळ पोहोचल्यावर त्याने लगेचच जिना चढायला सुरुवात केली. जवळपास दहा पायऱ्या चढून आम्ही वरच्या मजल्यावर पोहोचलो. वरील दरवाजा बंद होता. त्याला दोन कड्या लावलेल्या होत्या. मी म्होरक्याकडे बघितले. त्याच्या डोळ्यातील आर्तता मला काहीतरी सांगत होती. अर्थात या प्रश्नाचे उत्तर मला देखील समजले. मी दरवाज्याच्या ज्या दिशेने पाहिले आणि मधली कडी उघडली. मग वरची कडी देखील काढली आणि दरवाजा आतमध्ये ढकलला. त्याच्या बिजागरांचा एक विचित्र आवाज त्या शांततेमध्ये भयावहता आणून गेला. गंजलेल्या बिजागरांचा दरवाजा उघडल्यावर तो आतल्या बाजूने झुकलेला दिसला. त्याचा पुढे मागे होण्याचा आवाज अजूनही हळूहळू तसाच चालू होता.
दरवाजा उघडल्यानंतर समोरच्या खिडकीतून अतिशय मंदचा प्रकाश माझ्यावर पडला. डाव्या बाजूला एक तीन कप्पे असणारी मांडणी होती. त्या लाकडी मांडणीचे पाय कुजल्यासारखे दिसत होते. अर्थात रात्रीच्या त्या मंद प्रकाशात मला इतकच दिसून आलं. सर्वात वरच्या भागात पोत्याखाली काहीतरी लपवलेलं होतं. कुत्र्यांचा तो म्होरक्या माझ्या शेजारीच उभा होता. त्याची नजर मांडणीच्या सर्वात वरच्या भागात असणाऱ्या त्या पोत्यावर होती. मी त्याच्याकडे पाहिले. त्याने आपली जीभ बाहेर काढलेली होती. त्यातून लाळ देखील टपकताना दिसली. मी पुन्हा मांडणीकडे पाहिले व त्यावरील पोते खाली खेचले. लगोलग मांडणी खाली पडली आणि त्यावर असणार ते देखील खाली पडलं. मोठा आवाज झाला. अर्थात तो आवाज आजूबाजूला कोणीही ऐकलेला नसेल. कारण तिथल्या परिसरात कोणी नव्हतंच. नक्की काय पडलं, हे पाहण्यासाठी मी दोन पावले पुढे टाकली. तो एक मृतदेह होता…. कुजलेला परंतु चेहरा मात्र अजूनही व्यवस्थित दिसत होता. असं दृश्य मी याहीपूर्वी कधीच माझ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं. कपाळावर घामाचे बिंदू तयार व्हायला लागले होते. मी डोळे विस्फारून ते दृश्य पाहत होतो. कुत्र्यांच्या म्होरक्याची नजर त्या मृतदेहाच्या दिशेने रोखलेली दिसली. आवाज झाल्याझाल्या खाली वाट पाहणारी सर्व कुत्री वेगाने पायऱ्या चढून त्या खोलीच्या आत येऊन ठेपली. मी मात्र दोन पावले मागे करत करत खोलीच्या बाहेर आलो. सर्वच कुत्र्यांची नजर त्या मृतदेहाच्या दिशेने रोखलेली होती. यानंतर अगदी क्षणातच सर्व त्यावर तुटून पडले. मघाशी कपाळावर जमा झालेले घामबिंदू आता शरीरावर वेगाने पडू लागले होते. भयाची शिरसरी अगदी पायापासून मेंदूपर्यंत वेगाने प्रवास करू लागली. मी कसेबसे स्वतःला सावरले. झपाझप पावले टाकत पायऱ्यांनी खाली उतरलो. तोंडातून शब्दही फुटत नव्हता. आल्या पायवाटेने माघारी चालू लागलो. ही तीच वाट होती का? हे मला माहित नाही. परंतु पळत पळत पुन्हा काँक्रीटच्या जंगलापाशी आलो, पदपथ आणि पथदीपावरील दिवे पुन्हा स्पष्ट दिसायला लागले. तेव्हा पुन्हा माणसात आल्याची जाणीव झाली.. कुत्र्यांच्या त्या विश्वापासून काहीच लांब आलो होतो. माझी गाडी अजूनही तिथेच होती. अगदीच ५० फुटांच्या अंतराव असताना पुढे काय झाले, हे मला माहित नाही.
सकाळी जाग आली तेव्हा मी हॉलमधल्या सोफ्यावर झोपलेलो होतो. बायको शेजारी खुर्चीवर बसलेली होती. कदाचित ती मी उठण्याची वाट पाहत असावी. तिच्या चेहऱ्यावर देखील प्रश्नचिन्ह होते.
“रात्री किती वाजता आलात?”, तिने विचारले.
“माहित नाही”, केवळ एवढेच बोलू शकलो.
“चावी तर माझ्याकडे होती मग तुम्ही दरवाजा कसा उघडला?”, तिच्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न केला. पण मला ते अजूनही सापडलेले नाही.
- बाबुराव रामजी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा