शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

अशाच एका सिग्नलवर

सकाळचे ११ वाजून गेले होते. रावेतहून आकुर्डीकडे आपल्या कारने तसा निवांतच चाललो होतो. रस्त्यावरची रहदारी नेहमीसारखी दिसून येत होती. या रहदारीमध्ये दिसणारी वाहन चालकांची गडबड आणि वेंधळेपणा हा नेहमीचाच. पण मी त्याचा भाग नव्हतो, याचे काहीसे समाधान मला वाटत होते. 

एका मुख्य रस्त्यावर लाल सिग्नल लागला म्हणून गाडी थांबवली. सिग्नल चालू असून देखील रस्त्याच्या चारही बाजूंनी वाहन चालकांची ये-जा सुरूच होती. संध्याकाळी जशी असते तशी रहदारी नसली तरी बऱ्यापैकी वाहने रस्त्यावर फिरत होती. परंतु त्यातील कोणीही सिग्नल पाळण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. मी मात्र झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे असणाऱ्या रेषेला खेटून माझी गाडी उभी केली होती. इतर तीनही बाजूंनी गाड्या सिग्नलकडे न पाहता आपापल्या रस्त्याने पुढे चालत होत्या. आजवर काहीही झाले तरी मी सिग्नल तोडला नव्हता. एका आदर्श नागरिकाप्रमाणे सिग्नलवर मी एकटा जरी असलो तरी तो पाळत असेच. आणि त्याचा मला अभिमान देखील होता. सिग्नल न पाळणारे किती मूर्ख, याचा अंदाज मी इतर वाहनचालकांकडे बघून घेत होतो. दोन वाहने त्या चौकामध्ये एकाच वेळी समोरासमोर यायची. दोनही वाहन चालकांची नजरा नजर व्हायची. कदाचित मनातल्या मनात शिव्या देखील दिल्या जात होत्या. मग एक जण माघार घेऊन निघून जायचा. त्यानंतर दुसरा देखील त्याचा रस्ता सोडत नव्हता. एकंदरीत गाढवांचा गोंधळ त्या चौकामध्ये दिसून आला. 

आपल्या देशातील लोक किती बेशिस्त आहेत याची प्रचिती त्या सिग्नलवर मला येत होती. याच गोष्टीमुळे आपली लोकं मागे राहतात. आपण फक्त बाहेरच्या देशातील लोकांना चांगले म्हणतो, त्यांची स्तुती करतो. परंतु त्यांचे चांगले गुण आत्मसात करत नाही. हा आपल्या देशातील लोकांचा दुर्गुण आहे, असे म्हणावे लागेल. माझ्या या विचारचक्रामध्ये सिग्नल वरील इकडून तिकडे बेशिस्तपणे फिरणाऱ्या वाहनचालकांच्या हॉर्नचा कर्कश्य आवाज देखील मिसळला जात होता. ते आवाज हा भयंकर रहदारीचा रस्ता आहे, याची आठवण करून देत होते. मी मात्र त्या मूर्ख वाहन चालकांच्या हालचालींकडे शहाणपणाने पाहत होतो. वाहन चालकांव्यतिरिक्त रस्त्याने चालणारे पादचारी तसेच हातगाडीवाले व अन्य विक्रेते देखील कुठूनही रस्ता क्रॉस करत होते. त्यांची देखील अडचण इतरांना होत होती. एकंदरीत काय रस्त्यावरची बेशिस्ती याची देही याची डोळा मला पाहायला मिळत होती. 

मी सिग्नलला थांबलेला बघून मागील गाड्या देखील थांबत होत्या. पण इतर रस्त्यावरील वाहने बघून काही सेकंदातच त्या देखील पुढे जात होत्या. म्हणजे काय तर मेंढ्यांचा कारभार त्या दिवशी मला रस्त्यावर दिसून आला. माझी रस्त्यावर थांबलेली गाडी बघून कडेला टपरीवजा फुलाचे दुकान चालवणारा एक फुलवाला माझ्याकडे बघत असलेला मला दिसला. कदाचित त्याला त्याच्या फुलांचा हार मला विकावयाचा असावा. तीन-चार वेळा त्यांनी माझ्याकडे बघितले व तो माझ्या दिशेने चालू लागला. आता हा मनुष्य त्याच्या दुकानातील फुलांची हार मला विकत घ्यायला लावणार की काय? या प्रश्नाने माझ्या मनात घर केले. तो हळूहळू माझ्याच गाडीच्या दिशेने चालत येत होता. अन्य बेशिस्त वाहनचालकांप्रमाणे तो देखील मला याच प्रवर्गातील आहे की काय, असे वाटून गेले. तो जवळ आला तरी मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. माझे लक्ष समोर असताना देखील त्याने मला बोलावले व म्हणाला, 

"साहेब गाडी जाऊ द्या पुढे. हा सिग्नल सकाळपासून लालच आहे! तो सुटणार नाही!" 

त्याच्या या एका वाक्याने माझे सर्व विचारचक्र १८० कोनामध्ये बदलून गेले आणि मनोमन मलाच माझा 'पोपट' झाल्याचे जाणवले! मग काय... पहिला गिअर टाकला आणि मी देखील महानगरपालिकेला दोन शिव्या देऊन त्या बेशिस्त रहदारीचा हिस्सा होऊन गेलो! 



बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

गॅस चेंबर - रत्नाकर मतकरी

 गुढकथा व रहस्यकथा लेखक रत्नाकर मतकरी यांचा वेगळ्या धाटणीतला हा एक कथासंग्रह आहे. भयकथा या कथा प्रकाराला सामाजिक भयाच्या माध्यमातून प्रदर्शित करणाऱ्या कथा या कथासंग्रहामध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. मतकरींनी तो अगदीच अलीकडच्या काळामध्ये लिहिलेला आहे. याच कारणास्तव आजच्या समाजरचनेमध्ये असलेल्या गुंतागुंती आणि भयाच्या भावना यातील कथांमधून प्रतीत होतात. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या चुकीच्या घटना प्रत्येक कथेतील नायक हेरत असतो. आणि आपल्या सदसदविवेक बुद्धीचा वापर करून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो. पण तो त्यात यशस्वी होत नाही. त्याला खलनायक पुढील कोणतीही कृती करण्याच्या आधी संपवून टाकतात. अर्थात खरा रहस्यभेद होतच नाही. यातून तयार होते ती सामाजिक भयाची भावना. मतकरींच्या या कथासंग्रहातील कोणताच नायक 'जाऊ दे, आपल्याला काय करायचं?' असा प्रश्न विचारत नाही. तो अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला यश प्राप्ती होत नाही. म्हणजेच एका अर्थाने आजच्या कालखंडातील एकंदरीत भयाची परिस्थिती मतकरींनी या कथासंग्रहातील विविध कथांमधून मांडलेली आहे. विशेष म्हणजे गणेश मतकरी यांनी अतिशय सुंदर व सुटसुटीत प्रस्तावना लिहिली असल्याने कथासंग्रहाचा एकंदरीत साचा आपल्याला समजून येतो.



शनिवार, २९ ऑक्टोबर, २०२२

एका मेलेल्या भाषेची गोष्ट!

(इसवी सन २१४८ मधली ही गोष्ट आहे. आज ही गोष्ट मी मराठीमध्ये लिहीत असलो तरी यात असलेले संवाद भविष्यकालीन इंग्रजी भाषेतील आहेत. ते आजच्या वाचकांना समजावेत म्हणून मराठीमध्ये भाषांतरित केलेले आहेत!)


बऱ्याच दिवसांपासून ल्युसी आपल्या आजोबांच्या अर्थात टॉमच्या मागे लागली होती. तिने आपलं मूळ गाव कधीच पाहिलं नव्हतं. किंबहुना टॉम देखील आपल्या मूळ गावी अनेक वर्षांतून कधीतरी फेरफटका मारायचे. शहरातल्या गजबजलेल्या वातावरणाची सवय झाल्यामुळे त्यांना देखील गावाची फारशी ओढ राहिलेली नव्हती. परंतु ल्युसी मात्र आपल्या गावाला जायला फार उत्सुक होती आणि अखेरीस तिने आपल्या ग्रँडपाला घेऊन गावी जाण्याची योजना आखलीच.
आपल्या हायपर सोनिक कारने त्यांचा केवळ वीस मिनिटांचा प्रवास होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्यांची कार गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाशेजारी उतरली. अशा कार ह्या परिसरामध्ये नेहमीच येत असत. गाव ही संकल्पना जवळपास नष्ट झाल्यात जमा होती. आजूबाजूला रोबोटिक शेती असली तरी लोकांचे भले मोठे अत्याधुनिक बंगले दिसून येत होते. पडीक जमीन कुठेच उरलेली नव्हती. शेतकरी ही संकल्पना देखील राहिली नव्हती. शेतांमध्ये काम करण्यासाठी पूर्णतया रोबोट राबताना दिसत होते.
गावातील सर्व बंगल्यांच्या मागील बाजूस एक छोटेखानी जीर्ण झालेला पडीक बंगला होता. याच ठिकाणी टॉमचा जन्म झाला होता. पण मागच्या कित्येक वर्षांमध्ये त्यांनी त्याच्या घराकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. घराची चावी देखील त्याच्याकडे नव्हती. त्यामुळे कुलूप तोडूनच घरामध्ये जावे लागणार होते. दरवाजासमोर पोहोचल्यानंतर जवळच पडलेल्या एका दगडाने त्याने कुलूप तोडून काढले.
घरामध्ये सर्वत्र कोळ्यांची निर्विवाद सत्ता दिसून आली. सर्वत्र त्यांनी जाळी टाकलेली होती. आत आल्यावर ल्युसी त्या घराकडे उत्सुकतेने बघत होती. कोपरान कोपरा न्याहाळत होती. मागच्या अनेक दशकांमध्ये नामशेष झालेल्या वस्तू तिला तिथे नजरेस पडल्या. वरच्या माळ्यावरील एका कोपऱ्यामध्ये एक लोखंडी पेटी देखील त्यांना दिसून आली. या पेटीमध्ये काय असावे? याची उत्सुकता ल्युसीला होतीच. तिला जुन्या काळातील चावीवाले कुलूप लावलेले होते. ते अतिशय जीर्ण झाल्यामुळे टॉमने ते दोन-तीन ठोश्यातच उघडले. तिच्यावरील धूळ खाली पडली व आतमध्ये जीर्ण झालेल्या अनेक वस्तू दिसून आल्या. यात वीस ते पंचवीस छापील पुस्तके देखील होती.


ल्युसीने त्यातील पहिले पुस्तक हातात घेतले. त्यावरील धूळ बाजूला सारली. तिला न उमजणाऱ्या एका लिपीतील ते छापील पुस्तक होते. तिने त्याची पाने चाळायला सुरुवात केली. सर्व पुस्तक त्याच अगम्य लिपीमध्ये लिहिलेले तिला दिसले. आतील भाषा न समजल्याने तिने टॉमकडे बघितले व विचारले,
"आजोबा ही कोणती भाषा आहे?"
यावर टॉमने तिच्या हातातून पुस्तक आपल्या हातात घेतले व तो देखील चालू लागला.
"बेबी ही शंभर वर्षांपूर्वी आपल्या परिसरात बोलली जाणारी एक भाषा होती. तिला मराठी असे म्हणत होते."
मग ल्युसीने विचारले, "हे कशाचे पुस्तक आहे?"
यावर टॉम मंदसा हसला आणि म्हणाला, "बाळा मला देखील हे वाचता येणार नाही. माझ्या आजोबांना मात्र ही भाषा ज्ञात होती. आज ही भाषा जाणणारे अतिशय कमी लोक आपल्या देशामध्ये उरलेले आहेत."
त्या भाषेच्या लिपीचा वळणदारपणा ल्युसीला विशेष भावला. काहीतरी सुंदरसं या भाषेमध्ये लिहिलं असावं, असं तिला वाटून गेलं. एक एक पान ती चाळत होती. त्या पानांचा जीर्णपणा पुस्तकाच्या प्राचीनतेचा पुरावा देत होता. टॉम देखील तिच्याकडे कौतुकाने बघत होता.
"ही भाषा आता कोणालाच माहित नाही का?" ल्युसीने विचारले.
यावर टॉमच्या चेहऱ्यावर खंतमिश्रित हसू तिला दिसले.
"नाही बाळा ही भाषा जाणणारे आज केवळ बोटांवर मोजण्याइतके लोक अस्तित्वात आहेत. ते देखील जुनी कागदपत्रे वाचण्यासाठी ही भाषा शिकलेत."
ल्युसीच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव टॉमला देखील समजत होते. ती या भाषेविषयी जाणून घेण्यासाठी अधिक उत्सुक होती. तिने काही विचारण्याआधीच टॉमने सांगायला सुरुवात केली.
"काही दिवसांपूर्वी मी इंटरनेटवर एक लेख वाचला होता. त्यामध्ये आपल्या परिसरात एकेकाळी बोलल्या जाणाऱ्या या भाषेविषयी बरीच माहिती मला समजली. या भाषेमध्ये जसे आपल्या इंग्रजीमध्ये २६ अक्षरे असतात तशी ४८ अक्षरे होती आणि विशेष म्हणजे आपल्या भाषेतील a e i o u यासारख्या पाच स्वरांप्रमाणे १४ स्वर या भाषेमध्ये होते!"
टॉमने दिलेली ही माहिती ऐकताच ल्युसीच्या चेहऱ्यावर आश्चर्यकारक भाव उमटले व तिने लगेच प्रतिप्रश्न केला,
"मग ही इतकी समृद्ध भाषा नष्ट कशी झाली?"
टॉमसाठी हा प्रश्न अपेक्षित होताच. शिवाय त्याने वाचलेल्या लेखांमध्ये देखील ही माहिती सविस्तरपणे दिलेली होती.
"तीनशे वर्षांपूर्वी युरोपातील इंग्लंड नावाच्या देशाचे आपल्या देशावर राज्य होते. त्यांचीच भाषा म्हणजे इंग्रजी होय. जी आज आपण बोलतो आहोत. इंग्रज भारत सोडून गेले तरी त्यांनी आपली भाषा या देशामध्ये अस्तित्वात ठेवली. इंग्लंड बरोबरच अमेरिकेसारखे देश देखील ही भाषा बोलत होते आणि प्रगत देखील होत होते. त्याकाळी इंटरनेटवर प्रामुख्याने इंग्रजी भाषेचे राज्य होतं. म्हणून भारतीय लोकांनी हळूहळू ही भाषा आत्मसात करायचं ठरवलं. इतकं की ते त्यांच्या भाषाही विसरून गेले. भारतीय भाषांमधील शाळा कमी होत गेल्या. प्रत्येक भारतीयाला इंग्रजीमध्ये पारंगत होऊन भरपूर पैसे कमवायचे होते. अमेरिकेत स्थायिक व्हायचं होतं. म्हणून त्यांनी इंग्रजी शाळेबरोबरच इंग्रजी भाषा घरी देखील आत्मसात करायला सुरुवात केली. म्हणून मराठी सारखी भारतीय भाषा हळूहळू आपल्या घरांमधून हद्दपार होऊ लागली आणि अनेक दशकांनंतर तिचा अस्तित्व देखील संपल्यातच जमा झालं. आपल्या पूर्वजांनी मराठी भाषा सोडून इंग्रजीचा अवलंब करण्यास सुरुवात केली आणि आपला भाषिक वारसा पुढील पिढ्यांमध्ये हस्तांतरित करण्याचे त्यांनी सोडून दिले. प्रत्येकाला केवळ इंग्रजी भाषेचेच ज्ञान त्यांनी दिले. म्हणून मराठी भाषा देखील कालांतराने नाश पावत गेली. पुढे काळ बदलला. जपानी, चिनी, रशियन, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश लोक मोठे होऊ लागले. त्यांचा देखील इंग्रजी इतकाच दबदबा तयार झाला. आज भारतीय लोक इंग्रजीच्या बरोबरच या भाषा देखील शिकतात आणि त्या देशांमध्ये स्थायिक होतात."
ल्युसीच्या चेहऱ्यावर आता टॉमला काळजीची छटा देखील दिसून यायला लागली होती. तिने पुढे विचारले,
"आजोबा त्या काळात आपले लोक असे का वागले असतील?"
"बाळा तसं पाहिलं तर आपल्या भारतीय लोकांना हजारो वर्षांपासून गुलामीची सवयच झालेली आहे. हजारो वर्ष गुलामगिरीमध्ये घालवल्यानंतर ही सवय सुटणार तरी कशी? स्वतःच अस्तित्व तयार करण्याऐवजी आपले पूर्वज दुसऱ्यांचा कित्ता मिळवण्यामध्ये समाधान मानू लागले. याच कारणास्तव आपली संस्कृती आणि भाषा देखील कालांतराने नष्ट झाली. त्याचाच परिपाक म्हणून आज आपण सांस्कृतिक आणि भाषिक गुलामगिरीमध्ये जगत आहोत. अर्थात आपल्या भोवतीच्या सर्व लोकांना ते पटते आहे. म्हणून आपल्यालाही ते पटवून घ्यायचे आहे!"
ल्युसीच्या मेंदूमध्ये विचारांचे काहूर माजायला सुरुवात झाली होती. आपले पूर्वज इतके मूर्ख होते का? या प्रश्नाचे उत्तर संधीग्धपणे तिच्या मनात तयार झाले होते. तिने पुढे विचारले,
"मग तत्कालीन राजकीय पुढार्‍यांनी आपली भाषा वाचवण्यासाठी काही प्रयत्न केले नाहीत का?"
तिच्या या प्रश्नावर टॉमच्या चेहऱ्यावर कुत्सित हसू दिसून आले व तो बोलला,
"तत्कालीन भारतीय राजकारण हे अतिशय वेगळे होते. राजकारणी स्वार्थी म्हणूनच जगत असत. जिकडे पैसा आणि सत्ता त्यांचीच री ओढण्याचे काम ते करत होते. त्या काळातील सरकारांनी इंग्रजी शाळांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले आणि सरकारी अर्थात मराठी शाळा कशा बंद पडतील, याकडे व्यवस्थित लक्ष दिले. म्हणूनच इंग्रजी शिक्षण म्हणजेच दर्जेदार शिक्षण असा समज सगळीकडे पसरत गेला. इंग्रजी शाळा काढणाऱ्यांकडून राजकारण्यांना पैसा मिळतच होता. मग आपल्या भाषेचे काहीही होवो, याच्याशी त्यांना काहीच घेणेदेणे नव्हते. अनेक राजकीय पक्ष मराठी या मुद्द्यावर स्थापन झाले. पण कालांतराने त्यांनी देखील आपल्या भाषेला दूर करून त्यांच्या दृष्टीने लाभदायक असणारे मुद्दे हातात घेतले. याच राजकारण्यांची मुले देखील मोठमोठ्या इंग्रजी शाळांमधून शिकून राजकारणात आली. नंतर त्यांनी हळूहळू सगळीकडेच इंग्रजीचा अवलंब करण्यास प्रारंभ केला. आम्ही आमची भाषा टिकवण्यासाठी काहीतरी करतो आहोत, हे दाखवण्यासाठी त्यांनी शहरांमधील दुकानांच्या पाट्या मराठीत केल्या. परंतु हा केवळ दिखावा होता. लोकांना मूर्ख बनवण्याची कामे राजकारण्यांनी केली आणि स्वतःच्या स्वार्थापायी आपल्या भाषांच्या प्रगतीचे मार्ग तोडून टाकले. म्हणूनच आज आपण इंग्रजी बोलणारे 'इंग्रज' आहोत."
ल्युसीला समजलेला हा इतिहास धक्कादायक असाच होता. आज चीन, जपान, रशिया सारखे देश तसेच अनेक युरोपियन देशदेखील आपल्या भाषा समृद्ध करताना तिला दिसत होते. पण आपण मात्र इंग्रजीच्या गुलामगिरीत अडकून पडलो होतो. आपल्या समृद्ध भाषा नष्ट झाल्या होत्या. त्यांना काडीचीही किंमत उरलेली नव्हती. त्यादिवशी तिला प्रथमच आपल्या पूर्वजांचा भयंकर राग आला. पण काय करावे हे सुचत नव्हते आणि एके दिवशी इंटरनेटवर तिच्या वाचनात एक लेख आला. कोणी एकेकाळी व्यवहारातून नष्ट झालेली हिब्रू भाषा इस्त्राईलवासीयांनी पुन्हा स्वप्रयत्नाने व्यवहारात आणली होती. ल्युसीसाठी ही एक प्रेरणा ठरणार होती!

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

दि व्हॉल्ट ऑफ विष्णू

आज कित्येक वर्षानंतर ३०० पानी कादंबरी सलग वाचून संपवली! अश्विन सांघी यांनी लिहिलेली 'दि व्हॉल्ट ऑफ विष्णू' ही कादंबरी म्हणजे एक प्राचीन आणि सद्य परिस्थितीशी मेळ घालणारी थरारक रहस्य कादंबरी आहे. 

दीड हजार वर्षांपूर्वी चिनी प्रवासी ह्यूएन त्संग याने भारताला भेट दिली होती. त्याच्या प्रवासाचे चित्रण व त्याला अनुसरणाऱ्या सद्यपरिस्थितीचे कथानक असा मेळ घालणारी ही कादंबरी आहे. भारत आणि चीन या २१ व्या शतकामध्ये वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. शिवाय दोघेही सख्खे शेजारी असल्यामुळे स्पर्धा देखील प्रत्येक पातळीवर आपल्याला पाहायला मिळते. चार वर्षांपूर्वी चीनने भारताच्या डोकलाम येथे भारतीय हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावर बराच गदारोळ देखील उठला. याच पार्श्वभूमीचा वापर करून लेखकाने भारत आणि चीन प्राचीन संबंधांपासून आज असलेल्या संबंधांपर्यंतचा लेखाजोखा या रहस्य कादंबरीमधून मांडलेला आहे. ह्यूएन त्संगचा प्रवास आणि आजच्या भारत व चीन मधील घडामोडी हे दोन्ही प्रसंग समांतर पद्धतीने या पुस्तकात रेखाटण्यात आलेले आहेत. 

ह्यूएन त्संगचा प्रवास हा अतिशय रोमांचकारी, अवघड आणि विविध साहसं व नशिबाने भरलेला जाणवतो. आपल्या लेखणीने लेखक आपल्याला दीड हजार वर्षांपूर्वीच्या काळात घेऊन जातो. विशेष म्हणजे या प्रवास वर्णनात वापरलेली स्थळांची सर्व नावे तत्कालीन आहेत. यातूनच प्राचीन भारतातील बौद्ध संस्कृतीची घट्ट पकड देखील आपल्याला ध्यानात येते. तत्कालीन बौद्धमय भारत कसा होता, हे देखील अनुभवयास मिळते. सुरुवातीलाच या चिनी प्रवाशाच्या प्रवासाचा संपूर्ण मार्ग स्थळांसहित नकाशामध्ये दाखविण्यात आलेला आहे. कदाचित तो नकाशा नसता तर कादंबरीतील वर्णन सुरस वाटले नसते. 

काही वर्षांपूर्वी तमिळ भाषेमध्ये अभिनेत 'एल्लम अरीवू' (हिंदी भाषांतरित-चेन्नई टु चायना) हा चित्रपट बनविला होता. बोधिधर्म या बौद्ध भिक्खूच्या चीन प्रवासावर आधारित या चित्रपटाचे कथानक होते. याच बोधिधर्मचा प्रवास व कर्तुत्व देखील कादंबरीमध्ये वाचायला मिळते. यात अनेक पात्रे आहेत, शेकडो घटना आहेत. परंतु त्यांचा मेळ अतिशय उत्तमरीत्या लेखकाने बसविल्याचा दिसतो. अतिशय शांतपणे व एकाग्र चित्ताने ती वाचल्यास त्याचे थरारकनाट्य व रहस्यभेद हे वाचनाची खरीखुरी अनुभूती देतात. तीन-चार ठिकाणी झालेले रहस्यभेद हे अनपेक्षित वाटून जातात, यातच लेखकाचे यश सामावलेले आहे!



बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

काबुल कंदाहरच्या कथा - प्रतिभा रानडे

सातत्याने अस्थिरतेच्या छायेत राहणारा देश म्हणजे अफगाणिस्तान होय. फार वर्षांपूर्वी हा देश असा नव्हताच. सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचा अफगाणिस्तान आणि आत्ताचा यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. मागील काही वर्षांपासून तो दहशतवाद आणि तालिबान या दोन नावांमुळे अधिक ओळखला जातो. याच कारणास्तव अन्य जगाला येथील माणसांबद्दल तसेच राहणीमानाबद्दल विशेष कुतूहल वाटत आलेलं आहे. याच कुतूहलापोटी प्रतिभा रानडे यांनी लिहिलेले 'काबुल कंदाहरच्या कथा' हे पुस्तक वाचायला घेतलं. 



लेखिका स्वतः अफगाणिस्तानमध्ये अनेक वर्षे राहिलेल्या आहेत. त्यांनी या देशामध्ये अनुभवलेले समाजजीवन विविध छोट्या छोट्या कथांमधून या पुस्तकांमध्ये चितारल्याचे दिसते. ज्याद्वारे अफगाणिस्तान मधील तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब आपल्याला पाहता येते. काही कथा या काल्पनिक देखील आहेत. परंतु अफगाणी संस्कृतीच्या माहिती सांगणाऱ्या आहेत. त्या वाचत असताना आपण अफगाणिस्तानमध्ये अप्रत्यक्षपणे वावरत राहतो. भारतातील सोमनाथ मंदिराची १७ वेळा लूट करणाऱ्या मोहम्मद घोरी यावर देखील एक सुंदर कथा या पुस्तकांमध्ये वाचता येते. शिवाय मोहम्मद घोरीच्या लूट प्रसंगावर कादंबरी लिहिण्यासाठी लेखिकेने बरेच संशोधन देखील केले होते. परंतु सदर कादंबरी पूर्णत्वास गेली नाही. एकंदरीत कादंबरीची संकल्पना मात्र उत्तम वाटली. अनेकांच्या औत्सुक्याचा विषय असणाऱ्या अफगाणी जीवन शैलीची ओळख करून देणारे हे पुस्तक वाचनीय असेच आहे.

- बाबुराव रामजी

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

सल

सोळा ऑगस्टची सकाळ. नेहमीपेक्षा अमिना आज अर्धा तास लवकरच उठली होती. तशीही तिला कामाला काल सुट्टी होती. त्यामुळे आराम तर झालाच होता. पण अब्दुलची कालची मागणी पूर्ण करू शकली नाही. याची सल तिच्या मनाला अजूनही बोचत होती. त्यामुळेच ती सकाळी लवकर उठली होती. 

महापालिकेमध्ये कंत्राटी तत्त्वावर सफाई कामगार म्हणून काम करताना तिची बऱ्यापैकी दमछाक होत होती. पण आपल्या मुलाच्या अर्थात अब्दुलच्या उज्वल भविष्यासाठी ती कोणतेही कष्ट उपसायला सदैव तयार होती. त्यादिवशी सकाळी लवकर उठल्यावर दहाच मिनिटांमध्येच ती आवरून आपल्या झोपडीवजा घराच्या बाहेर पडली. 

रस्त्यावर चालणाऱ्यांची तशी आज फारच कमी वर्दळ होती. रात्रीपासून पावसाची भुरभुर चालू राहिलेली होती. ती अजूनही सुरूच होती. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी कंत्राटदाराने दिलेला प्लास्टिकचा कोट तिने अंगावर चढवला व झपाझप पावले टाकत चालू लागली. अब्दुल उठायच्या आधी तिला परत घरी यायचे होते. चालता चालता शोधक नजरेने ती रस्त्यांवर सर्वत्र पाहत होती. अर्धा ते पाऊण तासांमध्येच तिचा कार्यभाग साध्य झाला असावा. सात वाजेपर्यंत ती परत घरी पोहोचली होती. 

अब्दुल अजूनही शांतपणे झोपलेला होता. त्या छोट्याशा घरात दोघं मायलेक तीन वर्षांपासून सुखाने राहत होते. अब्दुलचा शब्द खाली पडू नये म्हणून तिने नेहमीच काळजी घेतली होती. यावेळेस देखील ती त्याला दुःखी बघू शकणार नव्हती. म्हणूनच तिचा सकाळपासूनच खटाटोप चालू होता. 

तो उठेपर्यंत तिने घरातील आवराआवर सुरू केली. साडेसातच्या दरम्यान अब्दुलला जाग आली असावी. त्याला अम्मीची खुडबुड ऐकू येत होती. पण तो उठून बसला नाही. तशीही आज शाळेला सुट्टीच होती. त्यामुळे झोपेतून उठण्याची त्याची देखील इच्छा दिसत नव्हती. तो उठला आहे हे लक्षात येताच अमिनाने त्याला हाक मारली. तीन-चार हाकांनंतर त्याने वळून बघितले. आज घराच्या बाहेर त्याला काहीतरी वेगळे जाणवले. ते पाहताच तो ताडकन उठून बसला. 

काल स्वातंत्र्यदिनी दहा रुपयांचा छोटा झेंडा घ्यायचा म्हणून दिवसभर तो रुसून बसला होता. पण अम्मी त्याची मागणी पूर्ण करू शकली नव्हती. आज त्याच्या झोपडीच्या दरवाजा बाहेर पूर्ण गोलाकृती आकारात छोटे-छोटे व वेगवेगळ्या आकाराचे झेंडे लावलेले त्याला पाहायला मिळाले. स्मित हास्याची एक लकेर त्याच्या चेहऱ्यावर उमटली. ती पाहताच अमिना देखील समाधान पावली. तो उठून लगेच बाहेर आला. दरवाज्याच्या सर्व बाजूंनी लावलेले तिरंगे पाहून आनंदून गेला. काल एक झेंडा विकत घेऊन दिला नाही म्हणून रुसून बसलेला तो आज आईवर जाम खुश झाला होता! 

Ⓒ बाबुराव रामजी

सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

शेवट

लोहगाव विमानतळावरून तिची दिल्लीला जाण्यासाठी रात्री साडेअकरा वाजता ची फ्लाईट होती. अभिषेकने रचनाला दहा वाजताच विमानतळावर पोहोच केले. तो मात्र फ्लाईट सुटेपर्यंत विमानतळावरच बसून होता. फ्लाईट रवाना झाली आणि त्याने तेथून काढता पाय घेतला. 

रचनाची ही पहिलीच बिझनेस कॉन्फरन्स होती. आणि शिवाय ती पहिल्यांदाच विमानाने महाराष्ट्राच्या बाहेर प्रवास करणार होती. म्हणून अभिषेक स्वतः तिला सोडवायला विमानतळावर आला होता. 

त्याने पार्किंगमधून गाडी बाहेर काढली आणि सुसाट वेगाने त्या रिकाम्या रस्त्यांवरून पुण्याच्या दिशेने मार्गस्थ केली. तिच्या जाण्याने मागील दोन वर्षांपासून तो पहिल्यांदाच घरी एकटा राहणार होता. एकटेपणाची त्याला सवय तर होतीच पण लग्नानंतर आयुष्य एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलेले होते. त्यामुळे मनावर दडपण येत होते. गाडी चालवत असताना देखील आज कितीतरी दिवसांनी रचना त्याच्या सोबत नव्हती. 

त्याने ऑडिओ प्लेयर चालू केला. आपली आवडती गाणी लावली. परंतु त्याच्यामध्ये त्याचे मन काही रमत नव्हते. आठवणींचा बोजा मागच्या दोन वर्षांपासून त्याच्या मेंदूमध्ये तर होताच तो काही कमी होण्याचे नाव अजूनही घेत नव्हता. रचनाचा आणि त्याचा विवाह हा ठरवून झालेला अर्थात अरेंज मॅरेज होता. केवळ एका महिन्याच्या ओळखीमध्ये त्याचा विवाह संपन्न झाला होता. परंतु, आजही त्याला अनुप्रियाची आठवण सतावत होती. 

अनुप्रिया ही त्याची महाविद्यालयातील वर्गमैत्रीण होतील आणि प्रेयसी देखील. तीन-साडेतीन वर्ष त्यांचं प्रेमप्रकरण चालू होतं. अभिषेकला जॉब लागल्यानंतर तिला आपल्या भावी सुखी आयुष्याची स्वप्ने पडू लागली. दोघांनाही लग्न करायचे होते. ती मात्र त्याच्यामध्ये पूर्णतः गुंतून गेलेली होती. एका अर्थाने जीवनाच्या शेवटपर्यंत हाच जोडीदार आपल्या सोबत असेल, याची तिला मनोमन खात्री झाली होती. परंतु कालांतराने परिस्थिती पलटली. अभिषेकच्या घरी अनुप्रियाबद्दल समजले तेव्हा त्यांनी फारसा गदारोळ केला नाही. उलट त्याला नीट समजावून सांगितले. 

घरच्यांचे विचार पूर्णपणे व्यवहारिक होते. प्रत्यक्ष जीवनात कोणत्या अडचणींचा सामोरे जावे लागेल, याची कहाणीच त्यांनी अभिषेक समोर रचून ठेवली. अनुप्रिया ही गृहिणी टाइप मुलगी होती. अशी मुलगी आपल्या घरात नको. उलट करिअरला प्राधान्य देणारी मुलगी हवी. असंच घरातील सर्वांना वाटत होतं. थोड्याच काळामध्ये अभिषेकला देखील घरच्यांचं म्हणणं पटायला लागलं. तोदेखील व्यावहारिक झाला आणि अनुप्रियापासून हळूहळू दूर जायला लागला. त्यामुळे तीच्या मनातील चलबिचल वाढू लागली होती. एक दिवस अभिषेकने तिला थेट 'आपलं पुढे काही होऊ शकत नाही आपण इथेच थांबूया', असं सरळ सांगून दिलं. त्याच्या या पवित्र्यामुळे अनुप्रिया मात्र कोलमडली. तिच्यासाठी न सहन होणारा हा एक धक्का होता. 

त्याच्या जागी तिने कुणालाही विचार केलेला नव्हता. ती पूर्णपणे त्याच्यामध्ये गुरफटलेली होती. त्यामुळे त्याचा नकार पचवणे तिला शक्य झाले नाही. एका उंच इमारतीवरून उडी मारून तिने आपले जीवन संपवले. अभिषेकला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्याने तिच्या अंत्यसंस्काराला देखील जाणे टाळले होते. मनातून त्याला वाईट वाटले. परंतु आता तो व्यवहारिक झाला होता. भावनिक नात्यात गुंतून जाणे त्याला निरर्थक वाटू लागले होते. 

तिच्या आत्महत्येची बातमी त्याने दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रामध्ये वाचली आणि तिचा विषय सोडून दिला. त्यानंतर एकाच महिन्यांमध्ये त्याचा विवाह निश्चित झाला. रचना एक हुशार मुलगी होती. करिअरच्या दृष्टीने विचार करणारी समंजस आणि सुंदर देखील. तिलादेखील अभिषेक पहिल्याच भेटीमध्ये आवडला होता. त्याचं व्यक्तिमत्व कोणत्याही मुलीला लगेच आवडेल, असंच होतं. अभिषेकच्या घरच्यांना देखील रचना फारच भावली. लवकरच लग्नाची बोलणी झाली आणि एका महिन्यामध्ये शुभमंगल देखील उरकले गेले. 

लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस अतिशय आनंदात होते. कालांतराने अभिषेकच्या अनुप्रिया विषयीच्या आठवणी जागृत होऊ लागल्या होत्या. त्याला कारण देखील तसेच होते. त्याने तिला मनातून काढून टाकले असले तरीदेखील अधून मधून ती त्याच्या स्वप्नात यायला लागली. तिचा तो रडवेला सुर, तिने त्याला मारलेली आर्त हाक आणि एका उंच इमारतीवरून मारलेली उडी, यासारखे प्रसंग त्याला वारंवार स्वप्नामध्ये दिसायला लागले. कधीतरी मध्यरात्री मध्येच त्याला अचानक जाग यायची, तो घामाघूम झालेला असायचा आणि परत झोप लागायची नाही. सतत येरझाऱ्या घालत असायचा. मग महत्प्रयासाने त्याला पुन्हा झोप लागायची. असं अनेकदा घडत होतं. 

अनुप्रिया त्याच्या आयुष्यातून जायला एका अर्थाने तयारच नव्हती. हळूहळू रचनाला देखील ही गोष्ट ध्यानात यायला वेळ लागला नाही. तीने त्याला विश्वासात घेऊन सर्व गोष्टी विचारल्या होत्या. अनुप्रिया बद्दल तिलादेखील सहानुभूती वाटू लागली. परंतु आता काही करता येणे शक्य नव्हते. अभिषेकला आता तिच्या प्रेमाची गरज होती. तिने मागील दोन वर्षांमध्ये त्याला पुरेपूर साथ दिली होती. पण अनुप्रिया त्याचा पाठलाग करतच होती. 

हा सर्व भूतकाळ त्यादिवशी एकट्याने प्रवास करताना त्याच्यासमोर पुन्हा उभा राहिला. लग्नानंतर कित्येक वर्षानंतर तो आज रात्री एकटाच घरी असणार होता. 

पाऊण तासाच्या प्रवासानंतर त्याची गाडी सोसायटीच्या गेटमध्ये पोहोचली. सर्वत्र शुकशुकाट झाला होता. अगदी सोसायटीच्या गेटपाशी भुंकणारी कुत्री देखील स्वस्थपणे पडलेली त्याला दिसली. गाडी पार्क करून तो लिफ्टच्या दिशेने निघाला. डी-विंगमध्ये आठव्या मजल्यावर त्याचा आलिशान फ्लॅट होता. लिफ्टमधून आठव्या मजल्यावरचा दरवाजा उघडला व तो फ्लॅटच्या दिशेने निघाला. खिशातून चावी काढली दरवाजा उघडला आणि आज सोफ्यावर जाऊन बसला. रात्रीचे एक वाजत आले होते दिवसभराचा थकवा त्याच्या चेहर्‍यावर जाणवू लागला होता. 

त्याने हॉलची लाईट बंद केली आणि बेडरुमच्या दिशेने निघाला. परंतु मुख्य दरवाजाच्या बाहेर त्याला सूक्ष्म हालचाल जाणवली. त्यामुळे तो लगेचच थांबला व त्याने दरवाजाच्या दिशेने बघितले. त्यावर असणार्‍या पी-होलमधून घरामध्ये येणारा प्रकाश कधी बंद तर कधी चालू होता. अर्थात दरवाजाच्या समोर कोणीतरी येत असावे, असे त्याला जाणवले. पुढची दहा सेकंद जवळपास तो प्रकाश बंद होता. म्हणजे नक्कीच कुणीतरी दरवाजासमोर उभे आहे, याची त्याला खात्री झाली. पुन्हा तो प्रकाश दिसायला लागला. त्याने हळुवारपणे पावले टाकत दरवाजाच्या दिशेने जायला सुरुवात केली. एव्हाना पी-होलमधून येणारा प्रकाशाचा एक किरण त्याला दिसत होताच. पुन्हा दोन वेळा त्या प्रकाशाची उघड झाप झाली. आता मात्र त्याला पूर्ण खात्री झाली होती की, दरवाजाच्या समोर कुणीतरी येऊन जातय. 

दरवाजापाशी आल्यानंतर त्याने पी-होलमधून बाहेर पाहिले. फ्लॅटसमोरील पॅसेज मधल्या प्रकाशात समोरच्या दोनही फ्लॅटचे दरवाजे दिसत होते. मात्र आजूबाजूला कोणीही नव्हतं. बराच वेळ तो तिथेच एका डोळ्याने निरीक्षण करत होता. पण हालचाल जाणवली नाही. कोणीतरी नक्की होतं तिथे. त्याच्यावर कदाचित ते नजर ठेवून असावं. 

थोडा वेळ तो तसाच दरवाज्यापाशी उभा राहिला. बाहेर त्याला अतिशय मंद हालचाल जाणवत होती. दरवाजा उघडू की नको, या प्रश्नाचा तो विचार करत बसला. परंतु बाहेरच्या व्यक्तीच्या हालचाली त्याला दरवाजा उघडण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. अखेर त्याने लॅच काढला आणि दरवाजा उघडला. 

बाहेर कोणीच नव्हतं. रात्रीची नीरव शांतता त्याला पहिल्यांदाच अनुभवता येत होती. त्याने दरवाज्याच्या बाहेर पाऊल टाकले. दरवाज्याच्या भिंतीला डावीकडे लिफ्टचा दरवाजा होता. तो त्याला बंद होताना दिसला आणि लिफ्टमधून बाहेर येणारा प्रकाश देखील संपला. म्हणजे कुणीतरी होतंच तिथे, पण कोण? ती उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. 

त्याने दरवाजा ओढून घेतला व लिफ्टच्या दिशेने चालायला लागला. पायातील चपलांचा आवाज त्या नीरव शांततेचा भंग करीत होता. कदाचित तो खालील व वरील काही मजल्यांपर्यंत निश्चित ऐकू जात असावा. 

तो लिफ्टच्या दरवाज्यापाशी पोहोचला. बाहेरच्या इंडिकेटरवर अजूनही लिफ्ट आठव्या मजल्यावर आहे, असं दिसत होतं. उघडली तेव्हा त्यातून कोणीही बाहेर आले नाही. याचा अर्थ कुणीतरी लिफ्टमध्ये गेलेलं होतं, हे मात्र नक्की. परंतु लिफ्ट अजूनही त्याच मजल्यावर होती. तिचं बटन दाबू की नको, याचा विचार करत तो तसाच उभा राहिला. छातीमध्ये काहीसं धडधडायला लागलं होतं. कोण असावं नक्की लिफ्टमध्ये? याची उत्सुकता त्याला होतीच. पण ते पाहण्याची हिम्मत होत नव्हती. तोच अचानक लिफ्ट खालच्या दिशेने जायला लागली. मग मात्र तो उडालाच. 

8 7 6 5 4 3 2 1 करत तळमजल्यावर ती पोहोचली होती. आता मात्र त्याच्या अंगावर भीतीचा शहारा उठला. काय करावं काही सुचत नव्हतं. बराच वेळ तो तसाच उभा होता. अजूनही लिफ्ट तळमजल्यावरच होती. कुणीतरी त्याच्या मागावर आहे. पण कोण? याची उत्सुकता त्यालाही लागली होती. बराच विचार त्याने हिमतीने पायऱ्या उतरून खाली जायचे ठरवले. तिथून निदान सुरक्षित तरी राहू, असा त्याचा विचार असावा. 

एक-एक मजले करत तो पायऱ्यांनी तळमजल्यावर पोहोचला. संपूर्ण तळमजल्यावर पार्किंग केलेल्या कार्स दिसत होत्या. आजूबाजूला कुणीही नव्हतं. तिथून चालत तो सोसायटीच्या आवारामध्ये आला. चारही बाजूंनी काँक्रीटच्या भिंतींचे कुंपण केलेलं होतं. त्यापलीकडे रस्त्यांवर भटकी कुत्री शांतपणे झोपलेली होती. शहरातल्या रस्त्यांवर रात्रीची इतकी भयाण शांतता त्याला पहिल्यांदाच दिसून आली. बिल्डींगमध्ये कोणी आलं होतं का? हे विचारावं म्हणून तो गेट वरच्या वॉचमनच्या दिशेने चालायला लागला. दुरूनच त्याला गेट बंद असल्याचं दिसलं. सेक्युरिटी कॅबिन शेजारी बाहेर एका खुर्चीवर आकाशाकडे बघून तोंडाचा 'आ' करून वॉचमन झोपलेला त्याला दिसला. गेटला मात्र आतून कुलूप लावलेलं होतं आणि वॉचमनची झोप बघता कदाचित इतक्यात कुणी आलेलं नसावं. 

तोच कुठून जरी वार्‍याची सळसळ त्याला ऐकू आली. त्याने मागे वळून बघितलं. कोणीही नव्हतं. परत आपल्या जिन्याच्या दिशेने चालायला लागला. तेवढ्यात एका  अविशिष्ट हुंकाराने त्याचं लक्ष वेधलं गेलं. इमारतीच्या टेरेसवर कोणीतरी उभं होतं. ते पाहताच त्याला धडकी भरली. अनुप्रियाच होती ती! 

टेरेसच्या कठड्यावर आकाशाकडे उंच पाहत दोन्ही हात वरती झेपावलेले! एक असह्य वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होती. उंचावर वाहणारा वारा तिचे केस उडवीत होता. तिचं हे रूप बघून अभिषेकला दरदरून घाम फुटला. ती त्याच्याकडे पाहत देखील नव्हती. रोज स्वप्नात दिसणारी अनुप्रिया आज दोन वर्षांनी त्याला एका वेगळ्याच अविशिष्ट रुपात दिसून आली. त्याचं हृदय गोठत आहे की काय, असं वाटून गेलं आणि इतक्यात तीने स्वतःला खाली झोकून दिलं! 

ती वाऱ्याच्या वेगाने जमिनीकडे यायला लागली. त्याच्या तोंडातून एक अस्पष्ट किंकाळी ऐकू आली. कंठ मात्र फुटत नव्हता. त्याला काही कळायच्या आतच ती अतिशय वेगाने जमिनीवर आदळली आणि नाहीशी झाली. तो सुन्नपणे सर्व काही पाहत होता. कदाचित तिला तिचा शेवट त्याला दाखवायचा होता म्हणून ती परत आली होती!

Ⓒ बाबुराव रामजी



रातराणीचे रहस्य

महाराष्ट्रातील रहस्यकथाकारांच्या परंपरेत गुरुनाथ नाईक हे एक अग्रणी आणि अत्यंत लोकप्रिय नाव आहे. ७०, ८० आणि ९० च्या दशकात त्यांनी रहस्यकथा वा...