सोळा ऑगस्टची सकाळ. नेहमीपेक्षा अमिना आज अर्धा तास लवकरच उठली होती. तशीही तिला कामाला काल सुट्टी होती. त्यामुळे आराम तर झालाच होता. पण अब्दुलची कालची मागणी पूर्ण करू शकली नाही. याची सल तिच्या मनाला अजूनही बोचत होती. त्यामुळेच ती सकाळी लवकर उठली होती.
महापालिकेमध्ये कंत्राटी तत्त्वावर सफाई कामगार म्हणून काम करताना तिची बऱ्यापैकी दमछाक होत होती. पण आपल्या मुलाच्या अर्थात अब्दुलच्या उज्वल भविष्यासाठी ती कोणतेही कष्ट उपसायला सदैव तयार होती. त्यादिवशी सकाळी लवकर उठल्यावर दहाच मिनिटांमध्येच ती आवरून आपल्या झोपडीवजा घराच्या बाहेर पडली.
रस्त्यावर चालणाऱ्यांची तशी आज फारच कमी वर्दळ होती. रात्रीपासून पावसाची भुरभुर चालू राहिलेली होती. ती अजूनही सुरूच होती. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी कंत्राटदाराने दिलेला प्लास्टिकचा कोट तिने अंगावर चढवला व झपाझप पावले टाकत चालू लागली. अब्दुल उठायच्या आधी तिला परत घरी यायचे होते. चालता चालता शोधक नजरेने ती रस्त्यांवर सर्वत्र पाहत होती. अर्धा ते पाऊण तासांमध्येच तिचा कार्यभाग साध्य झाला असावा. सात वाजेपर्यंत ती परत घरी पोहोचली होती.
अब्दुल अजूनही शांतपणे झोपलेला होता. त्या छोट्याशा घरात दोघं मायलेक तीन वर्षांपासून सुखाने राहत होते. अब्दुलचा शब्द खाली पडू नये म्हणून तिने नेहमीच काळजी घेतली होती. यावेळेस देखील ती त्याला दुःखी बघू शकणार नव्हती. म्हणूनच तिचा सकाळपासूनच खटाटोप चालू होता.
तो उठेपर्यंत तिने घरातील आवराआवर सुरू केली. साडेसातच्या दरम्यान अब्दुलला जाग आली असावी. त्याला अम्मीची खुडबुड ऐकू येत होती. पण तो उठून बसला नाही. तशीही आज शाळेला सुट्टीच होती. त्यामुळे झोपेतून उठण्याची त्याची देखील इच्छा दिसत नव्हती. तो उठला आहे हे लक्षात येताच अमिनाने त्याला हाक मारली. तीन-चार हाकांनंतर त्याने वळून बघितले. आज घराच्या बाहेर त्याला काहीतरी वेगळे जाणवले. ते पाहताच तो ताडकन उठून बसला.
काल स्वातंत्र्यदिनी दहा रुपयांचा छोटा झेंडा घ्यायचा म्हणून दिवसभर तो रुसून बसला होता. पण अम्मी त्याची मागणी पूर्ण करू शकली नव्हती. आज त्याच्या झोपडीच्या दरवाजा बाहेर पूर्ण गोलाकृती आकारात छोटे-छोटे व वेगवेगळ्या आकाराचे झेंडे लावलेले त्याला पाहायला मिळाले. स्मित हास्याची एक लकेर त्याच्या चेहऱ्यावर उमटली. ती पाहताच अमिना देखील समाधान पावली. तो उठून लगेच बाहेर आला. दरवाज्याच्या सर्व बाजूंनी लावलेले तिरंगे पाहून आनंदून गेला. काल एक झेंडा विकत घेऊन दिला नाही म्हणून रुसून बसलेला तो आज आईवर जाम खुश झाला होता!
Ⓒ बाबुराव रामजी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा