बुधवार, २९ जून, २०२२

सरदार ड्रायव्हरची गोष्ट

नेहमीपेक्षा आज बस सकाळी पाच मिनिटे लवकरच आली होती. कॉलेजला जाणार्‍या आमच्या बसचा ड्रायव्हर हा तसा साधा सरळ होता. सहसा तो कोणत्या अन्य ड्रायव्हरला रस्त्यावर मोठ्याने शिव्या देत नसे. तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटायचा पण ते फारसं घाणेरडे अथवा गलिच्छ असं काही नव्हतं! रोज सकाळी शिस्तीत गाडी कॉलेजला पोहोचवायची व संध्याकाळी परत घेऊन यायची, असा त्याचा नित्यनियम होता. 

त्यादिवशी त्याची गाडी स्टॉपवर पोहोचली आणि त्याने त्याच्या बाजूचा साइड मिरर व्यवस्थित केला. आज त्याने नवीन बस आणली होती. या बसचा साईड मिरर थोडासा पुढच्या बाजूला असल्यामुळे त्याचा सहजासहजी हात पोहोचत नव्हता. त्यासाठी त्याने एका बांबूचे योजना केली होती. आज तो मिरर बऱ्यापैकी ढिला झाला असल्यामुळे गाडी थोडी जरी पुढे गेली तरी त्या आरश्याची स्थिती हालत होती. त्यामुळे ड्रायव्हरला मागच्या गाड्या व्यवस्थित दिसत नसत. म्हणूनच दर पाच ते दहा मिनिटांनी तो त्याच्याकडे असलेल्या बांबूने आरशावर ठोकत हळूहळू तो पुन्हा व्यवस्थित करत होता. त्याची ही कृती आज आम्हाला थोडी विचित्रच वाटली. कदाचित घाईघाईमध्ये एखाद्या मेकॅनिककडून तो आरसा व्यवस्थित बसवून घ्यायला त्याला जमले नसावे. म्हणूनच त्याने आज हा जुगाड शोधला होता! 

सुमारे १५ ते २० मिनिटानंतर गाडी शहरातल्या मुख्य रस्त्यांवर आली. यानंतरही आरसा ॲडजस्ट करण्याची त्याची ही कृती चालूच होती. त्याच्या मागे आता एक ट्रक चालला होता. ड्रायव्हरने आरसा ॲडजस्ट करण्यासाठी आरशावर बांबूने हळू हळू ठोकायला सुरुवात केली की, मागचा ट्रक ड्रायव्हर जोरजोरात हॉर्न वाजवायचा. जवळपास दहा मिनिटे असं चालू होतं. गाडी एका चौकापाशी आली तेव्हा त्याने आपला वेग कमी केला. त्याचाच फायदा घेत मागचा ट्रक ड्रायव्हर आमच्या बसच्या पुढे येऊन थांबला. तो तावातावात ट्रक मधून उतरला आणि आमच्या बस ड्रायव्हरला शिव्या द्यायला लागला. ट्रक ड्रायव्हर एक सरदारजी होता. बोलतानाही तो जवळपास ओरडतच होता. 

"मुझे मारते हो साले!" 

"क्या हुआ सरदारजी मैने कब मारा?" , आमच्या ड्रायव्हर चा प्रश्न. 

"अभी बांबू लेके आया ना. तो मुझे देख कर ये आईने पर क्यू ठोक रहा है?" 

त्याचं बोलणं ऐकून आमच्या ड्रायव्हरसह आम्हालाही थोडं हसू आलं. त्यामुळे तो अधिकच चिडला. 

"मेरे को मारने का नही. हिम्मत है तो सामने आजा!", त्याने ठणकावून सांगितलं. 

मग ड्रायव्हरनेही त्याला समजावलं, "सरदारजी ये मेरा साईड मिरर आहे ना थोडा ढिला है. तो उसको ऍडजस्ट करने के लिए बांबू से उसपर ठोक रहा हूँ." 

पण सरदारजीला अजूनही त्याचं म्हणणं पटलं नाही. तो 'फुल-ऑन' भांडणाच्या मूडमध्ये होता. खरोखर सरदारजीच होता तो! बस ड्रायव्हर त्याच्या साईड-मिररमध्ये बघून मला अर्थात मागच्या गाडीच्या ड्रायव्हरला बांबूने मारतोय, असं त्याला वाटत होतं. अखेर आमच्या बसमधील एका सरांनी त्या सरदारजीला समजावून समजावलं. तेव्हा तो शांत झाला. एका सरदारजीला सरदारजी काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर मात्र त्या दिवशी मला मिळालं होतं! 




रविवार, १२ जून, २०२२

शिकाऊ अनुज्ञप्ती पुराण

जवळपास दोन वर्षांपासून नियमितपणे फेरफटका मारण्याची आमचे सरकारी कार्यालय म्हणजे एमएच-१४ चे परिवहन कार्यालय. त्यावेळी नुकतीच पिंपरीहुन मोशीच्या नव्या इमारतीत स्थलांतरित झाले होते. तेव्हापासून आम्ही त्याची 'प्रगती' अनुभवत आहोत! जवळपास सर्वच सरकारी कार्यालयांची प्रगती ही समान संथगतीने होत असते. त्यात हेही सुटलेले नाही!
मागच्या काही महिन्यांपासून चारचाकीची शिकाऊ अनुज्ञप्ती अर्थात लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आम्ही सदर कार्यालयात अनेक फेऱ्या मारल्या. गेल्या काही वर्षांपासून परिवहन कार्यालयाने सदर पद्धती ऑनलाईन केल्याने आपले कार्य सुलभ होईल, अशी अपेक्षा होती. परंतु नागरिकांना त्रास देण्यासाठी व पैसे लाटण्यासाठी ही सोय होती, हे आमच्यासारख्या पामरास खूप उशिरा समजले. आम्ही स्वतः संगणक अभियंता असल्याने आमची दृष्टी वेगळी आणि पैसे लाटणाऱ्याची दृष्टी वेगळी पडते, हे आमच्या फारच उशिरा ध्यानात आले. आमचे आधीचे लायसन्स हे एमएच-१५ द्वारा वितरित करण्यात आले होते. त्यामुळे नवे लायसन्स एमएच-१४ कडून मिळण्यात इतक्या अडचणी येतील, याची जराही कल्पना आमच्या मनात नव्हती. परंतु त्यामुळे ही सर्व कार्यालये एकाच भारतीय संघराज्यात किंवा भारताच्या एकाच राज्यात येतात का? हाही प्रश्न आमच्या मनात घर करून राहिला होता. त्याला आता दोन वर्षे उलटली आहेत. नव्या कार्यालयातले साहेबही बदलले आहेत. त्यामुळे आम्ही आता ताज्या दमाने नवा अर्ज करण्यासाठी सज्ज झालो होतो.
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी शासनाने जी ई-पद्धतीची अर्ज प्रक्रिया चालू केली आहे, तिचा आम्ही पुरेपूर वापर केला. ऑनलाईन भरलेल्या अर्जाच्या, त्याच्या पावतीच्या, आमच्या ओळखपत्राच्या, जन्म पुराव्याच्या आम्ही "प्रिंट्स" काढल्या व पुनश्च त्या स्कॅन करून अपलोड करण्याच्या कामाला लागलो. कुठूनतरी ढापलेल्या वेब टेम्प्लेट वर बनवलेले संकेतस्थळ आम्ही शोधले! त्यावर अजूनही "साईट टायटल हियर" असं लिहिलेलं आहे! हे विशेष! अशा नावीन्यपूर्ण संकेतस्थळावर आपले सर्व दस्तावेज अपलोड करताना आमची ऑनलाइन दमछाक झाली. चार एमबीची फाईल 200 केबीमध्ये बसवताना ऑनलाईन दमछाक होते, हे लक्षात असू द्यात! त्यानंतरचा ऑनलाइन पेमेंट गेटवे हा तब्बल तीन वेळा कोसळला! तोही ऑनलाईनच! सुमारे एक-दीड तासानंतर आमचेही ऑनलाइन पुराण समाप्त झाले. आता लवकरच आपल्या लायसन्स (ऑनलाईन!) मिळणार याची स्वप्ने पडायला लागली.



शहरात सगळ्यात जास्त बेशिस्त पार्किंग कुठे होत असेल तर, ती आरटीओ कार्यालयाच्या बाहेर! 'दिव्याखाली अंधार' ही उक्ती सार्थ ठरवणारी ही खरीखुरी जागा होय. अशा विविध सरकारी कार्यालयाची पायरी चढायची म्हणजे मोठा आत्मविश्वास व धैर्य लागते. खासकरून तेव्हा.. जेव्हा तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याचा खिसा गरम करणार नसाल! कार्यालयात प्रवेश करताच एंडोर्समेंट लायसन्स अर्थात लायसन्स वर लायसन्स काढण्यासाठी भली मोठी रांग लागलेली दिसली. अर्थात ती नव्याने लायसन्स काढणाऱ्या व्यक्तींना पेक्षा निश्चितच छोटी होती. समोर एका खुर्चीवर एक अधिकारी महिला अर्जांची छाननी करत होत्या. रांग पुढे सरकू लागली. वेग तसा चांगला होता. आजूबाजूला उभे असणाऱ्या अनेकांच्या हातातील त्यांचे अर्ज मी पाहिले. प्रत्येकाच्या अर्जावर कोणत्या ना कोणत्यातरी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा शिक्का होता. मीच आपुला उघडा बोडका अर्ज घेऊन त्या रांगेत उभा होतो, याची जाणीव झाली. चौकशी नंतर समजले की मोटार ड्रायव्हिंग स्कूलकडून दोनशे रुपये तपासणी करणार्‍या अधिकार्‍यांना दिले जातात. मी मात्र त्यात नव्हतो, याची खंत की लाज वाटली हे मला समजले नाही. त्या दोनशे रुपयांना कदाचित ते मानधन म्हणत असावेत. त्याला लाच म्हणणे म्हणजे अधिकाऱ्याचा व पैशाचाही अपमानच होय. खरं तर एखादा सरकारी अधिकारी व कर्मचारी पाहिला की, तो आपल्याकडे 'बकरा' या नजरेने पहात असावा असं आम्हाला बऱ्याचदा जाणवतं. आपल्याकडे पाहताना त्याच्या तोंडातून लाळ गळत आहे व प्रत्येक थेंबाची किंमत सुमारे पाचशे रुपये असावी, असेही आम्हाला सतत जाणवत राहतं. प्रामाणिक अधिकारी ही आमच्या दृष्टीने अंधश्रद्धा आहे. तिचं श्रद्धेत रुपांतर करण्याची हिम्मत आजवर एकाही सरकारी अधिकाऱ्याने केलेली नाही. या वेळीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. कार्यालयातील ती रांग सरकत सरकत पुढे आली. आमचा नंबर आला. मॅडमने प्रथम पाहिलं, अर्जावर कोणत्याही मोटार ड्रायव्हिंग स्कूलचा शिक्का नव्हता. "च्यायला दोनशे रुपये गेले!", असे भाव मॅडमच्या मनात उमटले असावेत व त्यांनी तात्काळ प्रतिसाद दिला,
"अर्ज नीट अपलोड केला नाहीये, परत अपलोड करा!", असे म्हणत आमचे कागद आमच्या अंगावर फेकले व संगणकात उघडला गेलेले अर्ज तात्काळ डिलीट करून टाकला. पुढचा क्रमांक घ्यायला मग त्या सज्ज झाल्या. ऑनलाइन अर्ज डीलीट केल्याने आमच्याकडे कोणताच पुरावा राहिला नव्हता. मग आम्ही निमूटपणे मागे हटलो व खुर्चीत जाऊन बसलो. आमचा मांडी-संगणक अर्थात लॅपटॉप आमचा सोबती म्हणून सतत बरोबर असतो. आम्ही तो बाहेर काढला व पुन्हा अर्ज अपलोड करायच्या मागे लागलो. मॅडमच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. 'मला खुन्नस देतोस काय?', ही भावना त्यांच्या मनात तयार झाली असावी. आमचा अर्ज पुन्हा अपलोड होईस्तोवर रांग संपून गेली होती. मग अर्ज घेऊन आम्ही पुन्हा मॅडमच्या समोर दाखल झालो. त्यांनी पुन्हा दहा मिनिटे काहीतरी काम केल्याची नाटकं केली आणि परत आमचा फॉर्म घेतला. त्यांच्यासमोरच संपूर्ण फॉर्म अपलोड झाल्याने कदाचित त्या मनातल्या मनात नवं कारण शोधत असाव्यात. तसेच त्या दोनशे रुपयांच्या नुकसानीची खंत त्यांना सतावत असावी. यावेळेस त्यांनी फॉर्म व्यवस्थित तपासून पाहिला आणि विचारलं, "जन्मतारखेचा प्रूफ कुठे आहे?" यावर मी त्यांना तात्काळ माझं जुनं दुचाकीचं लायसन्स दाखवलं व लगेच उत्तर मिळालं,
"हे नाही चालत ओ!"
ज्या आरटीओ कार्यालयाने मला दुचाकीचं लायसन्स दिलं आहे, ते तिथे खोटं ठरवण्यात आलं! ही बाई स्वतःच्या कार्यालयाने जारी केलेल्या ओळखपत्र नामंजूर करत होती! एका २०० रुपयांसाठी हे लोक काय काय करू शकतात, याचा नमुना त्यादिवशी आमच्या समोर दिसत होता. तेव्हा मनाची खात्री पटली की, काहीही झाले तरीही बाई आज आपल्याला लायसन्स मिळवून देणार नाहीये. त्यामुळे तेथून काढता पाय घेणं योग्य होतं. जाताजाता कार्यालयात शोभेसाठी लावलेला लाचलुचपत प्रतिबंधक शाखेच्या फलकही आम्हाला नजरेस पडला. त्याला मनातल्या मनात आम्ही सलाम ठोकला!
जवळपास दहा दिवसांनी एक सुट्टीचा दिवस मिळाला. मग काय... पुनश्च आम्ही सरकारी लोकांची तोंडं बघायला याच कार्यालयात डेरेदाखल झालो! पुन्हा तीच मोठी रांग. आणि याही वेळी तेच आम्ही एकुलते एक ज्यांच्या अर्जावर कोणताही स्टॅम्प नव्हता! यावेळी महिला अधिकार्‍याची जागा एका पुरुष अधिकाऱ्याने घेतली होती. सर्वांनाच प्रतिव्यक्ती दोनशे रुपये मिळायला हवेत, असा समानतेचा कायदा असल्याने कदाचित या खुर्चीवर रोज नवनवे अधिकारी बसत असावेत. यावेळी मात्र आमचा क्रमांक येईपर्यंत कामकाज संपायची वेळ झाली होती. अखेरीस जवळपास एकच्या सुमारास आमच्या क्रमांक आला. साहेबांनी आपल्या संगणकाचा पडदा कोणालाही दिसू नये म्हणून पूर्ण तिरका करुन ठेवलेला होता. त्यांनी आमचा अर्ज क्रमांक टाकला आणि ओरडले,
"डॉक्युमेंट नीट अपलोड केलेले नाहीयेत... हे बघा!"
असं सांगत त्यांनी संगणकाची स्क्रीन आमच्याकडे वळवली व त्यावरील "पेज नॉट फाऊंड" हा मेसेज दाखवला. यावर आम्ही उत्तरलो,
"पण बाकीच्यांचे कसे काय दिसत आहेत?"
"तुम्ही नीट अपलोड नाही केलीत."
"अहो पण दहा दिवसांपूर्वी तर दिसत होती."
"दहा दिवस ती डॉक्युमेंट राहणार आहेत का तिथं?"
साहेबांचा हा प्रतिप्रश्न ऐकून आम्हाला संगणक अभियंता असण्याची लाज वाटली! त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कदाचित ती कोणीतरी चोरून नेली असावित वा पावसाच्या पाण्याने भिजली असावीत. मग काय, त्यांनी आमच्या अंगावर फेकलेली कागदपत्रे पुनश्च गोळा करून आम्ही तिथून चालते पडलो. या भाऊने दोनशे रुपयांसाठी "पेज नॉट फाउंड"ची युक्ती केली होती. ती काय असावी? हा प्रश्न मात्र आमच्या मनात पडूनच राहिला.
तिसऱ्या खेपेला मात्र गयावया करून आम्ही आमचा अर्ज ऑनलाइन मंजूर करून घेतला व लर्निंग लायसन्स आमच्या हाती पडले!
सरकारी कार्यालयांकडे पाहिलं तर खऱ्या अर्थाने समजतं की, तंत्रज्ञानाच्या फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत! तुम्ही कितीही ठरवले तरी सरकारी कर्मचारी तुम्हाला त्रास देणारच आहेत. शेवटी पैसा कोणी सोडतं का? पण त्यात ही पेक्षा खरे आहेत की, फुकटचा पैसा कधी पचतो का? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच ठाऊक आहे.
शिधापत्रिकेच्या शेवटी लिहिलेलं कविवर्य कुसुमाग्रजांच्या ओळी अशा प्रसंगी मला नेहमी आठवतात.

गोरगरिबा छळू नका । पिंड फुकाचे गिळू नका।
गुणीजनांवर जळू नका।

Ⓒ Ⓐ  बाबुराव रामजी

बुधवार, २ मार्च, २०२२

चकवा

दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. मध्यरात्र होत आली तरीदेखील पावसाच्या वेगामध्ये जराही फरक पडलेला जाणवत नव्हता. रात्री अकरा वाजता त्याने नाशिक फाटा सोडला. आपल्या कारने त्याने नाशिकच्या दिशेने प्रवास चालू केला होता. बायको त्याला रात्रीचा प्रवास करू देत नसे. त्यातल्या त्यात एकट्याने तर मुळीच नाही. पण तिला न सांगताच त्याने गाडी नाशिकच्या दिशेने वळवली होती. प्रवास सुरू झाल्यानंतर पंधरा मिनिटांमध्ये तिचा त्याला फोन आला. तेव्हा तिला समजले की तो एकटाच नाशिककडे निघालेला आहे. रात्रीचा आणि पावसातला प्रवास असल्यामुळे ती अजूनच काळजीमध्ये पडली. पण पर्याय नव्हता. त्याला सकाळीच आठ वाजता नाशिकमध्ये एक मीटिंग होती. म्हणून आजच नाशिकमध्ये पोहोचणे गरजेचे होते. 

नाशिकला कॉलेज रोडच्या टोकाला असणाऱ्या वडिलोपार्जित जागेत तो राहत होता. आज त्या घरात दोघेच नवरा बायको राहत असत. मुलाला साताऱ्यात कुठल्यातरी बोर्डिंग स्कूलला घातले होते. कामाच्या निमित्ताने त्याच्या नेहमीच पुण्यामध्ये वाऱ्या असायच्या. जवळपास प्रत्येक वेळेस ती त्याच्यासोबत असायची. पण वडिलांच्या आजारपणामुळे या वेळेस तिला त्याच्यासोबत यायला जमले नाही. म्हणून ती काळजी करु लागली होती. मी पाच तासांमध्ये सुखरूप पोहोचेल, असा त्याने तिला शब्द दिला व फोन ठेवला. 

रस्त्यावर तशी फारशी गर्दी नव्हतीच. अधुन-मधुन एखादे वाहन नजरेस पडायचे. मागील एक वर्षापासून सर्वांचेच 'वर्क फ्रॉम होम' सुरू झाल्यानंतर ही वर्दळ कमीच झाली होती. शिवाय कोविडची दुसरी लाट कमी झाली होती पण प्रादुर्भाव अजूनही असल्याने लोक बाहेर पडायचे टाळत होते. तो मात्र बिनधास्त होता. ऑनलाईन मीटिंग करण्याऐवजी समोरासमोर प्रत्यक्ष बोलण्यामध्ये त्याला जास्त इंटरेस्ट वाटायचा. म्हणूनच आपल्या कामासाठी तो पाच-पाच तास देखील ड्रायव्हिंग करत होता.

गाडी चालवताना रेडिओवर किशोर-लताची गाणी त्याने लावलेली होती. दर प्रवासामध्ये तो रेडिओ ऐकत ड्रायविंग करायचा. पण जसजशी गाडी पुण्यापासून लांब जायला लागली तस-तशी रेडिओची रेंज देखील कमी झाली. नंतर फारच खरखर आवाज यायला लागला. मग त्याने रेडिओ बंद करून टाकला. 

आता गाडीमध्ये कशाचाही आवाज येत नव्हता. इंजिनचा संथपणे येणारा आवाज, गाडीवर पावसाचे पडणारे थेंब आणि वायफरची सातत्याने वाजणारी धून... हाच आवाज त्याच्या कानावर पडत होता. त्याने घड्याळामध्ये पाहिले...  बारा वाजून पंचवीस मिनिटे झाली होती. या ८५ मिनिटांमध्ये त्याने ८५ किलोमीटरचे अंतर पार केले होते. ज्या आळेफाट्यामध्ये सातत्याने रहदारी असते ते गाव शांतपणे झोपलेले त्याने बघितले. एखाद दुसरी गाडी रस्त्यावरून प्रवास करत होती. आळेफाटा संपला की रस्त्याची ट्राफिक कमी होते, हा त्याचा नेहमीचा अनुभव होता. रस्त्यावर ट्राफिक तर नव्हतीच. पण आता एखादी गाडी दिसणे देखील दुरापास्त झाले होते. पावसामुळे त्याला गाडीचा वेग देखील अधिक वाढवता येत नव्हता. झोपेची गुंगी चढायला लागली होती. अधिक विचार करणे हा झोपेच्या गुंगीवरचा त्याला उपाय वाटायचा. काही कटू, काही गोड आठवणी त्याला आठवायला लागल्या. 

मागच्याच आठवड्यामध्ये त्रंबकेश्वरला गेलो होतो तेव्हा बायकोने त्याची गंमत केली होती. त्याचं वजन मागच्या दोन वर्षांमध्ये ८५ किलोवर पोहोचले होतं. जेव्हा ८५ किलोच्या देहाचा हा पाय क्लचवर पडत असेल तेव्हा त्याला बिचार्‍याला काय वाटत असेल! असं ती गंमतीने म्हणाली होती. तेव्हापासून त्याने क्लचवर पाय दिला की, आपल्या ८५ किलो देहाची आठवण व्हायची. तसं पाहिलं तर दोघांचाही जन्म ८५ सालातलाच! पण तिचं वजन त्याच्या निम्म्या वजनाइतकच होतं. म्हणून आता त्याने वजन कमी करायचं मनावर घेतलं होतं. 

बायको नाशिकला वाट पाहत असेल, कदाचित ती जेवली देखील नसेल असं वाटल्यामुळे त्याच्या मनात चलबिचल झाली. रस्त्याच्या कडेला लावलेल्या मैलाचा दगड दिसून आला. नाशिक अजूनही ८५ किलोमीटर अंतरावर होतं. फार फार तर दोन तासांमध्ये घरी पोहोचू, असा अंदाज त्यांने बांधला. संगमनेर जवळ येत होतं. आता रस्त्याला दोन तीन गाड्या दिसायला देखील लागल्या. 


हिवरगाव पावसा टोलनाका जवळ आला होता. टोलगेटची अलिकडे लावलेली पाटी त्याला दिसली. दूरवरुन पावसात चमकणारे लाल दिवे टोलनाका जवळ आल्याचे दर्शवीत होते. त्याने वेग कमी केला. टोलनाक्याच्या प्रत्येक बूथमध्ये जवळपास एक गाडी तरी होतीच. त्याने कारच्या एका लेनमध्ये आपली गाडी घुसवली. पुढे जाईपर्यंत आधीची गाडी निघून गेली होती. त्याचा थेट नंबर लागला. बूथपाशी आल्यावर त्याने काच खाली घेतली. टोल जमा करणाऱ्याने बाहेर हात काढला व म्हणाला, 

"८५ रुपये द्या." 

मग त्याने शंभरची नोट काढली आणि टोल भरण्यासाठी दिली. 

"साहेब पुढच्या महिन्यापासून डबल टोल भरावा लागेल. फास्टटॅग लावून घ्या.", असं म्हणत त्याने सुट्टे पैसे दिले. पण ते घेत असताना 'मला मला माहित आहे... मला नको शिकवू!' असे काहीसे हावभाव त्याच्या चेहऱ्यावर होते. त्यांने मिळालेले सुट्टे पैसे शेजारच्या कप्प्यामध्ये ठेवले. कप्पा बंद केला व गाडी सुरु केली. 

टोलनाका ओलांडून पुढे आल्यावर परत पावसाचे थेंब गाडीवर वेगाने पडायला लागले. वायपर पुन्हा सुरू झाला आणि गाडी नाशिकच्या दिशेने प्रवास करू लागली. झोपेची गुंगी वाढत असल्याने डोकं गरगरायला लागलं होतं. पण लवकरात लवकर घरी पोहोचण्याचे उद्दीष्ट लक्षात ठेवून तो वेगाने गाडी चालवायला लागला. विचारचक्र थांबलेले होतं. त्याची नजर आता फक्त समोरच्या रस्त्यावर होती. रस्त्यावर पडणारे पावसाचे थेंब हेडलाईटमुळे चमकत होते. त्यातच तो गुंतून गेला आणि समोर पुन्हा टोल नाक्याचे गेट दिसायला लागले. हा टोलनाका नक्की कुठला? असा प्रश्न त्याला पडला. तो गोंधळून गेला. आत्ताच तर टोल दिला ना, मग परत टोलनाका कसा आला? उत्तर मात्र सापडले नाही. 

त्याने गाडीचा वेग कमी केला आणि डावीकडून दुसऱ्या बूथमध्ये गाडी नेली. समोरची गाडी निघून गेली होती. आता याचाच थेट नंबर लागला. गाडी थांबली व खिडकीची काच त्याने खाली घेतली. टोल बूथवरील कर्मचाऱ्यांने हात बाहेर काढला आणि सांगितले, 

"साहेब ८५ रुपये द्या." 

तो अजूनही गोंधळलेला होता. त्याने शेजारचा कप्पा उघडला. पण त्यामध्ये मगाशी दिलेले सुट्टे पैसे व टोलची पावती देखील नव्हती! हा त्याच्यासाठी एक धक्का होता. त्याने शंभरची नोट काढली व टोल भरण्यासाठी दिली. पावती काढत असताना टोल कर्मचाऱ्याने त्याला सांगितले, 

"साहेब फास्ट टॅग लावून घ्या, पुढच्या महिन्यापासून टोल डबल होणार आहे!" 

तो फक्त ऐकत होता. यावेळेस त्याच्या मनातले हावभाव मात्र निराळेच होते. त्याने गुपचूप सुट्टे पैसे घेतले. टोलची पावती घेतली आणि शेजारच्या कप्प्यामध्ये ठेवली. गाडी सुरु झाली आणि परत पावसाचे थेंब गाडीवर वेगाने आदळू लागले. 

तो काहीसं सुन्न झाल्यासारखा गाडी चालवू लागला. दुभाजकाच्या पलीकडून एखाद दुसरी गाडी विरुद्ध दिशेने जात होती. त्याचा प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला की त्याला आपणच गाडी चालवत असल्याची जाणीव व्हायची. रस्त्याकडे एकटक बघत तो गाडी चालवत होता. दोनच मिनिटात पुन्हा टोलनाक्याचे गेट समोर दिसायला लागले. तोच पावसामध्ये दिसणारा लाल रंगाचा दिवा पुन्हा चमकू लागला. प्रत्येक टोल बूथवर जवळपास एक गाडी उभी होती. त्याच्या काळजात धस्स झाले. यापूर्वी दोन वेळा टोल दिला होता. तरीदेखील परत तिसऱ्यांदा टोल नाका आला! त्याचा गाडीचा वेग अचानक मंदावला. तो आजूबाजूला पाहू लागला. हा तोच टोलनाका होता जिथे त्याने यापूर्वी दोनदा टोल दिला होता. परत त्याने गाडी डावीकडून दुसऱ्या टोलबुथमधे नेली. समोरची गाडी निघून गेली आणि पुन्हा याचा नंबर लागला. एव्हाना एक्सलेटरवर असणारा त्याचा पाय काहीसा थरथरू लागला होता. नक्की चाललंय काय? या प्रश्नाचे उत्तर त्याला मिळत नव्हते. टोलबुथपाशी गाडी थांबली व त्याने काच खाली घेतली. पुन्हा तोच टोलनाक्यावरचा कर्मचारी त्याच्याकडे बघत होता. त्याने हात बाहेर काढला आणि बोलला. 

"साहेब ८५ रुपये द्या." 

हा मात्र सुन्न होऊन त्या कर्मचाऱ्याकडे बघत होता. नकळतपणे त्याने खिशातून शंभर रुपये काढले व टोलसाठी दिले. टोल कर्मचाऱ्याने संगणकामध्ये एन्ट्री केली आणि पावती फाडून ह्याच्याकडे दिली व म्हणाला, 

"साहेब पुढच्या महिन्यापासून टोल डबल होणार आहे, फास्ट टॅग लावून घ्या." 

पुन्हा तीच वाक्ये त्याच्या कानावर आदळत होती. मेंदू बधिर व्हायला लागला होता. तो एकटक समोरच्या रस्त्याकडे बघत होता. तेवढ्यात त्याच्या मागून आलेल्या गाडीने जोरदार हॉर्न वाजवला. तो भानावर आला व त्याने गाडी चालू केली. 

पाऊस अजूनही त्याच वेगाने बरसत होता. गाडीवर पडणाऱ्या थेंबांची तीव्रता देखील तीच होती. रस्ते देखील त्याच वेगाने पाण्याचे प्रवाह बाहेर फेकत होते आणि तो मात्र सुन्नपणे गाडी चालवत होता. असंच चालू राहिलं तर तो नाशिकला कधी पोहोचणार? प्रश्न विचित्र होता आणि उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हतं. तो एखादं स्वप्न तर पाहत नाही ना, याची खात्री देखील त्याने स्वतःला चिमटा घेऊन केली. पण अजूनही तो वास्तवातील जगातच वावरत होता. मात्र परिस्थिती त्याला वास्तवापासून दूर नेणार होती. यातून बाहेर पडायचं असं एकच उद्दिष्ट मनात ठेवून त्याने गाडीचा वेग वाढवला एक्सलेटरवरचा पाय त्याने मागेच घेतला नाही. गाडी वेगाने पावसातील तो रस्ता तुडवत पुढे जाऊ लागली. तिचा वेग वाढत होता आणि स्पीडोमीटरचा काटा ८० आणि ९० च्या बरोबर मधे येऊन थांबलेला होता. ही गाडीच्या वेगाची सर्वोच्च मर्यादा होती! कदाचित गाडीला ती मर्यादा ओलांडायची नव्हती! पावसाचे थेंब वेगाने समोरच्या काचेवर आदळत होते आणि त्याची गाडी ८५ च्या वेगाने पावसाचे थेंब अंगावर झेलत त्या रस्त्यावरून प्रवास करत होती. 

अन्यत्र दिसणाऱ्या गाड्या आता मात्र लुप्त झाल्या होत्या. तो थरथरत्या हाताने स्टेरिंग पकडून बसलेला होता. पायांची देखील वेगळी स्थिती नव्हती. मन बधीर झालं होतं. या चक्रातून त्याला बाहेर पडायचं होतं. परंतु कदाचित नियतीला ही गोष्ट मान्य नव्हती. रस्त्यावर आलेल्या एका अडथळ्याला गाडी जोरदार धडकली व दोन तीन गिरके घेत खाली पडली. भयंकर मोठा आवाज झाला. त्याचे शरीर बधीर झाले होते आणि मेंदू सुन्न... हळू हळू मेंदूवरील गुंगी वाढत गेली आणि त्याला काहीच कळेनासं झालं. तो शुद्धीतून बाहेर आला तेव्हा एका गादीवर सरळ झोपलेला होता. पापण्या उघडायला देखील त्याला बरेच कष्ट पडले. अगदी ताठ स्थिती मध्येच त्या गादीवर तो पडलेला होता. त्याचं शरीर अवघडलेल्या स्थितीमध्ये होतं. कदाचित तो याच स्थितीमध्ये बरेच दिवस पडलेला असावा, असं त्याला जाणवत होतं. डाव्या बाजूने व मागच्या बाजूला अर्थात डोक्याच्या बाजूला त्याला कुठल्याश्या मशीनमधून बीप-बीप असा आवाज येत होता. असा आवाज त्याने यापूर्वी हॉस्पिटलमध्ये ऐकलेला वाटला. मान अवघडल्यासारखी झाली होती. तरीही त्यांने मान वळवून उजव्या बाजूला पाहिले. 

एका लोखंडी खांबाला पॅड अडकवलेले होते. त्यावर गिचमिड्या अक्षरांमध्ये बरंच काही लिहिलेलं त्याला दिसलं. त्याच्या वरच्या बाजूला लिहिलेलं होतं... दिवस ८५ वा! त्याच्याच खालच्या बाजूस एका हॉस्पिटलचे नाव लिहिलेलं होतं. म्हणजेच तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता तर! काही प्रश्नांची उत्तरं त्याला मिळायला लागली. तब्बल ८५ दिवस तो या हॉस्पिटलमध्ये असाच पडलेला होता! मग त्याने मान वरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला. मघापासून येणारा बीपचा आवाज त्याला त्रासदायक वाटायला लागला होता. मागे लावलेली मशीन्स त्याला नीटशी दिसत नव्हती. तरीही अंग थोडसं उचलून त्याने वरच्या दिशेने मागे बघितले. एका मशीनवर डिस्प्ले स्क्रीनवर त्याच्या हृदयाचे ठोके दिसत होते आणि आकडा होता... ८५!

मंगळवार, १ मार्च, २०२२

नावाची गंमत

आतमध्ये खेळायला जाण्यासाठी गेटवर मुलांच्या नावाची 'एंट्री' करायची होती. त्यादिवशी प्रवेशद्वारावर बरीच गर्दी झालेली होती. थोड्याच वेळात आमचा नंबर आला. मी माझ्या मुलीचे नाव सांगितले... ज्ञानेश्वरी. नाव लिहीणाऱ्या त्या मुलीने पेन उचलला आणि लिहायला लागली. इंग्रजीमध्ये लिहायचा अट्टाहास असल्यामुळे तिला काही स्पेलिंग सुचेना. दोन-तीन सेकंद विचार करून तिने पुन्हा माझ्याकडे बघितले आणि विचारले, "स्पेलिंग सांगा..."



मी स्पेलिंग सांगायला सुरुवात केली, "dnya...."
यावर तिने मला मधेच थांबत विचारले, "d वरून सुरू होते का स्पेलिंग?"
मी स्मितहास्य करतच उत्तरलो, "हो".
तिला पूर्ण स्पेलिंग सांगितले. तरीही काही समजले नाही. मग मीच पेन हातात घेतला आणि त्या कागदावर स्पेलिंग लिहून काढले... Dnyaneshwary.
तिने मी लिहिलेले नाव बघितले आणि म्हणाली, "अच्छा! धनेश्वरी नाव आहे काय!"
यावर मला हसू आवरेना. 'ज्ञ' अक्षराला मराठी मध्ये काय स्पेलिंग असतं, हे अजूनही बऱ्याच जणांना माहित नाही. त्यातीलच एक हे उदाहरण होतं. माझ्या मुलीच्या नावाच्या स्पेलिंग मध्ये बारा अक्षरे येतात. त्यामुळे इंग्रजीतलं हे नाव बरेच मोठे होतं. अर्थात यामुळे ते लिहायलाही अडचण होत असते. पण, त्यामुळे आपण नाव तर बदलू नाही शकत!
आम्ही आमच्या ज्ञानेश्वरीला घरी नावाने 'ज्ञानू' म्हणतो. शेजारची एक मुलगी नुकतीच तिची मैत्रीण झाली होती आणि त्यानंतर काही दिवसातच ज्ञानेश्वरीचा वाढदिवस आला. त्यादिवशी शेजारच्या तिच्या मैत्रिणीने तिला गिफ्ट आणून दिले. अर्थात इंटरनॅशनल इंग्रजी शाळेमध्ये ती शिकत असल्यामुळे तिने त्या गिफ्टवर इंग्रजीतच लिहिले होते,
"Dear Nano!"
ते वाचून आम्ही टाटांच्या एका गाडीलाच जन्म दिला आहे की काय, असं वाटून गेलं!

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

पुस्तक चाळणारा मी!

ट्रेन यायला अजून बराच अवकाश होता. किंबहुना नेहमीच्या अनुभवाप्रमाणे ही ट्रेन दर दिवशी अर्ध्या तासाने का होईना उशिरा येत असते. मोबाईल ॲप्लिकेशन उघडून त्यामध्ये ट्रेनचा माग काढण्याचा प्रयत्न केला. त्यातच ती चाळीस मिनिटे उशिरा येणार असल्याचे दिसत होते. मग स्टेशनवर येरझाऱ्या घालण्यापेक्षा शांतपणे शेजारी ठेवलेल्या बाकड्यावर जाऊन बसलो. सात-आठ जण तरी बसतील असा लांब बाकडा तिथे ठेवलेला होता. माझ्या आधी तीन-चार लोक तिथे सामान खाली ठेवून बसले होते. कदाचित ते सुद्धा याच ट्रेनची वाट बघत असावेत. मी देखील सामान खाली ठेवले आणि बाकड्यावर ठाण मांडून बसलो. 

माझ्या शेजारी एक चार-पाच वर्षांची मुलगी ट्रेन प्लॅटफॉर्मवरील ती गर्दी न्याहाळत बसलेली होती. तिच्या पलीकडचे चार-पाच जण मान खाली करून मोबाईलमध्ये तोंड घालून बसलेले दिसले. अर्ध्या तासामध्ये किमान तीन-चार तरी कथा वाचून होतील, असा विचार करून मी बॅगेतून एक कथासंग्रह काढला आणि वाचायला लागलो. दोन मिनिटे अशीच गेली असतील. शेजारची मुलगी थोडा वेळ माझ्याकडे टक लावून बघत असल्यासारखी वाटली. मी तिच्याकडे सहज ओझरती नजर टाकली. त्यावर तिने स्मितहास्य केले व विचारले, 

'काका तुमची कोणती परीक्षा आहे का?' 

मला तिच्या या प्रश्नाची हसू आले आणि मी म्हणालो, 

'नाही ग...  पण असं का विचारतेस?' 

यावर ती उत्तरली, 'मग तुम्ही पुस्तक का वाचत बसला आहात?' 

तिचा तो प्रश्न खरोखर विचार करण्याजोगा होता. आज-काल वाचण्यापेक्षा मोबाईल मध्ये डोकं घालून बोटं फिरवत बसणं, हा आज रिकाम्या वेळेत करण्यात येणारा सर्वात मोठा उद्योग आहे. त्या मुलीच्या शेजारचे सर्वजण मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसलेले होते. मी मात्र त्या स्थितीत नव्हतो. शिवाय आजकाल परीक्षा असल्याशिवाय कोणी पुस्तक उघडत नाही, हे तिचं निरीक्षण देखील योग्यच होतं. वाचन संस्कृती कोणत्या दिशेने चालली आहे? या प्रश्नाचे उत्तर मात्र मी मनातल्या मनात मलाच दिले. पण मला त्या मुलीला उत्तर देणे भाग होते. 

मी म्हणालो, 'बाळा, हे पुस्तकच माझा मोबाईल आहे आणि मी त्याला मोबाईल समजूनच चाळत असतो. यातूनच मला नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळतात.' यावर तिने फक्त स्मितहास्य केले.  


 

सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

ती परत आलीये...

कामावरून यायला त्याला आज तसा उशीर झाला होता. रात्रीचे साडेनऊ वाजून गेले होते. त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये तो झपाझप पावले टाकत पुढे चाललेला होता. आजची हवा त्याला काही निराळीच वाटत होती. हवेत गारवा बोचणारा जाणवू लागला होता. गावात प्रवेश करण्यापूर्वी असणारी ती पडकी विहीर जवळ आली. तिथे आज काहीतरी विचित्र भासत होतं. दहा वर्षांपूर्वी अखेरचा अनुभवलेला तो गंध त्याला पुसटसा जाणवू लागला होता. विहिरीजवळ आल्यावर त्याने काठावरील पिंपळाच्या झाडाच्या खोडाकडे सहजच वळून पाहिले. दहा वर्षांपूर्वी पाहिलेली ती आकृती आता गडद व्हायला लागली होती. तो गंध आणि त्या आकृतीचा संगम त्याला त्या कटू आठवणींच्या विश्वात पुन्हा घेऊन गेला. त्याचं अंग शहारू लागलं. एवढ्या थंडीतही घाम यायला लागला होता. ही गोष्ट एकदम अचानक निश्चितच झाली नव्हती. मागच्या आठवडाभरापासून त्याला चाहूल लागायला लागली होती. मेंदू बधिर व्हायला लागला होता. विहिरीतले पाणी एव्हाना तळ गाठू लागलं होतं आणि विहीर कधीही कोरडी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. आजूबाजूचं वातावरण भयावह होताना वाटत होतं. ती नीरव शांतता त्याला खाऊ की गिळू या नजरेने पाहताना वाटत होती. पूर्वीच्या त्या आठवणींनी त्याच्या अंगावर शहारा आला आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे त्याला कळून चुकले होते की,

ती परत आलीये... 



रातराणीचे रहस्य

महाराष्ट्रातील रहस्यकथाकारांच्या परंपरेत गुरुनाथ नाईक हे एक अग्रणी आणि अत्यंत लोकप्रिय नाव आहे. ७०, ८० आणि ९० च्या दशकात त्यांनी रहस्यकथा वा...