बुधवार, २० मार्च, २०२४

कोथिंबीर

दुपारची वामकुक्षी त्यादिवशी फारच काळ लांबली. झोपेतून जाग आली तेव्हा घड्याळामध्ये पाहिले, संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. घड्याळातल्या त्या काट्यांमुळेच खाडकन डोळे उघडले. सकाळी बाहेर जाताना यांनी बजावून सांगितले होते संध्याकाळी कोथिंबिरीच्या वड्या करायच्या आहेत बरं का. मी देखील त्यांना निश्चितपणे ‘नक्की नक्की’ म्हणून सांगितले होते. पण कोथिंबीर तर संपली होती. संध्याकाळच्या बाजारातून ती आणावी असा विचार करूनच दुपारच्या झोपेच्या स्वाधीन झाले होते.
बाजार सुरू होऊन बराच वेळ झाला होता. लवकरात लवकर चांगली कोथिंबीरची जुडी मिळावी म्हणून पटकन आवरती झाले. बाजाराची पिशवी घेऊन पायऱ्या उतरायला लागले. गुरुवारच्या या बाजारात तशी बऱ्यापैकी गर्दी असते. शिवाय भाज्या देखील ताज्या मिळतात. म्हणून हा बाजार सहसा मी कधी चुकवत नाही. एक शेतकरी बाई दर आठवड्याला कोथिंबिरीच्या ताज्या जुड्या घेऊन येत असते. आजही ती आली असावी, असा कयास मी बांधला. तिची नेहमीची जागा ठरलेली होती. बाजाराच्या दिशेने चालू लागल्यावर मी त्याच दिशेने टक लावून पाहत होते. जवळ पोहोचले तेव्हा ती बाई अजूनही तिथे भाज्या विकताना दिसली. त्यामुळे जीव भांड्यात पडला. झपझप पावले टाकत तिच्यापर्यंत आले. एव्हाना बाजारात अन्यत्र बऱ्यापैकी गर्दी झालेली होती. आणि सगळीकडे नुसता गोंगाट चालू झालेला होता. भाजीवालीजवळ पोहोचले तेव्हा तिच्यासमोरील कोथिंबिरीच्या सर्व जुड्या संपलेल्या दिसल्या. त्यामुळे निराशेची एक लकीर माझ्या चेहऱ्यावर नकळतपणे उमटली असावी. भाजीवालीच्या समोर हातात कोथिंबीरची जुडी घेतलेली एक वृद्ध आजी उभी असलेली दिसली. नऊवारी साडी, डोक्यावर ठळक-कुंकू, सावळ्यापेक्षा अधिक गडद रंग आणि उभा व केविलवाना चेहरा अशा अवतारात ती भाजीवालीशी बोलत होती.
“बारा रुपयांना द्या की हो ताई….. शेवटचीच जुडी तर आहे.”,ती गयावया करत भाजीवालीशी हुज्जत घालत होती.
“अहो आजी…. सगळ्याच जुड्या मघापासून वीस रुपयांना विकलेल्या आहेत. त्याच्यापेक्षा एक रुपयादेखील कमी होणार नाही”, भाजीवाली आपल्या बोलण्याची आणि किमतीशी ठाम होती.
“जाऊ द्या अर्धी जुडी तर द्या.”
“नाही ओ आज्जी, पूर्ण घ्यायची तर घ्या नाहीतर राहू द्या इथेच.”
भाजीवालीच्या या बोलण्याने ती काय समजायचे ते समजून गेली. बारा रुपयांचीच नाणी तिच्याकडे शिल्लक होती. त्यात तिला कोथिंबिरीची ती जुडी घ्यायचीच होती. पण भाजीवाली काय सोडायला तयार नव्हती. मी त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. त्यांचं संभाषण पूर्ण होण्याची वाट पाहत होते. कदाचित त्याचा निकाल सकारात्मकदृष्ट्या माझ्या बाजूने लागेल की काय, अशी आशा मला लागलेली होती. कोथिंबीरीची ती शेवटची जुडी अजूनही त्या आजीच्याच हातामध्ये होती.
“घ्यायची नसेल तर खाली ठेवा…”, भाजीवालीने आजींना सांगितले. एवढी हुज्जत घालून देखील तिचा नाईलाज होता. बऱ्याच निराशेने तिने ती जुडी भाजीवाली समोर ठेवून दिली. आणि तशीच उभी राहिली. तिने जुडी खाली ठेवता क्षणीच मी ती उचलून घेतली आणि विचारले,
“कशी दिली?”
“वीस रुपये”, भाजीवालीचे तात्काळ उत्तर आले.
अगदी दोन-तीन तासांपूर्वीच शेतातून काढलेली ती ताजी जुडी होती. तिच्यासाठी २० रुपये देणे म्हणजे माझ्या करता काहीच नव्हते. मी तात्काळ वीस रुपये काढले आणि भाजीवालीला देऊन टाकले. जुडी घेतली आणि पिशवीत ठेवली. ही सर्व करत असताना ती आजी तिथेच उभी होती. तिची नजर अजूनही कोथिंबीरच्या त्या जुडीवरच होती. एका केविलवाण्या नजरेने ती माझ्याकडे देखील बघताना मला वाटले.
कोथिंबीरची ताजी जुडी मिळाल्याचे समाधान मला होतेच, पण त्याच जुडीसाठी भाजीवालीशी हुज्जत घालणाऱ्या आज्जीशी मला कीव देखील वाटली. मी परतीचा रस्ता धरला. चालत असताना ती आजी माझ्याकडेच मागून बघत आहे की काय असे अचानक वाटून गेले. थोडं पुढं आल्यावर सहजच म्हणून मागे वळून पाहिले. आजीने भाजीवालीचा नाद सोडला होता आणि ती माझ्यात दिशेने हळूहळू पुढे येताना दिसली.
‘विचित्रच आहे…’, असं मनाशीच बोलून मी घराच्या दिशेने चालू लागले.
पाच मिनिटांनी इमारतीच्या गेटमधून आत मध्ये आले. तेव्हा देखील ती आजी माझ्याच मागे मागे येताना दिसली. मी आत आल्यावर सुरक्षारक्षकाने गेट लावून घेतले. मी लिफ्टपाशी पोहोचले तोवर ती गेटपाशी आलेली नव्हती. लिफ्ट आली आणि मी सातव्या मजलाचे बटन दाबले. घरामध्ये पोहोचेपर्यंत जवळपास सात वाजायला आले होते. किल्लीने दार उघडले आणि आतमध्ये आले तेव्हा कुठे हायसे वाटले.
बेडरूमच्या खिडकीतून इमारतीचे मुख्य गेट दिसते. मगाशी माझा पाठलाग करणारी ती आजी आता कुठे आहे, याची मला देखील उत्सुकता लागली होती. पटकन बेडरूम मध्ये गेले आणि खिडकीतून मेनगेट कडे कटाक्ष टाकला. ती आजी आमच्या सुरक्षारक्षकाची काहीतरी हुज्जत घालताना दिसत होती. त्याच्या हातवाऱ्यांवरून तो तिला इथून निघून जायला सांगत होता. पण मघाशी पाहिलेला तिचा तो केविलवाना चेहरा अजूनही तसाच दिसून आला. एका कोथिंबीरीच्या जुडीसाठी ती माझ्या मागोमाग का आली असावी? खरोखर गहन प्रश्न होता. तिच्याशी बोलायला हवे होते का? याचे उत्तर मी शोधण्याचा प्रयत्न केला. पण नंतर सोडून दिले. असतात अशी विक्षिप्त माणसे या जगात, म्हणून मीच माझी समजूत घातली.
बरोबर सातच्या सुमारास घराची बेल वाजली. आमची स्वयंपाकिन सुमन दारात उभी होती. तिला सकाळीच आज संध्याकाळी कोथिंबीरची वडी करायची आहे, असे बजावून सांगितले होते. त्यामुळे आल्याआल्याच तिने विचारले,
“आणली का कोथिंबीर मावशी?”
“हो बाई…. मोठ्या मुश्किलीने मिळाली आज!”, मी आनंदाने उतरले.
“कुठं आहे?”, तिने विचारले.
“ती बघ…. किचनच्या ओट्यावर पिशवी ठेवली आहे.”
सुमनला किचनच्या ओट्यावर भाजीची ती पांढरी पिशवी दिसली. तिने पिशवी उघडून पाहिली आणि म्हणाली,
“मावशी…. यात तर काहीच नाहीये!”.
“अगं नीट बघ… आपल्या नेहमीच्या पिशवीमध्ये आहे.”
“तीच तर पिशवी पाहते आहे… काहीच नाहीये त्याच्यात!”
मला आश्चर्याचा धक्का बसला. मी किचनमध्ये आले आणि पिशवी हातात घेतली. खरोखर त्या पिशवीमध्ये काहीच नव्हते. अगदी कोणती भाजी ठेवली होती की नाही, याचे निशाण देखील नव्हते.
ती रिकामी पिशवी पाहून काळजात धस्स झाले. कदाचित एखादा ठोका चुकला असावा.
मी झपाझप पावले टाकत बेडरूमच्या खिडकीपाशी पोहोचले. खिडकी उघडून पुन्हा मेन गेटकडे बघितले. ती आजी तिथे नव्हती. सुरक्षा रक्षक शांतपणे आपल्या खुर्चीवर बसला होता… मोबाईल बघत.

- बाबुराव रामजी





सोमवार, ५ डिसेंबर, २०२२

हिरवी नंबर प्लेट

"आमच्या येथे नंबर प्लेट्सची कामे केली जातील." असा दुकानावरचा फलक पाहून तो थोडासा हसला. त्याने आपली गाडी पार्क केली आणि तो आत मध्ये घुसला. दुकान मालकाने त्याला पाहताच तात्काळ विचारले, 

"बोला." 

"गाडीची नंबर प्लेट बदलून घ्यायची होती." - तो. 

हे ऐकताच दुकान मालकाने समोरच्या भिंतीवर लावलेली नंबर प्लेटची निरनिराळी डिझाईन्स त्याला दाखवत विचारले, 

"यातील कोणत्या प्रकारची डिझाईन तुम्हाला पाहिजे?"

त्याने त्या सर्व डिझाईन्सवर एकदा नजर टाकली. पण हवे ते डिझाईन त्याला मिळाले नाही. मग तो बोलू पुढे लागला, 

"असं कुठलच डिझाईन नको आहे. मला गाडीची नंबर प्लेट हिरव्या रंगाची करायचीय." 

"तुमची गाडी इलेक्ट्रिक आहे का?", दुकान मालकाच्या या प्रश्नावर त्याने नकारार्थी मान डोलवली. 

"नाही हो आपली पेट्रोल गाडी आहे. पण माझ्या गाडीला हिरव्या रंगाची नंबर प्लेट खूप सुंदर दिसेल. ती बघा माझी गाडी तिथे बाहेर लावली आहे आणि तिच्यावर पोपटी हिरव्या रंगाचे वेगवेगळे पट्टे पण मी मारलेत! त्याला शोभणारी नंबर प्लेट पाहिजे. आजकाल बऱ्याच हिरव्या नंबर प्लेट मी पाहिल्यात. किती सुंदर दिसतात ना!" 

त्याच्या या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे दुकानदाराला समजले नाही. तो इतकेच म्हणायला,

"आम्हाला नाही बनवता येणार. कारण हिरवी सोडून आम्ही सगळ्या रंगाची नंबरप्लेट बनवतो!" 



शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

मुळे गुरुजी स्कूल

यंदाच्या दिवाळीत गावी गेल्यानंतरही बराच निवांत होतो. दिवाळी संपवून एक आठवडा झाला. पण मी माझी सुट्टी वाढवून घेतली होती. अशाच एका सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे राऊत काकांसोबत मॉर्निंग वॉकला हमरस्त्याने निघालो होतो. थोड्याच वेळामध्ये आमच्या शेजारून एक पिवळ्या रंगाची स्कूलबस वेगाने धुरळा उडवत गेली. मी सहजच त्यावरील नाव बघितले, 'मुळे गुरुजी इंटरनॅशनल स्कूल'.

मुळे गुरुजी नाव ऐकल्यावर थोडासा चमकलोच. या नावाची शाळा आपल्या परिसरामध्ये आहे, हे पहिल्यांदाच पाहण्यात आलं. त्यामुळे राऊत काकांना मी उत्सुकतेने विचारले,
"काका, ही मुळे गुरुजी इंटरनॅशनल स्कूल कुठे आहे?"
"आपल्या शेजारच्याच गावात.", ते उत्तरले.
"म्हणजे मुळे गुरुजींच्याच गावामध्ये?"
"हो, त्यांच्याच मुलाने त्याच्या काही इतर सहकाऱ्यांच्या मदतीने चालू केली आहे. तीन-चार वर्षे झाली या गोष्टीला."
मला काहीसे आश्चर्य वाटले. मुळे गुरुजींचा मुलगा अगदी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसारखा होता. माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी वयाने मोठा असावा. गुरुजींच्या बुद्धिमत्तेची झलक त्यांच्या मुलाच्या वागण्यामध्ये बिलकुल दिसत नसे. त्याने ही इंग्रजी इंटरनॅशनल शाळा काढल्याचे त्यामुळेच मला आश्चर्य वाटले. मी भूतकाळात हरवलो.
मुळे गुरुजी म्हणजे आमच्या आजूबाजूच्या गावांमधील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. मराठी भाषेचे गाढे अभ्यासक आणि प्रचारक. आज माझं माझ्या भाषेवर जे प्रभुत्व आहे ते केवळ त्यांच्यामुळेच. केवळ मीच नाही तर आमच्या बरोबरच्या अनेक पिढ्या मुळे गुरुजींनी घडविल्या. परिसरातील विद्यार्थ्यांचे भाषाशुद्धी करण्याचं सर्वात मोठे श्रेय त्यांनाच. ते मराठी भाषेचे विद्यावाचस्पतीच होते जणू! आमच्या सर्वांच्या तोंडून 'मपलं-तुपलं' ची भाषा काढून काढून 'माझं-तुझं' त्यांनी रूळवलं. भाषेचे अलंकार आम्हाला शिकवले. कोणता शब्द कुठे कसा वापरायचा? हे त्यांच्यामुळेच आम्हाला समजलं. आज कुणाशी बोलताना वाक्प्रचार आणि म्हणीचा वापर आम्ही करतो तोही मुळे गुरुजींच्या शिक्षणाचीच देणगी आहे. आमची आजी देखील कोणाला पत्र पाठवायचं असल्यास मी ते पत्र लिहिल्यानंतर सर्वप्रथम मुळे गुरुजींना दाखवून आणायला लावायची. केवळ तीचाच नाही तर गावातील जवळपास सर्वच कुटुंबांचा मुळे गुरुजींवर व त्यांच्या भाषेवर अतिशय दृढ विश्वास होता. मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, ही त्यांची मनोमन इच्छा होती. एखादी नवी भाषा शिकायची असल्यास आधी आपल्याला आपल्या मातृभाषेवर प्रभुत्व असायला हवे, हा विचार त्यांच्यामुळेच माझ्यामध्ये रुजला. आजही माझे इंग्रजीवर जे प्रभुत्व आहे ते केवळ याच मातृभाषेतील शिक्षणामुळे. आजही अनेकदा बालपणाच्या गप्पा होतात तेव्हा मुळे गुरुजींचा विषय निघत नाही, असं कधीच होत नाही. एक आदर्श भाषा शिक्षक कसा असावा? याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून मुळे गुरुजी ओळखले जात असत.
पण आज पाहिलेल्या त्या पिवळ्या बसवरील 'मुळे गुरुजी इंटरनॅशनल स्कूल' या नावाने मला अतिशय वाईट वाटून गेले. मराठी भाषेच्या वाचस्पतीच्या मुलानेच एखादी भरपूर पैसे कमावणारी इंग्रजी शाळा काढावी व शिक्षणाचा व्यवसाय करावा, हीच गोष्ट मला रुचली नाही. त्यादिवशी दिवसभर मी हाच विचार करत होतो.
व्यक्तींचे विचार चांगले असतात. परंतु विचारांचा वारसा जपला पाहिजे आणि हा वारसा पुढच्या पिढींपर्यंत नेला पाहिजे. विचार जपणारेच खरे वारसदार होय बाकी रक्ताची नाती फक्त नावाचा वापर करतात. हा धडा त्यादिवशी कायमस्वरूपी माझ्या मनामध्ये कोरला गेला. अजूनही असं वाटतंय की, मुळे गुरुजींच्या नावाने मराठीसाठी काहीतरी भरीव व्यासपीठ तयार करून द्यावं!



रविवार, २० नोव्हेंबर, २०२२

मॉन्टेसरी स्कुलमधील एक दिवस!

आमच्या एका सख्या मित्राची मुलगी जवळच्या मॉन्टेसरी स्कूलमध्ये छोटा शिशु अर्थात "ज्युनिअर केजी"मध्ये शिकते. तो तिला रोज दुपारी साडेबारा वाजता नियमितपणे आणायला येत असतो. अर्थात वर्क फ्रॉम होम असल्यामुळेच! एक दिवशी त्याला यायला जमणार नव्हतं. म्हणून त्याने मला फोन करून तिला शाळेतून घरी न्यायला सांगितलं. ही शाळा माझ्या घरापासून जेमतेम अर्धा किलोमीटरवर आहे. त्यामुळे मी लगेचच तयार झालो. 

दुपारी बरोबर बारा वाजून २५ मिनिटांनी मी शाळेच्या प्रवेशद्वारावर हजर होतो. माझ्यासारखे अन्य बरेच जण आपल्या मुलांना घेण्यासाठी त्या प्रवेशद्वाराभोवती गर्दी करून उभे होते. मी देखील त्याच गर्दीमध्ये सामील झालो. पाच मिनिटांनी शाळा सुटणार होती. आतमध्ये मुलांची चुळबूळ चालू असल्याचे जाणवले. पलीकडेच एका कोपऱ्यामध्ये एका पालकांचे शिक्षकांशी तावातावाने संभाषण चालू असल्याचे मला दिसले. आपल्या पाल्याच्या अर्थात मुलाच्या प्रगतीवरून सदर पालक शिक्षकांना झापत होता. 

"हे बघा मॅडम माझ्या मुलीला बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकवलेल्या नाहीयेत.", असं सांगताना त्या पालकांचा सूर अतिशय रागावलेला दिसत होता. 

"पण काही गोष्टी तुम्ही देखील घरी घ्यायला हव्यात, असे आम्हाला वाटतं.", शिक्षकांनी समजावण्याचा प्रयत्न केला. 

"मग तुम्हाला आम्ही फी कशासाठी देतोय? माझ्या मुलाला सर्व काही यायलाच हवं. जर ते त्यालाही आलं नाही तर उरलेली फी मी देणार नाही!" 

त्यांचं संभाषण ऐकून मला धक्काच बसला. ज्युनिअर केजीमध्ये शिकणाऱ्या आपल्या मुलाला सर्व काही आले पाहिजे. त्यासाठी पाहिजे तेवढी फी मी द्यायला तयार आहे. हा दृष्टिकोन वाचून ऐकून मी हादरूनच गेलो! शिवाय जुन्या काळात मी अनुभवलेलं शिक्षक-पालक संभाषण आणि आत्ताचं शिक्षक-पालक संभाषण यामध्ये जमीन-आसमानापेक्षा अधिक फरक जाणवत होता. पालकांच्या आपल्या मुलाकडून आणि शिक्षकाकडून किती भयावह अपेक्षा आहेत, याची प्रचिती त्यादिवशी आली. प्रत्येकाला आपल्या मुलाने स्पर्धेत पहिले आले पाहिजे, असं वाटू लागलय. त्यासाठी पाहिजे तेवढे पैसे मोजायला आम्ही तयार आहोत, ही त्यांची भावना झाली आहे. अशा अभूतपूर्व पेचप्रसंगातून आपण पुढच्या पिढ्या कशा घडवणार आहोत? हा अतिशय मोठा प्रश्न आहे.



शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०२२

नेहमीच कुत्रं

सकाळी सातच्या सुमारास म्हणजे जेव्हा गाड्यांविना रस्ते रिकामे असतात त्या काळात रस्त्यांवर रिकामटेकड्या कुत्र्यांचं साम्राज्य असतं. एखादी चार चाकी गाडी दिसली की त्याच्यामागे काही मीटर अंतरापर्यंत भुंकत जायचं आणि जणू काही मीच गाडी पळवून लावली आहे, या अविर्भावात परत मागे फिरायचं. असा रस्त्यावरील अनेक कुत्र्यांचा उद्योग असतो!

माझ्या ऑफिसची वेळ बदलल्यामुळे सकाळी सात वाजताच मला घरून निघावे लागत असे. त्यामुळे रस्त्यावर ट्राफिक लागत नव्हती. पण गाडीच्या मागे धावणाऱ्या कुत्र्यांचा त्रास मात्र व्हायला सुरुवात झाली. इमारतीतून बाहेर पडलं की, हमरस्त्यावर एक पांढऱ्या रंगाचं कुत्रं नेहमी माझ्या कारच्या मागे लागायचं. मी त्याचं काय घोडं मारलं होतं? हे त्यालाच ठाऊक. गाडी मुख्य रस्त्याला लागली की अगदी शंभर मीटर अंतरावर हे कुत्रं रस्त्याच्या डाव्या बाजूला एका फूटपाथवर बसून असायचं. त्याला गाडीचा आवाज आला की कान टवकारायचं आणि गाडी जवळ आली की जोरजोराने भुंकत गाडीबरोबर पळत राहायचं. हा त्याचा नेहमीचा उद्योग बनला होता. कदाचित त्याला ही गाडी कोण चालवतं, त्या मनुष्याचा अर्थात माझा चेहरा देखील माहित नसावा! पण नित्यनेमाने त्याचा भुंकण्याचा व गाडीमागे पळण्याचा उद्योग मी अनुभवू लागलो. सुरुवातीला दोन दिवस थोडसं घाबरायला झालं होतं. हे कुत्रं माझ्या गाडीच्या खाली तर येणार नाही ना? याची भीती वाटत होती. परंतु नंतर मला पण त्याची सवय व्हायला लागली. संध्याकाळी ऑफिस वरून परतताना मात्र त्याचं दर्शन व्हायचं नाही. त्यावेळेस रस्त्यावर रहदारी देखील खूप मोठ्या प्रमाणात असायची. त्यामुळे कदाचित ते कुठेतरी दुसरीकडे हुंदडायला किंवा आराम करायला जात असावं. सकाळच्या प्रहरी मात्र त्याचा भुंकण्याचा शिरस्ता काही बंद व्हायचा नाव घेत नव्हता.
एक दिवस मला सकाळी ते कुत्रं दिसलच नाही अर्थात ते नेहमीच्या ठिकाणी नव्हतं. थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या पलीकडून उजव्या बाजूला असणाऱ्या बिल्डिंगच्या परिसरातील कुत्रीबरोबर त्याची मौजमस्ती चाललेली मला दिसली! त्यामुळेच आज मला आणि माझ्या गाडीला त्याचे दर्शन झाले नाही. दुसऱ्या दिवसापासून ते नियमितपणे सकाळी गाडीच्या मागे पडण्याचे काम बजावू लागले. एक दिवस तर त्याने आणखी तीन-चार कुत्री गोळा केली होती. विशेष म्हणजे त्या दिवशी ते तिघे चौघे जण देखील भुंकत भुंकत माझ्या गाडीच्या मागे पळायला लागले! माझी गाडी अनेक दिवसांपासून कुत्र्यांसाठी उत्सव मूर्ती झाली होती. नेहमीचीच गाडी असली तरी ते कुत्रं भुंकण्याचं काही सोडत नव्हतं. यामागे त्याचं काय प्रयोजन असावं? हे मला कधीच समजले नाही.

इतक्या दिवसांमध्ये त्याला माझ्या गाडीचा नंबर देखील पाठ झाला असावा, असं मला वाटतं. रविवारच्या दिवशी ते माझ्या गाडीला 'मिस' करत असावं, असं देखील वाटून गेलं! एक दिवस थोडा वेगळा उजाडला. त्यादिवशी देखील ते कुत्रं मला नेहमीच्या जागेवर दिसले नाही त्याच्याबरोबर असलेली अन्य कुत्री तिथे बागडत होती. पण माझी नजर त्याच नेहमीच्या कुत्र्याला शोधू लागली. थोडं पुढे अंतरावर गेल्यावर उजव्या बाजूच्या बिल्डिंग समोर देखील बघितले. तिथे देखील ते नव्हतं. फुटपाथचा रस्ता संपला आणि पूल सुरू झाला. एका अर्थाने त्या कुत्र्याची हद्द संपली होती. पण थोड्याच अंतरावर मला ते दृश्य दिसले. पलीकडच्या बाजूने फुटपाथला लागून ते कुत्रं निपचित पडून होतं. कदाचित कोणत्यातरी वाहनाने त्याला धडक दिली असावी. त्याने तोंडाचा 'आ' वासलेला होता आणि डोळे उघडे होते. त्या दिवशी माझ्या गाडीने नेहमीचा सकाळचा सोबती गमावला होता.

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०२२

तीन पायांची शर्यत - बाळ फोंडके

विज्ञानकथा या बऱ्याचदा कल्पकतेच्या आधारावर रचल्या गेल्या असल्या तरी त्या विज्ञानाला धरूनच असतात, हे या कथांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. बाळ फोंडके हे त्यांच्या विविध कथासंग्रहातून विज्ञाननिष्ठ लेखक म्हणून परिचयात आहेत. 

या कथासंग्रहामध्ये देखील ते आपला विज्ञाननिष्ठ बाणा सोडत नाहीत. विशेष म्हणजे या पूर्ण कथासंग्रहातील कथा या गर्भाशय आणि मातृत्व या दोनच गोष्टींविषयी भाष्य करताना दिसतात. एक हाडाचा वैज्ञानिक उत्तम साहित्यिक असतो तेव्हा अशा कथा तयार होतात, असे बाळ फोंडके यांच्याबद्दल म्हणता येईल. प्रत्येक कथेचे बीज हे मातृत्व संकल्पनेभोवती तयार झालेला आहे. मातृत्व म्हणजे नव्या जीवाला जन्म देणं. जेव्हा एखादा नवा जीव या विश्वामध्ये प्रवेश करत असतो त्यावेळेस तयार झालेले वैज्ञानिक गुंते व त्यातून निर्माण होणारे भावनिक गुंते या कथांमधून आपल्याला समोर येतात आणि त्यातून विज्ञानाची किमया देखील पक्की लक्षात येते. एकेकाळी जेव्हा विज्ञान प्रगत नव्हतं तेव्हा स्त्रियांना मातृत्वाविषयी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. पण प्रगतीच्या नव्या द्वारांनी अनेक अडचणींवर मात केली. त्यातून आई होण्यासाठी स्त्रीला येणाऱ्या अडथळ्यांवर विज्ञानाने उपाय सुचवले. पण यातून सामाजिक आणि भावनिक समस्या देखील तयार होत गेल्या. हा एकच गाभा असला तरी प्रत्येक कथेचे बीज हे निरनिराळे आहे. किमान स्त्रियांना तरी ते विशेष भावेल, याची आशा वाटते. 



शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०२२

अशाच एका सिग्नलवर

सकाळचे ११ वाजून गेले होते. रावेतहून आकुर्डीकडे आपल्या कारने तसा निवांतच चाललो होतो. रस्त्यावरची रहदारी नेहमीसारखी दिसून येत होती. या रहदारीमध्ये दिसणारी वाहन चालकांची गडबड आणि वेंधळेपणा हा नेहमीचाच. पण मी त्याचा भाग नव्हतो, याचे काहीसे समाधान मला वाटत होते. 

एका मुख्य रस्त्यावर लाल सिग्नल लागला म्हणून गाडी थांबवली. सिग्नल चालू असून देखील रस्त्याच्या चारही बाजूंनी वाहन चालकांची ये-जा सुरूच होती. संध्याकाळी जशी असते तशी रहदारी नसली तरी बऱ्यापैकी वाहने रस्त्यावर फिरत होती. परंतु त्यातील कोणीही सिग्नल पाळण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. मी मात्र झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडे असणाऱ्या रेषेला खेटून माझी गाडी उभी केली होती. इतर तीनही बाजूंनी गाड्या सिग्नलकडे न पाहता आपापल्या रस्त्याने पुढे चालत होत्या. आजवर काहीही झाले तरी मी सिग्नल तोडला नव्हता. एका आदर्श नागरिकाप्रमाणे सिग्नलवर मी एकटा जरी असलो तरी तो पाळत असेच. आणि त्याचा मला अभिमान देखील होता. सिग्नल न पाळणारे किती मूर्ख, याचा अंदाज मी इतर वाहनचालकांकडे बघून घेत होतो. दोन वाहने त्या चौकामध्ये एकाच वेळी समोरासमोर यायची. दोनही वाहन चालकांची नजरा नजर व्हायची. कदाचित मनातल्या मनात शिव्या देखील दिल्या जात होत्या. मग एक जण माघार घेऊन निघून जायचा. त्यानंतर दुसरा देखील त्याचा रस्ता सोडत नव्हता. एकंदरीत गाढवांचा गोंधळ त्या चौकामध्ये दिसून आला. 

आपल्या देशातील लोक किती बेशिस्त आहेत याची प्रचिती त्या सिग्नलवर मला येत होती. याच गोष्टीमुळे आपली लोकं मागे राहतात. आपण फक्त बाहेरच्या देशातील लोकांना चांगले म्हणतो, त्यांची स्तुती करतो. परंतु त्यांचे चांगले गुण आत्मसात करत नाही. हा आपल्या देशातील लोकांचा दुर्गुण आहे, असे म्हणावे लागेल. माझ्या या विचारचक्रामध्ये सिग्नल वरील इकडून तिकडे बेशिस्तपणे फिरणाऱ्या वाहनचालकांच्या हॉर्नचा कर्कश्य आवाज देखील मिसळला जात होता. ते आवाज हा भयंकर रहदारीचा रस्ता आहे, याची आठवण करून देत होते. मी मात्र त्या मूर्ख वाहन चालकांच्या हालचालींकडे शहाणपणाने पाहत होतो. वाहन चालकांव्यतिरिक्त रस्त्याने चालणारे पादचारी तसेच हातगाडीवाले व अन्य विक्रेते देखील कुठूनही रस्ता क्रॉस करत होते. त्यांची देखील अडचण इतरांना होत होती. एकंदरीत काय रस्त्यावरची बेशिस्ती याची देही याची डोळा मला पाहायला मिळत होती. 

मी सिग्नलला थांबलेला बघून मागील गाड्या देखील थांबत होत्या. पण इतर रस्त्यावरील वाहने बघून काही सेकंदातच त्या देखील पुढे जात होत्या. म्हणजे काय तर मेंढ्यांचा कारभार त्या दिवशी मला रस्त्यावर दिसून आला. माझी रस्त्यावर थांबलेली गाडी बघून कडेला टपरीवजा फुलाचे दुकान चालवणारा एक फुलवाला माझ्याकडे बघत असलेला मला दिसला. कदाचित त्याला त्याच्या फुलांचा हार मला विकावयाचा असावा. तीन-चार वेळा त्यांनी माझ्याकडे बघितले व तो माझ्या दिशेने चालू लागला. आता हा मनुष्य त्याच्या दुकानातील फुलांची हार मला विकत घ्यायला लावणार की काय? या प्रश्नाने माझ्या मनात घर केले. तो हळूहळू माझ्याच गाडीच्या दिशेने चालत येत होता. अन्य बेशिस्त वाहनचालकांप्रमाणे तो देखील मला याच प्रवर्गातील आहे की काय, असे वाटून गेले. तो जवळ आला तरी मी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. माझे लक्ष समोर असताना देखील त्याने मला बोलावले व म्हणाला, 

"साहेब गाडी जाऊ द्या पुढे. हा सिग्नल सकाळपासून लालच आहे! तो सुटणार नाही!" 

त्याच्या या एका वाक्याने माझे सर्व विचारचक्र १८० कोनामध्ये बदलून गेले आणि मनोमन मलाच माझा 'पोपट' झाल्याचे जाणवले! मग काय... पहिला गिअर टाकला आणि मी देखील महानगरपालिकेला दोन शिव्या देऊन त्या बेशिस्त रहदारीचा हिस्सा होऊन गेलो! 



कोथिंबीर

दुपारची वामकुक्षी त्यादिवशी फारच काळ लांबली. झोपेतून जाग आली तेव्हा घड्याळामध्ये पाहिले, संध्याकाळचे सहा वाजून गेले होते. घड्याळातल्या त्य...